“31 ऑक्टोबर हा देशाच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादाच्या भावनेचा उत्सव बनला आहे”
“लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट, कर्तव्य पथावर 26 जानेवारी रोजी संचलन आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात एकता दिन हे राष्ट्रीय उत्थानाची त्रिशक्ती बनले आहेत”
“स्टॅच्यू ऑफ युनिटी एक भारत श्रेष्ठ भारताच्या आदर्शांचे प्रतिनिधित्व करते”
"गुलामगिरीची मानसिकता झुगारून पुढे जाण्याचा भारताने संकल्प केला आहे "
"आज कोणतेही लक्ष्य भारताच्या आवाक्याबाहेर नाही"
“आज एकता नगर जागतिक हरित शहर म्हणून ओळखले जाते”
"आज संपूर्ण जगाने भारताचा दृढ निर्धार, येथील लोकांचे धैर्य आणि लवचिकता यांची दखल घेतली आहे "
“तुष्टीकरणाचे राजकारण हा राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील, आपल्या विकासाच्या प्रवासातील सर्वात मोठा अडथळा आहे "
"समृद्ध भारताची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या राष्ट्राची एकता कायम राखण्यासाठी निरंतर कार्य केले पाहिजे"

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय एकता दिनाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. त्यांनी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे त्यांना आदरांजली वाहिली. सीमा सुरक्षा दल आणि विविध राज्य पोलिसांच्या तुकड्यांचा समावेश असलेले राष्ट्रीय एकता दिन संचलन, सीआरपीएफच्या सर्व महिला बायकर्सची थरारक प्रात्यक्षिके, सीमा सुरक्षा दलाचा महिला पाईप बँड, गुजरात महिला पोलिसांनी सादर केलेला नृत्याचा कार्यक्रम, विशेष एनसीसी शो, विविध शाळांचे बँड प्रदर्शन, भारतीय हवाई दलाचा फ्लाय पास्ट, व्हायब्रण्ट व्हिलेजच्या आर्थिक व्यवहार्यतेचे प्रदर्शन आदी कार्यक्रमांना पंतप्रधान उपस्थित होते.

 

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने भारताच्या युवकांच्या आणि योद्धांच्या एकतेच्या सामर्थ्याचा उत्सव साजरा होत आहे.  “एक प्रकारे मी मिनी इंडियाचे रूप पाहत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. भाषा, राज्य आणि परंपरा भिन्न असल्या तरी देशातील प्रत्येक व्यक्ती एकतेच्या मजबूत धाग्यात विणलेली आहे असे त्यांनी अधोरेखित केले. “मणी भरपूर आहेत, मात्र त्यांना गुंफणारा हार एकच आहे. आपण वैविध्यपूर्ण असलो तरी आपण एकसंध आहोत”, असे त्यांनी नमूद केले. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे तसे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखले जातात, त्याचप्रमाणे 31 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात एकतेचा उत्सव बनला आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजन, कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलन आणि नर्मदा मातेच्या तीरावर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या सान्निध्यात राष्ट्रीय एकता दिन साजरा  करणे ही  राष्ट्रीय उत्थानाची त्रिशक्ती बनली आहे असे त्यांनी अधोरेखित केले. आजच्या कार्यक्रमाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, एकता नगरला भेट देणारे केवळ स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहत नाहीत तर सरदार साहेबांचे जीवन आणि भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेप्रति त्यांनी दिलेल्या योगदानाची झलकही त्यांना पहायला मिळते. “स्टॅच्यू ऑफ युनिटी हे एक भारत श्रेष्ठ भारताच्या आदर्शांचे प्रतिनिधित्व करते” असे  मोदींनी नमूद केले. पुतळा उभारणीत नागरिकांनी दिलेलं योगदान नमूद करताना त्यांनी आपली  अवजारे देणाऱ्या शेतकऱ्यांची उदाहरणे दिली. वॉल ऑफ युनिटीच्या बांधकामासाठी भारतातील विविध भागांमधील माती एकत्र करण्यात आल्याचाही  त्यांनी उल्लेख केला. देशभरात आयोजित केली जाणारी 'एकता दौड' आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन राष्ट्रीय एकता दिनाच्या  उत्सवात कोट्यवधी नागरिक जोडले गेल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.  “एक भारत श्रेष्ठ भारताची ' भावना साजरी करण्यासाठी 140 कोटी नागरिकांना एकत्र आणण्याच्या मुळाशी  सरदार साहेबांची आदर्श मूल्ये आहेत असे सांगत पंतप्रधानांनी सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली  आणि राष्ट्रीय एकता दिनानिमित्त  नागरिकांचे अभिनंदन केले.

 

पुढील 25 वर्षे ही देशासाठी या शतकातील सर्वात महत्त्वाची 25 वर्षे आहेत कारण या काळात भारत एक समृद्ध आणि विकसित देश बनणार आहे याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. स्वातंत्र्यापूर्वीच्या 25 वर्षांत देशाने जी समर्पणाची  भावना पाहिली तसेच समर्पण दाखवण्याचे आवाहन त्यांनी केले. जगामध्ये भारताची प्रतिष्ठा वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. "आपण सर्वात मोठ्या लोकशाहीचा दर्जा एका नवीन उंचीवर नेत असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो" असे  ते म्हणाले. सुरक्षा, अर्थव्यवस्था, विज्ञान, स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि प्रमुख जागतिक कंपन्यामधील भारताचे नेतृत्व आणि क्रीडा क्षेत्रातील दमदार कामगिरीचा त्यांनी उल्लेख केला.

गुलामगिरीची मानसिकता झुगारून पुढे जाण्याच्या संकल्पाबाबत  पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत प्रगतीबरोबरच आपला  वारसा देखील जतन करत आहे.  नौदलाच्या ध्वजावरून वसाहतवादी चिन्ह हटवणे, वसाहतवादी काळातील अनावश्यक कायदे रद्द करणे, भारतीय दंड संहितेत बदल आणि वसाहतवादी पाऊलखुणांच्या जागी इंडिया गेटला सुशोभित करणारा नेताजी पुतळा यांचा त्यांनी उल्लेख केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आजघडीला कोणतेही ध्येय भारतासाठी असाध्य नाही.”

‘सबका प्रयास’ म्हणजेच सर्वांचे एकत्रित प्रयत्न या संकल्पनेवर अधिक भर देत त्यांनी कलम 370 रद्द करण्याच्या घटनेचा उल्लेख केला. ते म्हणाले की काश्मीर आणि उर्वरित भारत यांच्यादरम्यान उभी असलेली कलम 370 ची भिंत आज पाडून टाकण्यात आली आहे आणि सरदार साहेब जेथे कुठे असतील तेथे या घटनेबद्दल आनंद व्यक्त करत असतील.

दीर्घकाळ प्रलंबित समस्यांवरील चर्चा पुढे सुरु ठेवत पंतप्रधानांनी सरदार सरोवर प्रकल्पाचा देखील उल्लेख केला. हा प्रकल्प गेल्या 5 ते 6 दशकांपासून प्रलंबित होता आणि गेल्या काही वर्षांमध्ये तो पूर्ण करण्यात आला आहे. केवडिया-एकता नगर परिसराचा झालेला कायापालट म्हणजे ‘संकल्प से सिद्धी’चे उत्तम उदाहरण आहे असे त्यांनी सांगितले. “जागतिक दर्जाचे हरित शहर म्हणून आज जग एकता नगरला ओळखते,” ते म्हणाले. या ठिकाणी पर्यटकांसाठी असलेल्या विविध आकर्षणांसोबतच गेल्या केवळ सहा महिन्यांच्या काळात एकता नगर परिसरात दीड लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. येथे आधीपासूनच अत्यंत सशक्तपणे कार्यरत असलेली सौर उर्जा निर्मिती आणि शहरी गॅस वितरण व्यवस्था या मुद्द्यांना स्पर्श करत पंतप्रधान मोदी म्हणाले की आज एकता नगरच्या इतर आकर्षणांमध्ये वारसा रेल्वेगाडीची भर पडणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये दीड कोटींहून अधिक पर्यटकांनी या परिसराला भेट दिली असून त्यातून येथील स्थानिक आदिवासी समुदायांना रोजगाराचे विविध मार्ग उपलब्ध होण्यात मदत झाली आहे.

 

पंतप्रधान म्हणाले, “आज संपूर्ण जग, भारताची अढळ निश्चयी वृत्ती आणि देशवासीयांचे धैर्य तसेच लवचिकता यांची पोचपावती देत आहे.” जग भारतापासून प्रेरणा घेत असतानाच, काही पद्धतींबाबत पंतप्रधानांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. जगात आज दिसून येत असलेल्या भूराजकीय अस्थिरतेवर प्रकाश टाकत पंतप्रधान मोदी यांनी कोविड काळानंतर विविध देशांच्या ढासळत्या अर्थव्यवस्थांचे वर्णन केले. ते म्हणाले की गेल्या 30-40 वर्षांत कधी नव्हती इतकी महागाई आणि बेरोजगारी आता या देशांमध्ये पसरली आहे. अशा परिस्थितीत भारत नवनवे विक्रम रचत आणि नव्या उपाययोजना करत सतत प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. सरकारने गेल्या 9 वर्षांमध्ये राबवलेली धोरणे आणि घेतलेले निर्णय यांचा सकारात्मक परिणाम आज दिसतो आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. केवळ गेल्या 5 वर्षांच्या काळात देशातील साडेतेरा कोटी भारतीय गरिबीतून बाहेर पडले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. नागरिकांना आपल्या देशात स्थैर्य राखण्याचे आवाहन करत पंतप्रधान म्हणाले की भारताला विकासाच्या मार्गावर वाटचाल करण्यास मदत करणाऱ्या 140 कोटी नागरिकांचे प्रयत्न वाया जाऊ देता कामा नये. “आपण भविष्याकडे नजर लावून, राष्ट्रीय ध्येय साध्य करण्याचा आपला निश्चय असाच कायम ठेवला पाहिजे,” ते पुढे म्हणाले.

लोह पुरुष सरदार साहेबांच्या मनात देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नाविषयी असलेल्या अढळ चिंतेचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी यांनी, गेल्या 9 वर्षांत यासंदर्भात उचललेल्या पावलांची यादी सादर केली. तसेच विनाशकारी शक्तींना पूर्वी त्यांच्या विध्वंसक कार्यात जे यश मिळत होते त्यापासून त्यांना वंचित ठेवून अशा आव्हानांचा कशा प्रकारे करारीपणे सामना केला जात आहे याची माहिती त्यांनी दिली. देशाच्या एकतेवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत सावधान राहण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.

 

भारताच्या विकासात्मक प्रवासात तुष्टीकरणाचे राजकारण हा सर्वात मोठा अडथळा आहे याकडे पंतप्रधान मोदी यांनी निर्देश केला. गेल्या अनेक दशकांपासून असे दिसून येत आहे की तुष्टीकरणाचे राजकारण करण्यात गुंतलेले लोक दहशतवादाकडे कानाडोळा करतात आणि मानवतेच्या शत्रुंसोबत हातमिळवणी करतात असे त्यांनी सांगितले. देशाची एकात्मता धोक्यात आणणाऱ्या अशा विचारसरणीबाबत पंतप्रधानांनी सावधानतेचा इशारा दिला.

सध्या सुरु असलेल्या तसेच आगामी निवडणुकांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी सकारात्मक राजकारणाचा संपूर्ण अभाव असलेल्या दुफळीविरुध्द तसेच समाजविरोधी आणि देशविरोधी कारवाया करणाऱ्या घटकांबाबत इशारा दिला. “विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आपण आपल्या देशाची एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी आपले प्रयत्न सतत सुरूच ठेवले पाहिजेत. आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलो तरीही आपण आपले 100 टक्के प्रयत्न करणे सुरु ठेवले पाहिजे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांना अधिक उत्तम भविष्य देण्याचा हा एकमेव मार्ग आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

मायगव्ह मंचावर सरदार पटेल यांच्यावर आधारित राष्ट्रीय स्पर्धेची माहिती देखील पंतप्रधानांनी सर्वांना दिली.

पंतप्रधान म्हणाले की आजचा भारत हा नवा भारत आहे आणि येथील प्रत्येक नागरिक आत्मविश्वासाने भरलेला आहे. या आत्मविश्वासात आणखी भर पडावी आणि सर्वांमध्ये एकात्मतेची भावना कायम राहावी याची सुनिश्चिती करून घेण्यावर त्यांनी भर दिला. देशाच्या सर्व नागरिकांतर्फे सरदार पटेल यांना विनम्र आदरांजली वाहून आणि सर्वांना राष्ट्रीय एकता दिवसाच्या शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी भाषण संपवले.

.

पार्श्वभूमी

देशाची एकता, एकात्मता तसेच संरक्षण यांचे संवर्धन आणि मजबुतीकरण करण्याच्या प्रेरणेला अधिक चालना देत पंतप्रधानांनी त्यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला.

 

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Indian economy ends 2024 with strong growth as PMI hits 60.7 in December

Media Coverage

Indian economy ends 2024 with strong growth as PMI hits 60.7 in December
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 डिसेंबर 2024
December 17, 2024

Unstoppable Progress: India Continues to Grow Across Diverse Sectors with the Modi Government