पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अहमदाबाद येथील कार्यकर (कार्यकर्ता) सुवर्ण महोत्सवाला मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज, आदरणीय संत, आणि सत्संगी परिवाराचे सदस्य आणि अन्य सन्माननीय व्यक्तींचे स्वागत केले, व त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला. कार्यकर सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून त्यांनी भगवान स्वामी नारायण यांच्या चरणकमलांना वंदन केले आणि प्रमुख स्वामी महाराज यांची आज एकशे तीनवी जयंती असल्याचेही स्मरण त्यांनी केले. परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज यांच्या परिश्रम आणि समर्पणामुळे भगवान स्वामी नारायण यांची शिकवण आणि प्रमुख स्वामी महाराज यांची वचने आज फळाला येत आहेत. जवळपास एक लाख कार्यकर्त्यांना समाविष्ट करून घेत, तरुणांचे व बालकांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून भरवलेल्या इतक्या मोठ्या कार्यक्रमाचे स्वरूप पाहून मोदी यांनी समाधान व्यक्त केले. ते स्वतः या कार्यक्रमस्थळी उपस्थित नसले तरी ते त्यातील ऊर्जेचा अनुभव घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले. या उच्च कोटीच्या दैवी समारंभाबद्दल त्यांनी परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज यांचे आणि सर्व संतांचे अभिनंदन केले.
कार्यकर सुवर्ण महोत्सव हा सेवेच्या पन्नास वर्षांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की कार्यकर्त्यांची नोंदणी करून त्यांना सेवेशी जोडून घेण्याची प्रक्रिया 50 वर्षांपूर्वी सुरु झाली आणि हा अतिशय अभिनव उपक्रम आहे. बीएपीएसचे लक्षावधी कार्यकर्ते आत्यंतिक समर्पणाच्या भावनेने सेवेमध्ये गुंतले आहेत, हे पाहून अतिशय आनंद वाटतो, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. हे संघटनेचे मोठे यश असल्याचे सांगून मोदी यांनी बीएपीएसचे अभीष्टचिंतन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
"कार्यकर सुवर्ण महोत्सव म्हणजे भगवान स्वामी नारायण यांची मानवकल्याणकारी शिकवण साजरी करण्याचा सोहळा आहे", असे मोदी म्हणाले. "दशकानुदशके केलेल्या सेवेच्या पुण्याईमुळे लक्षावधी लोकांच्या जीवनात परिवर्तन घडून आले", असेही ते म्हणाले. बीएपीएसच्या सेवा अभियानांचे दर्शन जवळून घडणे हे सद्भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भुजमधील विनाशकारी भूकंपापासून, नरनारायण नगर गावाची पुनर्बांधणी, केरळातील महापूर, उत्तराखंडमधील भूस्खलनाचे वेदनादायक संकट आणि अगदी अलीकडचे कोरिया महामारीचे संकट- अशा अनेक वेळा त्यांच्याशी जोडून घेण्याची संधी मिळाली असल्याचे मोदी यांनी नमूद केले.
एक कुटुंब म्हणून लोकांच्या पाठीशी उभे राहून प्रत्येकाची सहानुभूतीने सेवा केल्याबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक करून मोदी म्हणाले की, कोविड काळात बीएपीएस मंदिरांचे सेवा केंद्रात कसे रूपांतर झाले, हे सर्वांनी पाहिले आहे. युक्रेनमध्ये युद्धाची तीव्रता वाढली तेव्हा बीएपीएस कार्यकर्त्यांनी सरकारला आणि युक्रेनमधून पोलंडला हलवण्यात आलेल्या लोकांना कशी मदत केली, हेही पंतप्रधानांनी कथन केले. संपूर्ण युरोपमधील हजारो बीएपीएस कार्यकर्त्यांना एका रात्रीत एकत्र आणून पोलंडमध्ये मोठ्या संख्येने पोहोचणाऱ्या भारतीयांना मदत करण्याच्या संस्थेच्या तत्परतेचे त्यांनी कौतुक केले.
बीएपीएस संघटनेच्या या सामर्थ्यावर प्रकाश टाकत मोदी म्हणाले की, जागतिक स्तरावर मानवतेच्या हितासाठी त्यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. कार्यकार सुवर्ण महोत्सवानिमित्त सर्व बीएपीएस कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करताना पंतप्रधानांनी टिप्पणी केली की आज बीएपीएस कार्यकर्ते त्यांच्या अथक सेवेद्वारे जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनात बदल घडवून आणत आहेत. ते आपल्या सेवेने कोट्यवधी आत्म्यांना स्पर्श करत आहेत आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला, ती दुर्गम ठिकाणी असली तरी, सक्षम बनवत आहेत, असेही ते म्हणाले. ते एक प्रेरणास्थान असून पूजनीय आणि आदरास पात्र असल्याचेही मोदी यांनी सांगितले.
बीएपीएसच्या कार्यामुळे जगात भारताची क्षमता आणि प्रभाव बळकट होत असल्याचे अधोरेखित करून मोदी म्हणाले की, जगातील 28 देशांमध्ये भगवान स्वामी नारायणांची 1800 मंदिरे आहेत आणि जगभरात 21 हजारांहून अधिक आध्यात्मिक केंद्रे आहेत. ते पुढे म्हणाले की सर्व केंद्रांमध्ये अनेक सेवाभावी प्रकल्प हाती घेतले जात आहेत आणि यामुळे भारताचा आध्यात्मिक वारसा आणि ओळख जगासमोर येत आहे.
बीएपीएस मंदिरे ही भारताचे सांस्कृतिक प्रतिबिंब असल्याचे सांगून मोदी यांनी ती जगातील सर्वात प्राचीन अशा चैतन्यमयी संस्कृतीची केंद्रे असल्याचे भाष्य केले. मोदी म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी अबुधाबी येथील स्वामी नारायण मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य आपल्याला लाभले आणि त्याची जगभरात चर्चा झाली. ते पुढे म्हणाले की संपूर्ण जगाने भारताचा आध्यात्मिक वारसा आणि सांस्कृतिक विविधता पाहिली. अशा प्रयत्नांमुळेच भारताचे सांस्कृतिक वैभव आणि मानवी औदार्य जगाला कळले अशी टिप्पणी मोदी यांनी केली आणि त्यांनी सर्व बीएपीएस कार्यकर्त्यांचे अशा प्रयत्नांसाठी अभिनंदन केले.
हे भगवान स्वामी नारायण यांच्या तपश्चर्येचे फळ होते, ज्यामुळे कामगारांचे संकल्प सहजतेने पूर्ण करण्यात मदत झाली, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. ते पुढे म्हणाले की भगवान स्वामी नारायण यांनी प्रत्येक जीवाची, प्रत्येक दुःखी व्यक्तीची काळजी घेतली आणि त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण मानव कल्याणासाठी समर्पित केला. ते पुढे म्हणाले की, भगवान स्वामी नारायण यांनी स्थापित केलेली मूल्ये बीएपीएसद्वारे जगभर पोहोचवली जात आहेत. बीएपीएसच्या कार्याचे वर्णन करण्यासाठी मोदी यांनी एका कवितेतील काही ओळी म्हणून दाखवल्या.
बालपणापासून बीएपीएस आणि भगवान स्वामी नारायण यांच्याशी जोडले जाण्याचे भाग्य लाभल्याचे सांगून मोदी म्हणाले की, त्यांना प्रमुख स्वामी महाराजांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी हीच त्यांच्या जीवनाची पुंजी होती. प्रमुख स्वामीजींचे अनेक वैयक्तिक अनुभव त्यांना असून ते त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. मोदी म्हणाले की, गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर भारताचे पंतप्रधान होण्यापूर्वी प्रमुख स्वामीजींनी त्यांच्या प्रवासात प्रत्येक क्षणी त्यांना मार्गदर्शन केले. नर्मदेचे पाणी साबरमतीत आले तेव्हा परमपूज्य प्रमुख स्वामीजी स्वत: आशीर्वाद देण्यासाठी आले होते, या ऐतिहासिक प्रसंगाची आठवण मोदी यांनी सांगितली. स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली स्वामीनारायण महामंत्र महोत्सव आणि स्वामी नारायण मंत्रलेखन महोत्सव आयोजित करतानाचे अविस्मरणीय क्षणही त्यांनी कथन केले. ते पुढे म्हणाले की स्वामीजींच्या त्यांच्याबद्दल असलेल्या आध्यात्मिक प्रेमामुळे त्यांना पुत्रभावनेची वात्सल्यपूर्ण अनुभूती मिळाली. पंतप्रधान म्हणाले की, जनकल्याणाच्या कामात आपल्याला नेहमीच प्रमुख स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळाला.
‘सेवा परमो धर्म’, म्हणजेच सेवा हा सर्वात मोठा धर्म मानला जातो, हे संस्कृत वचन उद्धृत करून पंतप्रधान म्हणाले की, हे केवळ शब्द नव्हे, तर आपली जीवनमूल्ये आहेत आणि सेवेला श्रद्धा, आस्था आणि उपासनेपेक्षा वरचे स्थान देण्यात आले आहे. लोकसेवा ही जनतेच्या सेवेसमान आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले की, सेवा म्हणजे ती भावना ज्यामध्ये आत्मभान नसते आणि ती व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रवासाला दिशा देते आणि कालांतराने त्या व्यक्तीला बळकट करते. जेव्हा हीच सेवा नियोजनबद्ध पद्धतीने लाखो कार्यकर्त्यांसह संघटित स्वरूपात केली जाते तेव्हा आश्चर्यकारक परिणाम प्राप्त होतात, असे ते पुढे म्हणाले. अशा प्रकारच्या संस्थात्मक सेवेत समाजातील व देशातील अनेक दुष्कृत्यांचे समूळ उच्चाटन करून मोठ्या समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की जेव्हा लाखो कार्यकर्ते एका समान उद्देशाने जोडले जातात तेव्हा ते देश आणि समाजाची एक मोठी शक्ती म्हणून रूपांतरित होतात. आज देश जेव्हा विकसित भारताचे ध्येय घेऊन पुढे जात आहे, तेव्हा स्वाभाविकपणे लोक एकत्र येत आहेत आणि प्रत्येक क्षेत्रात काहीतरी मोठे करण्याची भावना दिसून येत आहे, असे मोदी म्हणाले. स्वच्छ भारत मिशन, नैसर्गिक शेती, पर्यावरणाबाबत जागरूकता, मुलींचे शिक्षण, आदिवासी कल्याणाचा प्रश्न या उदाहरणांचा दाखला देत मोदी यांनी देशातील जनता पुढे येऊन राष्ट्र उभारणीच्या कार्याला पुढे नेत असल्याचा आनंद व्यक्त केला. सर्व कार्यकर्त्यांनी संकल्प घेऊन समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी नैसर्गिक शेती, विविधतेत एकतेची भावना, तरुणांचे संरक्षण करण्यासाठी अमली पदार्थांविरुद्ध लढा, नद्यांचे पुनरुज्जीवन किंवा पृथ्वीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी शाश्वत जीवनशैली यासारख्या अनेक विषयांवर काम करण्याचे आवाहन केले. भारताने संपूर्ण जगाला दिलेल्या मिशन LiFE च्या संकल्पनेची सत्यता आणि प्रभाव सिद्ध करण्याचे आवाहन मोदी यांनी कार्यकर्त्यांना केले. भारताच्या विकासाला गती देणाऱ्या वोकल फॉर लोकल, एक पेड माँ के नाम, फिट इंडिया, मिलेट्स यांसारख्या मोहिमांना सक्रियपणे प्रोत्साहन, यात योगदान देण्याविषयी त्यांनी सुचविले.
जानेवारी 2025 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग'मध्ये भारतातील तरुण त्यांच्या कल्पना मांडतील आणि विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांच्या योगदानाची रूपरेषा तयार करतील, असे मोदी म्हणाले. त्यांनी सर्व तरुण कार्यकर्त्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले. भारताच्या कुटुंब संस्कृतीवर परमपूज्य प्रमुख स्वामी महाराजांचा विशेष भर होता, हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी ‘घर सभे’च्या माध्यमातून समाजात एकत्रित कुटुंबाची संकल्पना त्यांनी अधिक बळकट केल्याचे अधोरेखित केले. या मोहिमा पुढे नेण्याचे आवाहन मोदी यांनी कार्यकर्त्यांना केले. आज भारत 2047 पर्यंत विकसित होण्याच्या ध्येयावर काम करत आहे, असे सांगून ते म्हणाले की, पुढील 25 वर्षांचा देशाचा प्रवास हा भारतासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो प्रत्येक बीएपीएस कार्यकर्त्यासाठी आहे. आपल्या भाषणाचा समारोप करताना मोदी यांनी भगवान स्वामी नारायण यांच्या आशीर्वादाने बीएपीएस कार्यकर्त्यांची ही सेवा मोहीम निरंतर सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.