महामहीम, माझे मित्र राष्ट्रपती सोलिह,
दोन्ही प्रतिनिधिमंडळांचे सदस्य,
माध्यमांचे प्रतिनिधी,
नमस्कार!
सर्वप्रथम, मी माझे मित्र राष्ट्रपती सोलिह आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाचे भारतात स्वागत करतो. गेल्या काही वर्षांत भारत आणि मालदीव यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये नवा उत्साह आला आहे, आपल्यातील जवळीक वाढली आहे. महामारीमुळे आव्हाने निर्माण होऊनही आपले सहकार्य व्यापक भागीदारीमध्ये बदलत आहे.
मित्रांनो,
आज राष्ट्रपती सोलिह यांच्याबरोबर मी अनेक विषयांवर व्यापक चर्चा केली. आम्ही आमच्या द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला आणि महत्वपूर्ण प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार मांडले.
आता काही वेळापूर्वी आम्ही ग्रेटर माले कनेक्टिविटी प्रकल्पांच्या शुभारंभाचे स्वागत केले. हा मालदीवचा सर्वात मोठा पायाभूत विकास प्रकल्प ठरेल.
आम्ही आज ग्रेटर मालेमध्ये 4000 सामाजिक गृहनिर्माण युनिट्सच्या बांधकाम प्रकल्पांचाही आढावा घेतला. मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आम्ही या व्यतिरिक्त 2000 सामाजिक गृहनिर्माण युनिट्ससाठी देखील आर्थिक सहाय्य देऊ.
आम्ही 100 दशलक्ष डॉलर्सचे अतिरिक्त कर्ज प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून सर्व प्रकल्प कालबद्ध रीतीने पूर्ण होऊ शकतील.
मित्रांनो,
हिंदी महासागरात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी, दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीचा गंभीर धोका आहे. आणि म्हणूनच, संपूर्ण क्षेत्राच्या शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि मालदीव यांच्यात संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात निकटचा संपर्क आणि समन्वय आवश्यक आहे. या सर्व सामायिक आव्हानांविरुद्ध आम्ही आमचे सहकार्य वाढवले आहे. यामध्ये मालदीवच्या सुरक्षा अधिकार्यांसाठी क्षमता निर्मिती आणि प्रशिक्षण सहकार्य देखील समाविष्ट आहे.
मित्रांनो,
मालदीव सरकारने 2030 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या वचनबद्धतेबद्दल मी राष्ट्रपती सोलिह यांचे अभिनंदन करतो आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत मालदीवला सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही देतो. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक जग, एक सूर्य, एक ग्रीडसाठी पुढाकार घेतला आहे आणि या अंतर्गत आपण मालदीवच्या साथीने प्रभावी पावले उचलू शकतो.
मित्रांनो,
आज भारत-मालदीव भागीदारी केवळ दोन्ही देशांच्या नागरिकांच्या हितासाठीच काम करत नाही, तर या क्षेत्रासाठी शांतता, स्थैर्य आणि समृद्धीचा स्त्रोत बनत आहे.
मालदीवच्या कोणत्याही गरजा किंवा संकटात मदतीसाठी प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश होता आणि यापुढेही राहील.
मी राष्ट्रपती सोलिह आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाच्या सुखद भारत दौऱ्यासाठी शुभेच्छा देतो.
खूप खूप धन्यवाद.