पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे ब्रह्मा कुमारींच्या ‘जल-जन अभियाना’ला संबोधित केले.
ब्रह्मा कुमारींच्या ‘जल-जन अभियाना’च्या उद्घाटन सोहळ्याचा एक भाग बनण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आनंद व्यक्त केला. त्यांच्याकडून शिकणे हा नेहमीच एक विशेष अनुभव असतो असे ते म्हणाले. “स्वर्गीय राजयोगिनी दादी जानकी जी यांनी दिलेला आशीर्वाद ही माझ्यासाठी मौल्यवान देणगी आहे” असे त्यांनी सांगितले. 2007 मध्ये दादी प्रकाश मणी जी यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अबू रोड येथे येण्याची संधी मिळाल्याच्या आठवणीना त्यांनी उजाळा दिला. गेल्या काही वर्षात ब्रह्मा कुमारी भगिनींनी त्यांना अनेकदा निमंत्रण दिल्याचे स्मरण करत पंतप्रधान म्हणाले की या अध्यात्मिक कुटुंबाचा एक सदस्य म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आपण कायम उत्सुक असतो, त्यांनी 2011 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या ‘फ्यूचर ऑफ पॉवर’ या संस्थेच्या स्थापनेचा 75 वर्षपूर्ती कार्यक्रम, 2013 मधील संगम तीर्थधाम, 2017 मधील ब्रह्मा कुमारी संस्थानचा 80 वा स्थापना दिवस आणि अमृत महोत्सवादरम्यानचा कार्यक्रम, यांचे स्मरण केले आणि त्यांचे प्रेम आणि आत्मीयतेबद्दल त्यांचे आभार मानले. ब्रह्मा कुमारी संस्थेबरोवर असलेल्या आपल्या विशेष भावबंधावर त्यांनी भर दिला. आपल्या स्व पेक्षा उच्च पातळी गाठणे आणि सर्वस्व समाजाला समर्पित करणे ही त्या सर्वांसाठी एक प्रकारची अध्यात्मिक साधना आहे, असे ते म्हणाले.
जेव्हा जगभरात पाणीटंचाईकडे भविष्यातील संकट म्हणून पाहिले जात आहे, अशा वेळी जल-जन अभियान सुरू करण्यात येत आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. एकविसाव्या शतकातील जगाला पृथ्वीवरील पाण्याच्या मर्यादित स्रोतांचे गांभीर्य माहित आहे आणि भारतातील प्रचंड लोकसंख्येमुळे पाणी टंचाई ही भारतासाठी तितकीच मोठी समस्या आहे, असे त्यांनी सांगितले. “अमृत काळामध्ये भारत पाण्याकडे भविष्य म्हणून पाहत आहे, पाणी असेल तरच उद्याचा दिवस असेल या दिशेने आजपासूनच एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत,'' असे ते म्हणाले. देशाने जलसंधारणाला जनचळवळीचे रूप दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि ब्रह्माकुमारींचे जल-जन अभियान लोकसहभागाच्या या प्रयत्नाला नवे बळ देईल, असे सांगितले. जलसंधारण मोहिमेलाही चालना मिळेल आणि त्यामुळे ही मोहीम अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतातील ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी निसर्ग, पर्यावरण आणि पाण्याबाबत एक संयमित, संतुलित आणि संवेदनशील व्यवस्था निर्माण केली होती, असे पंतप्रधानांनी सांगितले. पाणी कधीही वाया घालवू नये तर पाण्याचे जतन करावे या आशयाची एक जुनी म्हण सांगून ते म्हणाले की ही भावना हजारो वर्षांपासून भारताच्या अध्यात्मिकतेचा आणि धर्माचा एक भाग आहे. “जल संधारण हे आपल्या सामाजिक संस्कृती आणि सामाजिक विचारांच्या केंद्रस्थानी आहे म्हणूनच भारतात पाण्याला देवता तर आपल्या नद्यांना माता म्हणून पहिले जाते, असे त्यांनी सांगितले. जेव्हा एखादा समाज निसर्गासमवेत असे भावनिक बंध तयार करतो तेव्हा शाश्वत विकास ही त्यांची नैसर्गिक जीवनशैली बनते असे ते म्हणाले. भूतकाळातील चेतना पुन्हा जागृत करताना भविष्यातील आव्हानांवर उपाय शोधण्याच्या गरजेचा त्यांनी पुनरुच्चार केला. जल संधारणाच्या मूल्यांविषयी देशातील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि जल प्रदूषणाला कारणीभूत सर्व अडथळ्यांवर मात करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. ब्रह्मा कुमारीसारख्या भारतातील अध्यात्मिक संस्थांची जलसंधारणाबाबतची भूमिका त्यांनी अधोरेखित केली.
गेल्या काही दशकांमध्ये विकसित झालेली नकारात्मक विचारप्रक्रिया, आणि जलसंवर्धन आणि पर्यावरण यांसारखे विषय कठीण मानले गेले, याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. गेल्या 8-9 वर्षांमधील बदलांकडे लक्ष वेधत पंतप्रधान म्हणाले, की ही मानसिकता आणि परिस्थिती दोन्ही आता बदलले आहेत. ‘नमामि गंगे’ मोहिमेचे उदाहरण देताना पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, केवळ गंगाच नव्हे तर तिच्या सर्व उपनद्याही स्वच्छ होत आहेत, आणि गंगेच्या काठावर नैसर्गिक शेतीसारख्या मोहिमाही सुरू झाल्या आहेत. "नमामि गंगे मोहीम देशातील विविध राज्यांसाठी एक आदर्श म्हणून उदयाला आली आहे", पंतप्रधानांनी टिप्पणी केली.
‘कॅच द रेन’या मोहिमेवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी नमूद केले की, खालावणारी भूजल पातळी हे देशासमोरील एक मोठे आव्हान आहे. अटल भूजल योजनेच्या माध्यमातून देशातील हजारो ग्रामपंचायतींमध्ये जलसंवर्धनालाही चालना दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरे बांधण्याच्या मोहिमेचाही त्यांनी उल्लेख केला, आणि जलसंवर्धनाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असल्याचे ते म्हणाले.
जलसंवर्धनामधील महिलांचे योगदान अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, खेड्या-पाड्यातील महिला जल समित्यांच्या माध्यमातून जल जीवन अभियानासारख्या महत्त्वाच्या योजना पुढे नेत आहेत.
ब्रह्मा कुमारी भगिनी देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही अशीच भूमिका बजावू शकतील, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. जलसंवर्धनाबरोबरच पर्यावरणाशी संबंधित प्रश्नही उपस्थित करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कृषी क्षेत्रात पाण्याचा संतुलित वापर करण्यासाठी ठिबक सिंचनासारख्या तंत्राला देश प्रोत्साहन देत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली, आणि त्याचा वापर वाढवण्यासाठी ब्रह्मा कुमारींनी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे, असे आवाहन त्यांनी केले.
संपूर्ण जग यंदा आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करत आहे, याचा विशेष उल्लेख करून, प्रत्येकाने आपल्या आहारात भरड धान्याचा समावेश करावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले. श्री अन्न बाजरी आणि श्री अन्न ज्वारी हे शतकानुशतके भारताच्या कृषी आणि आहार संस्कृतीचा एक भाग आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले. भरड धान्यामध्ये भरपूर पोषण मूल्य असते, आणि त्याचा लागवडीसाठी कमी पाणी लागते, अशी माहिती त्यांनी दिली.
जल-जन अभियान हे एकत्रित प्रयत्नांनी यशस्वी होईल, आणि अधिक चांगल्या भविष्यासह अधिक चांगला भारत निर्माण करण्यामध्ये मदत करेल, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
‘जल-जन अभियान’ एक ऐसे समय में शुरू हो रहा है, जब पानी की कमी को पूरे विश्व में भविष्य के संकट के रूप में देखा जा रहा है। pic.twitter.com/nFgiEkUA95
— PMO India (@PMOIndia) February 16, 2023
हम जल को देव की संज्ञा देते हैं, नदियों को माँ मानते हैं। pic.twitter.com/R7iCUyUEMY
— PMO India (@PMOIndia) February 16, 2023
‘नमामि गंगे’ अभियान, आज देश के विभिन्न राज्यों के लिए एक मॉडल बनकर उभरा है। pic.twitter.com/QyVy469Sm0
— PMO India (@PMOIndia) February 16, 2023