पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ 29 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता दूरदृष्यप्रणालीद्वारे मॉरिशसमधील अगालेगा बेटावर सहा सामुदायिक विकास प्रकल्पांसह नवीन धावपट्टी आणि सेंट जेम्स जेट्टीचे संयुक्तपणे उद्घाटन करणार आहेत.
भारत आणि मॉरिशस यांच्यातील दृढ आणि अनेक दशके जुन्या विकास भागीदारीची हे प्रकल्प साक्ष पटवतात. मॉरिशसचा मुख्य भूभाग आणि अगालेगा यांच्यातील चांगल्या कनेक्टिव्हिटीची गरज या प्रकल्पांमुळे पूर्ण होईल. त्यामुळे सागरी सुरक्षा अधिक मजबूत होणार असून सामाजिक-आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे. या प्रकल्पांचे उद्घाटन महत्त्वपूर्ण आहे कारण 12 फेब्रुवारी 2024 रोजी दोन्ही नेत्यांनी मॉरिशसमध्ये युपीआय आणि RuPay कार्ड सेवा सुरू केल्या होत्या.