“औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या कौशल्य दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने आज घडला इतिहास”
“विश्वकर्मा जयंती हा खऱ्या अर्थाने परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आहे, हा श्रम दिवस आहे”
“भारतामध्ये श्रमिकांच्या कौशल्यात आपण नेहमीच परमेश्वर पाहिला , ते विश्वकर्माच्या रुपात आपल्याला दिसतात”
“या शतकावर भारताचे नाव कोरायचे असेल तर भारतातील तरुणांनी शिक्षण आणि कौशाल्यात सारखेच प्रवीण असायला हवे”
“आयटीआय मध्ये तांत्रिक प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांच्या लष्करातील भरती साठी विशेष तरतूद करणार”
“यामध्ये आयटीआयची भूमिका अत्यंत महत्वाची, आपल्या तरुणांनी याचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा”
“भारतात कौशल्यामध्ये गुणवत्ता आणि विविधताही आहे”
“तरुणांकडे जेव्हा शिक्षणाबरोबर कौशल्याचे बळ असते, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास आपोआप वाढतो”
“बदलत्या जागतिक परिस्थितीत जगाचा विश्वास भारतावर”
“मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की तुमची सुरुवात जितकी आनंददायी आहे, तेवढाच तुमचा उद्याचा प्रवास देखील अधिक सृजनशील असेल”, ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या कौशल दीक्षांत समारंभाला व्हिडीओ संदेशा द्वारे संबोधित केले. या कार्यक्रमात जवळजवळ 40 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की भारत 21 व्या शतकात पुढे जात असताना, आज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या 9 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या कौशल्य दीक्षांत समारंभामध्ये 40 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आभासी माध्यमातून जोडले जाऊन एक इतिहास घडला आहे. भगवान विश्वकर्मा यांच्या जन्म दिनी हे विद्यार्थी आपल्या कौशल्यांसह नवोन्मेषाच्या मार्गावर पहिले पाऊल टाकत आहेत, याचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला. “मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की तुमची सुरुवात जितकी आनंददायी आहे, तेवढाच तुमचा उद्याचा प्रवास देखील अधिक सृजनशील असेल”, ते म्हणाले.  

विश्वकर्मा जयंतीबद्दल अधिक बोलताना पंतप्रधान म्हणाले की हा एक प्रतिष्ठेचा आणि कौशल्याच्या गौरवाचा सण आहे. देवाची मूर्ती घडवणाऱ्या शिल्पकाराचे उदाहरण देत पंतप्रधान म्हणाले की, आज विश्वकर्मा जयंतीच्या मंगल दिनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा गौरव केला जात आहे आणि त्याला ओळख मिळत आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. “विश्वकर्मा जयंती हा खऱ्या अर्थाने परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान असून, हा एक श्रम दिवस आहे”, पंतप्रधान पुढे म्हणाले “भारतामध्ये श्रमिकांच्या कौशल्यात आपण नेहमीच परमेश्वर पाहिला, ते विश्वकर्माच्या रुपात आपल्याला दिसतात.” त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यात कुठेतरी परमेश्वराचा अंश आहे. ते पुढे म्हणाले, “मला असे वाटते की हा कार्यक्रम भगवान विश्वकर्मा यांना  दिलेली भावनिक आदरांजली आहे, जशी ‘कौशलांजली’”.  

गेल्या आठ वर्षांतील सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, भारताने भगवान विश्वकर्मा यांच्या प्रेरणेने नवीन योजना सुरू केल्या आहेत आणि कौशल्य विकासावर भर देऊन 'श्रमेव जयते'ची परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे. "हे शतक भारताचे शतक बनवण्यासाठी, भारतातील तरुणांनी शिक्षणाबरोबरच कौशल्यातही तितकेच प्रवीण असणे अत्यंत आवश्यक आहे," पंतप्रधानांनी नमूद केले. तरुणांच्या कौशल्य विकासाला आणि नवीन संस्थांच्या निर्मितीला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असेही मोदी म्हणाले. “आपल्या देशातील पहिली आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्था 1950 मध्ये स्थापन झाली. त्यानंतरच्या सात दशकांत 10 हजार आयटीआय स्थापन करण्यात आल्या. आमच्या सरकारच्या 8 वर्षात देशात सुमारे 5 हजार नवीन आयटीआय तयार करण्यात आल्या आहेत. गेल्या 8 वर्षांत आयटीआयमध्ये 4 लाखांहून अधिक नवीन जागाही वाढवण्यात आल्या आहेत,” पंतप्रधान पुढे म्हणाले.

आयटीआय व्यतिरिक्त देशभरात राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, भारतीय कौशल्य संस्था आणि हजारो कौशल्य विकास केंद्रे देखील उघडण्यात आली आहेत असेही पंतप्रधानांनी सांगितले. तसेच पंतप्रधान म्हणाले की, शालेय स्तरावर कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी सरकार 5000 हून अधिक कौशल्य केंद्रे उघडणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर, अनुभवावर आधारित शिक्षणालाही चालना दिली जात आहे आणि शाळांमध्ये कौशल्य अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आयटीआयमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल ओपन स्कूलमधून 12वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र सहज मिळणार असल्याची माहिती पंतप्रधानांना दिली तेव्हा त्यांनी आनंद व्यक्त केला. "हे तुम्हाला पुढील अभ्यासात अधिक सोयीस्कर ठरेल", असेही मोदी म्हणाले. पंतप्रधान पुढे म्हणाले की, आयटीआयमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांच्या सैन्य भर्तीसाठी विशेष तरतूद आहे.

चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या 'इंडस्ट्री 4.0' या युगाविषयी बोलताना पंतप्रधानांनी भारताच्या यशात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे योगदान मोठे असेल, अशी टिप्पणी केली. काळानुसार नोकरीचे स्वरूप बदलत असते, त्यामुळे आमच्या आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रत्येक आधुनिक अभ्यासक्रमाची सुविधा मिळावी, याची सरकारने विशेष काळजी घेतली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अभ्यासक्रमांच्या उपलब्धतेबाबत माहिती देताना मोदी म्हणाले की, कोडिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान आणि टेलिमेडिसिनशी संबंधित अनेक अभ्यासक्रम आयटीआयमध्ये सुरू करण्यात आले आहेत. नवीकरणीय ऊर्जा, सौर उर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात भारत आघाडीवर असल्याने अशा क्षेत्रांशी संबंधित अभ्यासक्रम आपल्या अनेक आयटीआयमध्ये सुरू करण्यात आले आहेत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. “तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळणे सोपे होईल”, असेही ते म्हणाले.

प्रत्येक गावाला ऑप्टिकल फायबर पुरविण्याच्या आणि लाखो कॉमन सर्व्हिस सेंटर्स अर्थात सामायिक सेवा केंद्र उघडण्याच्या अलीकडच्या घडामोडींबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, देशात तंत्रज्ञानाचा विस्तार होत असल्याने रोजगाराच्या संधीही वाढत आहेत. आयटीआयमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गावांमध्ये अधिकाधिक संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. “गावातील मोबाईल दुरुस्तीचे काम असो किंवा शेतीतील नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित काम असो, खत फवारणी असो किंवा ड्रोनच्या साहाय्याने औषधांचा पुरवठा असो, ग्रामीण अर्थव्यवस्थेत असे  अनेक रोजगार  निर्माण होत आहेत,” पंतप्रधानांनी नमूद केले, “ यामध्ये आयटीआयची भूमिका खूप महत्त्वाची आहे, आपल्या तरुणांनी या शक्यतांचा अधिकाधिक फायदा घेतला पाहिजे.” त्याच दृष्टीकोनातून आयटीआय अद्ययावत करण्यासाठी सरकार निरंतर काम करत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

तरुणांमधे कौशल्य विकासासोबतच सॉफ्ट स्किल्स असणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. व्यवसायाची योजना आखणे, बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठीची योजना, आवश्यक अर्ज भरणे आणि नवीन कंपनीची नोंदणी करणे यासारख्या बाबींचा यात समावेश होतो असे  त्यांनी सांगितले. “सरकारच्या या प्रयत्नांमुळे आज भारतात कौशल्यांमध्ये गुणवत्ता आहे आणि वैविध्यही आहे. गेल्या काही वर्षांत, आपल्या आयटीआय उत्तीर्णांनी जागतिक कौशल्य स्पर्धांमध्ये अनेक मोठी बक्षिसे जिंकली आहेत”, असे ते पुढे म्हणाले.

“तरुणांमध्ये शिक्षणाबरोबरच कौशल्याची शक्ती असते, तेव्हा त्याचा आत्मविश्वास आपोआपच वाढतो असे कौशल्य विकासाचे महत्व विशद करताना त्यांनी पंतप्रधानांनी सांगितले. युवक कौशल्याने सक्षम होऊन बाहेर पडतो, तेव्हा स्वयंरोजगाराच्या या भावनाशक्तीला पाठबळ देण्यासाठी आपले काम कसे सुरू करावे याची त्याला कल्पना येते.” हमीशिवाय कर्ज देणार्‍या मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया यासारख्या योजनांची ताकद पंतप्रधानांनी अधोरेखित केली.

“ध्येय समोर आहे, त्या दिशेने वाटचाल करावी लागेल. आज देशाने तुमचा हात हाती घेतला आहे, उद्या देशाला तुम्ही पुढे न्यायचे आहे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत काळाकडे सर्वांचे लक्ष वेधत, आपल्या आयुष्यातील पुढील 25 वर्षे ही भारतासाठीच्या पुढील 25 वर्षां इतकीच महत्त्वाची आहेत असे मोदी म्हणाले. “तुम्ही सर्व मेक इन इंडिया आणि व्होकल फॉर लोकल मोहिमेचे नेतृत्व आहात. तुम्ही भारतीय उद्योगाच्या कण्यासारखे आहात आणि म्हणूनच विकसित आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करण्यात तुमची मोठी भूमिका आहे” असे पंतप्रधान म्हणाले. 

जागतिक स्तरावरील उपलब्ध संधींवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, जगातील अनेक मोठ्या देशांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचा वेग कायम ठेवण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज आहे. देशात आणि परदेशातही अनेक संधी वाट पाहत आहेत. “बदलत्या जागतिक परिस्थितीत, जगाचा भारतावरील विश्वासही सतत वाढत आहे असे मोदी यांनी सांगितले. भारताने कोरोना काळातही सिद्ध केले की आपले कुशल कर्मचारी आणि तरुण मोठ्या आव्हानांना तोंड देण्यास कसे सक्षम आहेत.” आरोग्य सेवा असो की हॉटेल-रुग्णालय व्यवस्थापन, डिजिटल तोडगे किंवा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्र असो, भारतीय, त्यांच्या कौशल्य आणि प्रतिभेमुळे प्रत्येक देशात ठसा उमटवत आहेत, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.

भविष्याचा आधार बनतील अशा कौशल्यांमध्ये सुधारणा करत राहण्याच्या गरजेचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी आपल्या भाषणाच्या समारोपात केला. "कौशल्यांबाबत तुमचा मंत्र 'कौशल्य, 'पुनः कौशल्य' आणि 'कौशल्य अद्ययावतीकरण' असा असावा असे ते म्हणाले!" पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये शिकून त्यांचे ज्ञान इतरांबरोबर वाटून घेण्याचे आवाहन केले. "मला खात्री आहे, तुम्ही याच वेगाने पुढे जाल आणि तुमच्या कौशल्याने तुम्ही नवीन भारताच्या चांगल्या भविष्याला दिशा द्याल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला."

 

 

 

 

 

 

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
25% of India under forest & tree cover: Government report

Media Coverage

25% of India under forest & tree cover: Government report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi