पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळी व्हाईट हाऊसला भेट दिली. यावेळी जोसेफ बायडेन आणि फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडेन यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. यावेळी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हजारो भारतीय-अमेरिकन नागरिक उपस्थित होते.
त्यानंतर पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी मर्यादित आणि शिष्टमंडळ स्तरावर उपयुक्त चर्चा केली. यावेळी उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्री आणि व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, ऊर्जा, हवामान बदल आणि लोकांचे परस्पर संबंध यासारख्या क्षेत्रांमधील वाढते सहकार्य अधोरेखित केले,
दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील परस्पर विश्वास आणि सामंजस्य तसेच सामायिक मूल्यांचा उल्लेख केला, ज्यामुळे हे संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी मजबूत पाया रचला गेला आहे. त्यांनी महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान (iCET) सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून झालेली वेगवान प्रगती आणि लवचिक पुरवठा साखळी तयार करण्यासाठी धोरणात्मक तंत्रज्ञान सहकार्य वाढवण्याच्या उत्कट इच्छेचे कौतुक केले. त्यांनी महत्त्वपूर्ण खनिजे आणि अंतराळ क्षेत्रातील दृढ सहकार्याचे स्वागत केले.
राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि फर्स्ट लेडी यांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. सप्टेंबर 2023 मध्ये जी 20 नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे नवी दिल्लीत स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी नमूद केले.