विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विद्याशाखा, संगणक केंद्र आणि शैक्षणिक विभागाच्या इमारतीची केली पायाभरणी
या निमित्ताने शताब्दी खंड - शताब्दी समारंभांचे संकलन; लोगो बुक - दिल्ली विद्यापीठ आणि त्याच्या महाविद्यालयांचा लोगो; आणि ऑरा - दिल्ली विद्यापीठाची 100 वर्षे यांचे प्रकाशन केले
दिल्ली विद्यापीठात पोहचण्यासाठी मेट्रोने केला प्रवास
"दिल्ली विद्यापीठ हे केवळ एक विद्यापीठ नाही तर एक चळवळ आहे"
"या शंभर वर्षांमध्ये, दिल्ली विद्यापीठाने आपल्या भावना जिवंत ठेवल्या, त्याचबरोबर आपली मूल्येही जिवंत ठेवली आहेत"
"भारताची समृद्ध शिक्षण व्यवस्था ही भारताच्या समृद्धीची वाहक आहे"
"दिल्ली विद्यापीठाने प्रतिभावंत युवकांची एक मजबूत पिढी घडवण्यात मोठी भूमिका बजावली आहे"
"जेव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्थेचा संकल्प देशाप्रती असतो, तेव्हा त्याचे यश राष्ट्राच्या यशाइतकेच असते"
"मागील शतकाच्या तिसऱ्या दशकाने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला नवी गती दिली, आता नव्या शतकाचे तिसरे दशक भारताच्या विकासाच्या प्रवासाला चालना देईल"
"लोकशाही, समानता आणि परस्परांप्रती आदर यांसारखी भारतीय मूल्ये आता मानवी मूल्ये बनत आहेत"
"जगातील सर्वात मोठे वारसा संग्रहालय - 'युगे युगीन भारत' दिल्लीत उभारण्यात येणार आहे"
"भारताची सुप्त शक्ती भारतीय युवकांची यशोगाथा बनत आहे"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली विद्यापीठ क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय सभागृहात दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभाला संबोधित केले. विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये उभारण्यात येणाऱ्या तंत्रज्ञान विद्याशाखा, संगणक केंद्र आणि शैक्षणिक विभागाच्या इमारतीची पायाभरणीही त्यांनी यावेळी केली.  तसेच  शताब्दी वर्षानिमित्त शताब्दी खंड - शताब्दी समारंभाचे  संकलन ; लोगो बुक - दिल्ली विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न  महाविद्यालयांचा लोगो; आणि आभा - दिल्ली विद्यापीठाची 100 वर्षे यांचे प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले.

दिल्ली विद्यापीठात पोहचण्यासाठी पंतप्रधानांनी मेट्रोने प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला.  विद्यापीठात आगमनानंतर पंतप्रधानांनी जर्नी ऑफ हंड्रेड इयर्स या प्रदर्शनालाही भेट दिली.  संगीत आणि ललित कला विद्याशाखेने  सरस्वती वंदना आणि विद्यापीठाचे कुलगीतही त्यांच्यासमोर सादर केले. 

उपस्थितांना  संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या सांगता  समारंभात सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी ठामपणे घेतला होता . ते म्हणाले की ही भावना आपल्या घरी परत आल्यासारखी आहे. भाषणापूर्वी दाखवण्यात आलेल्या लघुपटासंदर्भात पंतप्रधान म्हणाले की, विद्यापीठातून नावारूपाला आलेल्या व्यक्तिमत्त्वांचे योगदान दिल्ली विद्यापीठाच्या जीवनाची झलक आपल्यापुढे मांडते.  दिल्ली विद्यापीठात या उत्सवी प्रसंगी  उत्साहाने उपस्थित राहिल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. विद्यापीठाला कधीही  भेट देण्यासाठी सहकाऱ्यांच्या सान्निध्याचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधानांनी या कार्यक्रमासाठी पोहोचण्यासाठी मेट्रोने प्रवास करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दिल्ली विद्यापीठाचा शताब्दी सोहळा होत आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले .  “कोणत्याही देशाची  विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था त्या देशाचे  कर्तृत्व प्रतिबिंबित  करतात” असे  पंतप्रधान म्हणाले.  दिल्ली विद्यापीठाच्या 100 वर्षांच्या प्रवासात अनेक ऐतिहासिक टप्पे आले,  ज्याच्याशी  अनेक विद्यार्थी, शिक्षक आणि इतरांचे जीवन जोडलेले  आहे असे पंतप्रधान  म्हणाले. दिल्ली विद्यापीठ हे केवळ विद्यापीठ नाही तर  एक चळवळ आहे आणि त्याने जीवनाचा प्रत्येक क्षण व्यापलेला आहे असे पंतप्रधान म्हणाले. शताब्दी सोहळ्याबद्दल पंतप्रधानांनी दिल्ली विद्यापीठाचा प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यापीठाशी संबंधित सर्वांचे  अभिनंदन केले. 

जुन्या आणि नव्या  विद्यार्थ्यांच्या या संमेलनाची दखल घेत पंतप्रधान म्हणाले की, परस्परांशी संवाद साधण्याची ही एक संधी आहे. " या शंभर वर्षांमध्ये, दिल्ली विद्यापीठाने आपल्या भावना जिवंत ठेवल्याच, त्याचबरोबर आपली मूल्येही जपली आहेत" असे पंतप्रधान म्हणाले.  ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, जेव्हा भारतात नालंदा आणि तक्षशिला सारखी चैतन्यशील  विद्यापीठे होती, तेव्हा ते समृद्धीच्या शिखरावर होते. “भारताची समृद्ध शिक्षण व्यवस्था ही भारताच्या समृद्धीची वाहक आहे”, असे सांगत ते म्हणाले  की त्यावेळच्या जागतिक जीडीपीमध्ये भारताचा मोठा  वाटा होता.  गुलामगिरीच्या काळात सततच्या हल्ल्यांमुळे या संस्था नष्ट झाल्या , त्यामुळे भारताच्या बौद्धिक प्रवाहात अडथळे निर्माण झाले आणि विकासाला खीळ बसली असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर प्रतिभावंत  तरुणांची एक सशक्त पिढी घडवून स्वातंत्र्योत्तर भारताच्या भावनिक विकासाला ठोस आकार देण्यात विद्यापीठांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यात दिल्ली विद्यापीठाचाही मोठा वाटा आहे, असे ते म्हणाले. भूतकाळाबद्दलचे हे ज्ञान आपल्या अस्तित्वाला आकार देते, आपले  आदर्श घडवते आणि भविष्याची दृष्टीही विस्तारते असे पंतप्रधान म्हणाले.

“जेव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्थेचा संकल्प देशाप्रति असतो, तेव्हा त्याच्या यशाची बरोबरी राष्ट्राच्या यशाशी  केली जाते”, असे  पंतप्रधानांनी नमूद केले. दिल्ली विद्यापीठ सुरू झाले तेव्हा त्याच्या अंतर्गत फक्त 3 महाविद्यालये होती, परंतु आज 90 हून अधिक महाविद्यालये या विद्यापीठाअंतर्गत आहेत, याकडे मोदींनी लक्ष वेधले. एकेकाळी कमकुवत अर्थव्यवस्था मानला जाणारा भारत आता जगातील अव्वल   5  अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असल्याचे नमूद करत  पंतप्रधानांनी देशात लिंग गुणोत्तरात लक्षणीय सुधारणा झाल्याकडे लक्ष वेधले. विद्यापीठ आणि राष्ट्र यांच्या निर्धारातील  परस्पर संबंधाच्या महत्त्वावर भर देत त्यांनी सांगितले की, शैक्षणिक संस्थांची मुळे जितकी खोलवर असतील तितकी देशाची प्रगती जास्त होईल. पंतप्रधानांनी नमूद केले की दिल्ली विद्यापीठ जेव्हा पहिल्यांदा सुरू झाले तेव्हा त्याचे उद्दिष्ट हे भारताचे स्वातंत्र्य  होते, मात्र आता जेव्हा भारताला स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा ही संस्था 125 वर्षे पूर्ण करेल, म्हणूनच  यापुढे दिल्ली विद्यापीठाचे उद्दिष्ट हे भारताला 'विकसित भारत' बनवणे हे असायला हवे. 

मागच्या शतकातील तिसऱ्या दशकाने भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला नवी गती दिली होती, आणि आता नव्या शतकाचे तिसरे दशक भारताच्या विकासाच्या प्रवासाला चालना देईल”, असे पंतप्रधान म्हणाले. देशात आगामी काळात मोठ्या संख्येने विद्यापीठे, महाविद्यालये, भारतीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय व्यवस्थापन संस्था आणि एम्स सुरु करण्यात येणार असल्याचे  पंतप्रधानांनी सांगितले. “या सर्व संस्था नव्या भारताचे मुख्य घटक बनत आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

शिक्षण ही केवळ शिकवण्याची प्रक्रिया नसून शिकण्याचा एक मार्ग आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.  बऱ्याच काळानंतर विद्यार्थ्याला काय शिकायचे आहे याकडे लक्ष केंद्रीत होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.  विषय निवडीसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ठेवण्यात आलेल्या लवचिकतेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.  शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता सुधारणे आणि स्पर्धात्मकता वाढवणे याविषयी बोलताना पंतप्रधानांनी या संस्थांना प्रेरित करणाऱ्या राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी नियमांचा उल्लेख केला.  शिक्षणाच्या गुणवत्तेशी संस्थांची स्वायत्तता जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. 

भविष्यकालीन शैक्षणिक धोरणे आणि निर्णयांमुळे भारतीय विद्यापीठांची ओळख वाढत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.  2014 साली क्यूएस जागतिक क्रमवारीत केवळ 12 भारतीय विद्यापीठांचा समावेश होता, मात्र आज ही संख्या 45 वर पोहोचली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.  पंतप्रधानांनी या परिवर्तनाचे श्रेय भारताच्या युवा शक्तीला दिले.  शिक्षण ही संकल्पना केवळ नोकरी मिळवणे आणि पदवीपर्यंत मर्यादित न ठेवल्याबद्दल पंतप्रधानांनी आजच्या तरुणांचे कौतुक केले. तरुण पिढी स्वतःचा मार्ग स्वतःच निर्माण करत आहे. देशात एक लाखाहून अधिक स्टार्टअप्सची सुरुवात आणि 2014-15 च्या तुलनेत 40% अधिक पेटंट नोंदणी तसेच ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये झालेली वाढ या विचारसरणीचा पुरावा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी त्यांच्या नुकत्याच भेटीदरम्यान अमेरिकेसोबत दोषदर्षी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावरील उपक्रम किंवा iCET या करारावर प्रकाश टाकला. या उपक्रमांमुळे भारतातील तरुणांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेपासून सेमीकंडक्टरपर्यंतच्या विविध क्षेत्रांमध्ये नवीन संधी निर्माण होतील असे त्यांनी सांगितले. हे तंत्रज्ञान एकेकाळी आपल्या तरुणांच्या आवाक्याबाहेर असलेल्या संधी उपलब्ध करून देईल तसेच कौशल्य विकासालाही चालना देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  मायक्रॉन, गुगल, अप्लाइड मटेरिअल्स इत्यादी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून यातून तरुणांच्या उज्ज्वल भविष्याची प्रचिती येत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

“औद्योगिक क्रांती 4.0 भारताचे दरवाजे ठोठावत आहे”, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी  केली. कृत्रिम बुद्धिमत्ता, संवर्धित वास्तव (एआर), आणि आभासी वास्तव (व्हीआर) सारखे तंत्रज्ञान केवळ चित्रपटांमध्ये पाहिले जाऊ शकणारे तंत्रज्ञान  आता आपल्या वास्तविक जीवनाचा एक भाग बनले आहेत, असे त्यांनी सांगितले.  वाहन चालवण्यापासून ते शस्त्रक्रिया करण्यापर्यंत रोबोटिक्सचा वापर करणे ही नवीन युगातील सामान्य बाब बनली आहे असे त्यांनी नमूद केले. ही सर्व क्षेत्रे भारतातील तरुण पिढीसाठी नवीन मार्ग तयार करत आहेत, असे त्यांनी सांगितले.  गेल्या काही वर्षांत भारताने आपले अंतराळ आणि संरक्षण क्षेत्र खुले केले आहे आणि ड्रोन संबंधित धोरणांमध्ये मोठे बदल केले आहेत. यामुळे तरुणांना प्रगतीच्या नव्या संधी मिळाल्या आहेत, असेही ते म्हणाले. 

भारताच्या वाढत्या जागतिक स्तराचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम पंतप्रधानांनी स्पष्ट केला. आता लोकांना भारताबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले.  कोरोनाच्या काळात भारताने जगाला केलेल्या मदतीचा उल्लेख त्यांनी केला.  यामुळे संकटकाळातही मदत करणाऱ्या भारताविषयी अधिक जाणून घेण्याबाबत जगामध्ये उत्सुकता निर्माण झाली, असे ते म्हणाले.   जी-20 अध्यक्षपदासारख्या गौरवास्पद कामगिरीद्वारे भारताचा वाढता परिचय विद्यार्थ्यांसाठी योग, विज्ञान, संस्कृती, सण, साहित्य, इतिहास, वारसा आणि पाककृती यासारखे नवीन मार्ग तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले.  "जे जगाला भारताबद्दल सांगू शकतील आणि आपल्या अभिमानास्पद गोष्टी जगापर्यंत पोहोचवू शकतील अशा भारतीय तरुणांची मागणी वाढत आहे ", असे त्यांनी सांगितले.

लोकशाही, समानता आणि परस्परांचा आदर यासारखी भारतीय मूल्ये ही मानवी मूल्ये बनत आहेत. यामुळे शासन आणि मुत्सद्देगिरीसारख्या मंचावर भारतीय तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.  इतिहास, संस्कृती आणि वारसा यावर लक्ष केंद्रित केल्याने तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत यावरही त्यांनी भर दिला.  देशातील विविध राज्यांमध्ये उभारण्यात येणारी आदिवासी संग्रहालये आणि पंतप्रधान संग्रहालयाच्या माध्यमातून मांडला जाणारा स्वतंत्र भारताच्या विकासाचा प्रवास याचे उदाहरण त्यांनी दिले.  जगातील सर्वात मोठे वारसा संग्रहालय - ‘युग युगीन भारत’ हे देखील दिल्लीत बनणार आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.  पंतप्रधानांनी भारतीय शिक्षकांची जागतिक पातळीवरील वाढती ओळख या बाबीचा उल्लेख करून त्यांच्याशी संवाद साधताना जागतिक नेत्यांनी अनेकदा भारतीय शिक्षकांच्या कार्याची प्रशंसा केली असल्याचे सांगितले.  "भारताची ही सॉफ्ट पॉवर भारतीय तरुणांची यशोगाथा बनत आहे", असे ते म्हणाले.  या नव्या विकासासाठी विद्यापीठांनी आपली मानसिकता तयारी करावी असा सल्ला त्यांनी दिला. यासाठी एक मार्गदर्शक आराखडा तयार करण्यास सांगितले.  दिल्ली विद्यापीठ जेंव्हा आपला 125 वा स्थापना दिवस साजरा करत असेल तेंव्हा जगातील सर्वोच्च दर्जाच्या विद्यापीठांमध्ये या विद्यापीठाने स्थान प्राप्त केलेले असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  "भविष्यातील नवनवीन शोध इथे व्हायला हवेत, जगातील सर्वोत्तम कल्पना आणि नेते इथून उदयास आले पाहिजेत, यासाठी तुम्हाला सतत काम करावे लागेल", असे पंतप्रधान म्हणाले.

संबोधनाचा समारोप करताना, जीवनात आपण स्वतःसाठी निश्चित केलेल्या ध्येयासाठी आपले मन आणि अंतःकरण तयार करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला.  एखाद्या राष्ट्राचे मन आणि हृदय तयार करण्याची जबाबदारी तेथील शैक्षणिक संस्थांनी पार पाडावी लागते हे त्यांनी अधोरेखित केले.  हा प्रवास पूर्ण करत असताना दिल्ली विद्यापीठ हे संकल्प पूर्ण करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.  “आपली नवीन पिढी भविष्यासाठी सज्ज असावी, आव्हाने स्वीकारण्याचा आणि त्यांना तोंड देण्याचा या पिढीचा स्वभाव असावा, हे केवळ शैक्षणिक संस्थेच्या दूरदृष्टी आणि ध्येयामुळेच शक्य होणार आहे”, असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंह उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

दिल्ली विद्यापीठाची स्थापना 1 मे 1922 रोजी झाली होती. गेल्या शंभर वर्षात, विद्यापीठाचा प्रचंड विकास आणि विस्तार झाला आहे. या विद्यापीठात सध्या 86 विभाग, 90 महाविद्यालये आणि 6 लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत आणि या विद्यापीठाने राष्ट्र उभारणीत मोठे योगदान दिले आहे. 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi