





अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि पुढील निवेदन केले.
तब्बल 60 वर्षांच्या कालखंडानंतर पहिल्यांदाच एखादे सरकार सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी निवडून आल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. एखाद्या सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर करणे ही एक अभूतपूर्व घटना असून, अवघा देश ती अनुभवतो आहे असे पंतप्रधान म्हणाले. हा अर्थसंकल्प अमृत काळातील मैलाचा दगड ठरणार असून, आम्ही गेल्या काही काळात नागरिकांना दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. हा अर्थसंकल्प आपल्या नेतृत्वातील सध्याच्या सरकारच्या पुढच्या पाच वर्षांच्या वाटचालीची दिशा ठरवेल तसेच 2047 सालापर्यंत विकसित भारत घडवण्याच्या स्वप्नाचा भक्कम पाया रचेल, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
गेली सलग तीन वर्षे भारताचा विकास दर सुमारे ८ टक्के राहिला आहे, आणि भारत हा जगभरातील प्रमुख अर्थव्यवस्थांमधील सर्वात वेगाने वाढणारा देश ठरला असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली. सकारात्मक दृष्टीकोन, गुंतवणूक आणि केंद्र सरकारची कामगिरीमुळे यामुळेच आज मोठ्या प्रमाणात आपल्यासमोर संधी उपलब्ध असल्याची स्थिती निर्माण झाली असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.
राजकीय पक्षांच्या परस्परांमध्ये होणाऱ्या सर्व लढाया आता संपल्या आहेत, आणि लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया संपली असून, देशातील नागरिकांनी सरकारही निवडून दिले आहे ही बाब पंतप्रधानांनी नमूद केली आणि आता सर्व खासदारांनी एकत्र येत पुढची पाच वर्षे देशासाठी लढावे असे आवाहनही त्यांनी केले. सर्व राजकीय पक्षांनी पुढची साडेचार वर्षे आपापल्या संघटनांपुरता विचार करण्याच्या पुढे जात संसदेसारख्या प्रतिष्ठित आणि सर्वोच्च व्यासपीठाचा वापर करावा आणि आता देशासाठी वचनबद्धता दाखवावी असे आवाहनही त्यांनी केले. आता आपण सगळेच जानेवारी 2029 मध्ये निवडणुकीच्या रिगणात लढण्यासाठी उतरू या, मात्र तोपर्यंत आपला देश, इथली गरीब जनता, शेतकरी, महिला आणि युवकांना प्राधान्य आपण प्राधान्य देऊ या असे आवाहन त्यांनी केले. 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचे स्वप्न आणि संकल्प प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवली जाणार नाही याबाबतही त्यांनी आश्वस्त केले.
काही राजकीय पक्षांचा दृष्टिकोन नकारात्मक आहे त्यामुळे अनेक खासदारांना आपले विचार मांडण्याची आणि त्यांच्या मतदारसंघाशी संबंधित मुद्दे मांडण्याची संधी मिळू शकली नाही, अशी खंतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. सर्व पक्षांनी सर्व सदस्यांना, विशेषत: पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांना आपले मत मांडण्याची संधी द्यायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.जनतेने निवडून आणलेल्या सरकारला दडपण्याचा तसेच संसदेतील पंतप्रधानांच्या भाषणही दडपून टाकण्याचा प्रयत्न संसेदत झाल्याचे स्मरण त्यांनी जनतेला करून दिले, तसेच लोकशाही परंपरेत अशा वर्तणुकीला स्थान नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
देशातील जनतेने सर्व खासदारांना स्वतःच्या राजकीय पक्षांचा कार्यक्रम रेटण्यासाठी नाही, तर या देशाची सेवा करण्यासाठी जनादेश दिला आहे, याची आठवणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना करून दिली. हे सभागृह राजकीय पक्षांसाठी नाही, तर हे सभागृह देशासाठी आहे. ही संसद खासदारांची सेवा करण्यासाठी नसून, देशभरातील 140 कोटी नागरिकांची सेवा करण्यासाठी आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निक्षून सांगितले. या अधिवेशनात सर्व खासदार फलदायी चर्चेसाठी हातभार लावतील, असा विश्वासही त्यांनी निवेदनाच्या समारोपावेळी व्यक्त केला. आज देशाला पुढे घेऊन जाणाऱ्या सकारात्मक विचारांची - दृष्टीकोनाची गरज आहे ही बाबही त्यांनी आवर्जून नमूद केली. आपल्याला विरोध करताना मांडली गेलेली मते वाईट नसतात, मात्र नकारात्मक विचारांमुळे विकास प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ही बाब लक्षात घेऊनच लोकशाहीचे मंदिर असलेल्या या संसदेचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केला जाईल असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.