पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. सेन्ट्रल हॉल मध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी महोत्सवाच्या तीन युवा राष्ट्रीय विजेत्यांचे विचार जाणून घेतले. लोक सभा अध्यक्ष, युवा कल्याण आणि क्रीडा राज्य मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करत, काळ पुढे गेल्यानंतरही स्वामी विवेकानंद यांचा राष्ट्रीय जीवनावरचा प्रभाव अबाधित राहिल्याचे पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रवाद आणि राष्ट्र उभारणी वरचे त्यांचे विचार आणि जनसेवेबाबत आणि जगाची सेवा करण्याबाबत त्यांची शिकवण आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील असे त्यांनी सांगितले. व्यक्ती आणि संस्था यांच्या प्रती स्वामीजींचे योगदान त्यांनी विशद केले. स्वामी विवेकानंद यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींनी संस्थांची निर्मिती केली आणि त्यांनी संस्था उभारणाऱ्या नव्या व्यक्तींना घडवले. यामुळे व्यक्ती विकास ते संस्था उभारणी असे सदाचाराचे चक्र सुरु झाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात उपलब्ध असलेल्या लवचिकतेचा आणि कल्पक शिक्षण प्रारुपाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले. देशात परीरचनेच्या अभावी आपल्या युवकांना अनेकदा परक्या देशाकडे पाहणे भाग पडत होते असे सांगून देशात परिसंस्था निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
आत्मविश्वास, निर्मळ मन,निडर वृत्ती आणि साहसी असलेला युवक देशाचा पाया असल्याचे स्वामी विवेकानंद यांनीच जाणले यावर पंतप्रधानांनी भर दिला. युवकांसाठी स्वामी विवेकानंद यांनी दिलेले मूलमंत्र त्यांनी सांगितले. शारीरिक तंदुरुस्तीसाठी ‘लोखंडासारखे बलवान स्नायू आणि पोलादासारख्या नसा’ व्यक्तिमत्व विकासासाठी ‘स्वतःवर विश्वास ठेवा’ नेतृत्व आणि संघटन कार्यासाठी स्वामीजींनी ‘सर्वावर विश्वास ठेवा ‘ असा संदेश दिला आहे.
युवकांनी राजकारणात निःस्वार्थी आणि भरीव योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. आज प्रामाणिक जनतेला सेवेची संधी मिळत असून राजकारण म्हणजे सद्सद विवेक बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टींचे स्थान ही जुनी धरणा बदलत चालली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. प्रामाणिकपणा आणि कामगिरी ही सध्याची गरज बनली आहे. यासंदर्भात त्यांनी राजकारणातल्या घराणेशाहीवर विचार व्यक्त केले. ज्यांचा वारसाच भ्रष्टाचाराचा होता त्यांना भ्रष्टाचाराचे ओझे झाले आहे असे सांगत घराणेशाहीला समूळ नष्ट करण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले. अशा राजकारणामुळे अकार्यक्षम आणि हुकुमशाही प्रवृत्ती वाढीला लागते, लोकशाही रचनेमध्ये असे लोक कुटुंबाचे राजकारण आणि राजकारणात कुटुंब वाचवण्यात दंग राहतात असे पंतप्रधान म्हणाले. आडनावाच्या कुबड्या घेऊन निवडणूक जिंकण्याचे दिवस आता नाहीसे झाले. तरीही राजकीय घराणेशाही, राष्ट्र सर्वप्रथम च्या ऐवजी स्वतः आणि कुटुंबाला प्राधान्य देते.भारतात सामाजिक भ्रष्टाचाराचे हे प्रमुख कारण आहे, असे ते म्हणाले.
भूज इथल्या भूकंपानंतर पुनर्बांधणीच्या कामाचे उदाहरण देत, आपत्तीनंतर स्वतःचा मार्ग स्वतः निर्माण करणारा समाज आपले भविष्य स्वतःच घडवतो असे त्यांनी युवकांना सांगितले. म्हणूनच 130 कोटी भारतीय आज आपले स्वतःचे भविष्य घडवत आहेत. प्रत्येक प्रयत्न, नओन्मेश आणि आजच्या युवकाची प्रामाणिक प्रतिज्ञा, आपल्या भविष्याचा भक्कम पाया घालत असल्याचे त्यांनी सांगितले.