रामचंद्र मिशनला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. जनतेमध्ये शांतता, आरोग्य आणि आध्यात्मिक कल्याण बिंबवण्यासाठीच्या मिशनच्या कार्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. योग लोकप्रिय करण्याबद्दलही त्यांनी मिशनची प्रशंसा केली. आजच्या वेगवान आणि ताण-तणावाच्या जीवनात आणि अवघे जग जीवनशैलीशी निगडीत आजारांचा आणि महामारीचा सामना करत असताना सहजमार्ग आणि योग हे जगासाठी आशेच्या किरणाप्रमाणे असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
कोरोना संदर्भात बोलताना, 130 कोटी भारतीयांची सतर्कता आणि सावधानता ही जगासाठी उदाहरण ठरल्याचे ते म्हणाले. घरोघरी प्रचलित बाबी आणि योग- आयुर्वेद यांनी कोरोनाशी लढा देण्यात मोठी भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक कल्याणासाठी भारत मानव केन्द्री दृष्टीकोन अनुसरत आहे. कल्याण, तंदुरुस्ती आणि संपत्ती यांच्या संतुलित समतोलावर हा दृष्टीकोन आधारित आहे. गेल्या सहा वर्षात भारताने जगातले सर्वात मोठे लोक कल्याण कार्यक्रम हाती घेतले आहेत. गरिबांना प्रतिष्ठेचे जीवन आणि संधी देण्याचा या प्रयत्नाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. सार्वजनिक स्वच्छता ते समाज कल्याण योजना,धूरमुक्त स्वयंपाक घरे ते बँकिंग कार्यक्षेत्राबाहेर असलेल्यांना बँकेच्या व्यवहारात सामावून घेणे,यासारख्या भारताच्या सार्वजनिक कल्याणाच्या योजनांनी अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडवले आहे.
तंदुरुस्तीच्या भारताच्या संकल्पनेविषयी बोलताना आरोग्याची भारतीय संकल्पना म्हणजे केवळ आजारातून बरे होण्याच्या संकल्पनेपेक्षाही अधिक व्यापक असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपचाराबाबत व्यापक कार्य झाले आहे. आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अमेरिका आणि अनेक युरोपियन देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ही जगातली सर्वात मोठी आरोग्य कल्याण योजना आहे. औषधे आणि वैद्यकीय उपकरणाच्या किमती घटल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जागतिक लसीकरणात भारत मध्यवर्ती भूमिका निभावत आहे. आरोग्य आणि तंदुरुस्ती या क्षेत्रात जगाला देण्यासारखे भारताकडे खूप काही आहे असे सांगूनभारत हा आध्यात्मिक आणि आरोग्य विषयक पर्यटनाचे केंद्र ठरावा यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. आपला आयुर्वेद आणि योग, आरोग्यवान पृथ्वीतलासाठी मोलाचे योगदान देईल. जगाला समजणाऱ्या भाषेत ते जगासमोर सादर करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
योग आणि ध्यानधारणा याकडे जग अधिक गांभीर्याने पाहत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नैराश्याच्या वाढत्या आव्हानाची दखल घेत हार्टफुलनेस हा कार्यक्रम हे आव्हान हाताळण्यात उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निरोगी नागरिक, मानसिक दृष्ट्या स्थिरचित्त नागरिक भारताला नव्या शिखरावर नेतील असे पंतप्रधान म्हणाले.