‘युवा शक्ती-कौशल्य आणि शिक्षण’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कल्पना आणि सूचना मिळविण्यासाठी सरकारने आयोजित केलेल्या 12 पोस्ट-बजेट वेबिनारच्या मालिकेतील हा तिसरा वेबिनार होता.
कौशल्य आणि शिक्षण ही भारताच्या अमृत काळातील दोन प्रमुख साधने आहेत आणि विकसित भारताची संकल्पना घेऊन देशाच्या अमृत यात्रेचे नेतृत्व तरुणच करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. अमृत कालच्या पहिल्या अर्थसंकल्पात तरुणांवर आणि त्यांच्या भवितव्यावर सरकारनं विशेष भर दिला आहे असेही पंतप्रधानांनी सांगितले. या वर्षीचा अर्थसंकल्प शिक्षण व्यवस्थेचा पाया अधिक व्यावहारिक आणि उद्योगाभिमुख करून मजबूत करतो, असे त्यांनी पुढे नमूद केले. गेल्या काही वर्षांपासून शिक्षण व्यवस्थेत लवचिकता नसल्याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त आणि बदल घडवून आणण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा उल्लेख केला. "युवकांच्या योग्यतेनुसार आणि भविष्यातील गरजांनुसार शिक्षण आणि कौशल्याची पुनर्रचना करण्यात आली आहे", असे पंतप्रधान म्हणाले. नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून शिक्षण आणि कौशल्य या दोन्हींवर समान भर दिला जात आहे असे नमूद करतानाच या टप्प्यासाठी शिक्षकांचा पाठिंबा मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांवर भूतकाळातील नियमांचा भार न टाकता शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रात आणखी सुधारणा करण्यास या उपाययोजनेमुळे सरकारला प्रोत्साहन मिळते, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
कोविड महामारीदरम्यान आलेल्या अनुभवांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. नवीन तंत्रज्ञान नवीन प्रकारच्या वर्गखोल्या तयार करण्यात मदत करत आहे. सरकार ‘कुठूनही ज्ञानाची उपलब्धतेची ग्वाही देणाऱ्या साधनांवर लक्ष केंद्रित करत आहे असे त्यांनी स्पष्ट केले. 3 कोटी सदस्यांसह स्वयम या ई-लर्निंग व्यासपीठाचे पंतप्रधानांनी उदाहरण दिले. आभासी प्रयोगशाळा आणि राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय हे ज्ञानाचे एक मोठे माध्यम बनण्याची शक्यता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. डीटीएच चॅनेल्सच्या माध्यमातून स्थानिक भाषांमध्ये अभ्यास करण्याच्या संधीचाही त्यांनी उल्लेख केला. अनेक डिजिटल आणि तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम देशात सुरू आहेत ज्यांना राष्ट्रीय डिजिटल विद्यापीठाकडून अधिक बळ मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. “ही भविष्यकालीन पावले आपल्या शिक्षण, कौशल्य आणि ज्ञान-विज्ञानाचे संपूर्ण क्षेत्र बदलून टाकणार आहेत”, असे पंतप्रधान म्हणाले.
“आता आपल्या शिक्षकांची भूमिका केवळ वर्गापुरती मर्यादित राहणार नाही. देशभरातील शैक्षणिक संस्थांसाठी अधिक वैविध्यपूर्ण अध्यापन साहित्य उपलब्ध होईल त्यामुळे गाव आणि शहरातील शाळांमधील अंतर भरून काढताना शिक्षकांसाठी संधींची नवीन दारे खुली होतील”, असे त्यांनी नमूद केले.
‘ऑन-द-जॉब लर्निंग’ ही संकल्पना स्पष्ट करताना पंतप्रधानांनी सांगितले की अनेक देशांमध्ये यावर विशेष भर देण्यात आला आहे आणि आपल्या देशातील युवकांना वर्गाबाहेरील वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देण्यासाठी तशाच पद्धतीवर भर असलेल्या इंटर्नशिप आणि ऍप्रेंटिसशिप मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. सध्या राष्ट्रीय इंटर्नशिप पोर्टलवर 75 हजार नियोक्ते आहेत तर दुसरीकडे या पोर्टलवर आतापर्यंत 25 लाख इंटर्नशिपची मागणी नोंदवण्यात आली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. या पोर्टलचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आणि देशात इंटर्नशिप संस्कृतीचा आणखी विस्तार करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांना केले. एप्रेंटिसशिपमुळे आपला युवा वर्ग भविष्यातील वाटचालीसाठी सज्ज होईल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आणि देशात सरकारकडून एप्रेंटिसशिप्सना जास्तीत जास्त प्रोत्साहन दिले जात असल्याचे अधोरेखित केले. त्यामुळे योग्य प्रकारचे कौशल्य असलेले मनुष्यबळ निवडण्यासाठी उद्योगांना मदत होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यंदाच्या अर्थसंकल्पावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की राष्ट्रीय ऍप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजनेंतर्गत सुमारे 50 लाख युवांना स्टायपेंडची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे ऍप्रेंटिसशिपसाठी वातावरण तयार होत आहे आणि उद्योगांना देखील स्टायपेंड देण्यासाठी मदत होत आहे.
कुशल मनुष्यबळाची गरज अधोरेखित करताना पंतप्रधानांनी संपूर्ण जग भारताकडे उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून पाहात आहे यावर भर दिला आणि देशात मोठ्या उत्साहाने गुंतवणूक केली जात आहे असे नमूद केले. त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात कौशल्यावर भर दिल्याचे अधोरेखित केले आणि आगामी वर्षांमध्ये युवा वर्गातील लाखोंना कौशल्य, पुनर्कौशल्य आणि कौशल्याचे अद्ययावतीकरण करण्यासाठी उपयुक्त असलेल्या प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 चा उल्लेख केला. आदिवासी, दिव्यांग आणि महिलांच्या गरजा विचारात घेऊन अतिशय योग्य आखणी करून या योजनेच्या माध्यमातून कार्यक्रम तयार केले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि ड्रोन्स यांसारख्या इंडस्ट्री 4.0 साठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यावर भर दिला जात असल्याची आणि त्याद्वारे आपल्या मनुष्यबळाला पुन्हा विशेष कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी जास्त ऊर्जा आणि संसाधने खर्च करण्याची आवश्यकता न राहता आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना योग्य गुणवत्तेची निवड करता येईल, ही बाब देखील त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधानांनी पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेचे देखील उदाहरण दिले ज्यामध्ये पारंपरिक कारागीर, हस्तकलावंत आणि कलावंतांना नव्या बाजारपेठेसाठी सज्ज करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळवून देण्यासाठी कौशल्य विकासावर भर दिला जात आहे.
शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांची भारतातील शिक्षण क्षेत्रामध्ये बदल घडवून भूमिका आणि भागीदारी यांचे महत्त्व पंतप्रधानांनी सांगितले. बाजाराच्या गरजांनुसार संशोधन करणे आणि संशोधन उद्योगासाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देणे देखील शक्य होईल, असे ते म्हणाले. यंदाच्या अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्यांची माहिती देताना पंतप्रधान म्हणाले की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची तीन केंद्रे आहेत आणि ती उद्योग-शैक्षणिक संस्था यांच्या भागीदारीला बळकट करतील. आयसीएमआरच्या प्रयोगशाळा आता वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी क्षेत्रातील संशोधन विकास करणाऱ्या टीम्सना देखील उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांनी खाजगी क्षेत्राला देशातील संशोधन विकास व्यवस्थेला बळकट करण्यासाठी उचललेल्या प्रत्येक पावलाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. संपूर्ण सरकार या सरकारच्या दृष्टीकोनावर भर देताना पंतप्रधान म्हणाले की शिक्षण आणि कौशल्य हे संबंधित मंत्रालय किंवा विभाग यापुरते मर्यादित नाही आणि त्यामधील संधी प्रत्येक क्षेत्रात आहेत. विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या या संधींचा संबंधित हितधारकांनी शोध घ्यावा आणि त्यानुसार मनुष्यबळाची निर्मिती करण्यात मदत करावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले. भारताच्या झपाट्याने विस्तारत असलेल्या हवाई वाहतूक क्षेत्राचे उदाहरण देत पंतप्रधानांनी सांगितले की भारताच्या प्रवास आणि पर्यटन उद्योगामध्ये होणारी वाढ हे क्षेत्र दर्शवत आहे आणि त्याचवेळी रोजगाराच्या अमाप स्रोताचे दरवाजे देखील खुले करत आहे. स्किल इंडिया मिशन अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या युवा वर्गाची माहिती अद्ययावत करून या अद्ययावत माहितीचा संच तयार करण्याची इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली. आपल्या संबोधनाचा समारोप करताना पंतप्रधानांनी भारतात डिजिटल तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रसार झाल्यानंतर प्रशिक्षित मनुष्यबळ मागे पडून नये याची काळजी घेण्यावर भर दिला आणि या दिशेने प्रयत्न करण्याचे आवाहन या उद्योगातील तज्ञांना केले.
विकसित भारत के विज़न को लेकर देश की अमृतयात्रा का नेतृत्व हमारे युवा ही कर रहे हैं। pic.twitter.com/UzdRqpQq9A
— PMO India (@PMOIndia) February 25, 2023
वर्षों से हमारा education sector, rigidity का शिकार रहा।
— PMO India (@PMOIndia) February 25, 2023
हमने इसको बदलने का प्रयास किया है। pic.twitter.com/oColTAyXZt
आज सरकार ऐसे tools पर फोकस कर रही है, जिससे ‘anywhere access of knowledge’ सुनिश्चित हो सके। pic.twitter.com/TlTGfEg7UT
— PMO India (@PMOIndia) February 25, 2023
आज भारत को दुनिया manufacturing hub के रूप में देख रही है।
— PMO India (@PMOIndia) February 25, 2023
इसलिए आज भारत में निवेश को लेकर दुनिया में उत्साह है।
ऐसे में skilled workforce आज बहुत काम आती है। pic.twitter.com/o8OrPU8M4y