“ही वेळ भारताची आहे”
“आज भारतासमोर, एकविसाव्या शतकातल्या या दशकातला हा काळ अभूतपूर्व आहे.”
“2023 या वर्षातील पहिल्या 75 दिवसातल्या भारताच्या उपलब्धी,ही भारताची वेळ असल्याचेच प्रतिबिंबित करतात.”
“आज भारतीय संस्कृती आणि आपल्या सुप्त शक्तीचे संपूर्ण जगाला अभूतपूर्व असे आकर्षण आहे.”
“जर देशाला पुढे जायचे असेल, तर त्यात कायम गतिमानता आणि धाडसी निर्णय घेण्याची ताकद असायला हवी”
“आज देशबांधवांमध्ये हा विश्वास निर्माण झाला आहे, की सरकारला त्यांची काळजी आहे”
“आम्ही प्रशासनाला एक मानवी चेहरा दिला आहे.”
“आज देश जे साध्य करतो आहे, त्यामागे देशाच्या लोकशाहीची ताकद आहे, आपल्या संस्थांची ताकद आहे.”
“भारताची ही वेळ आपण, ‘सबका प्रयास’ मधून अधिक मजबूत करायला हवी आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात विकसित भारताचा प्रवास अधिक सक्षम करायला हवा”

नवी दिल्लीत हॉटेल ताज पॅलेस मध्ये झालेल्या ‘इंडिया टूडे कॉनक्लेव्ह’ (परिषद) ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.

यावेळी बोलतांना, या परिषदेची संकल्पना, “द इंडिया मोमेंट” म्हणजे ‘भारताची वेळ’ अशी निवडल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. आणि जगभरातील अर्थतज्ञ, विश्लेषक आणि विचारवंत यांचे देखील हेच मत आहे, की हा काळ भारताचा काळ आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.इंडिया टूडे समुहानेही हाच आशावाद आपल्या परिषदेतून व्यक्त करणे, हे विशेष आहे, असेही ते पुढे म्हणाले. 20 महिन्यांपूर्वी, आपण स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणाचे स्मरण करत,पंतप्रधान म्हणाले, “तेव्हा मी सांगितलंच होतं, हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे.” हा भारताचा काळ आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.

भारताला एक राष्ट्र म्हणून विकसित करण्याच्या या प्रवासात, विविध टप्प्यावर असलेल्या आव्हानांविषयी बोलतांना ते म्हणाले, 21 व्या शतकातील ह्या दशकाचा हा काळ, भारतासाठी विशेष महत्वाचा आहे. गेल्या काही काळात विकसित राष्ट्र झालेल्या देशांमध्ये असलेली विविध परिस्थिती अधोरेखित करत, पंतप्रधान म्हणाले की, या देशांच्या यशाचे कारण हे होते की, त्यांनी जागतिक स्पर्धेचा अभाव असलेल्या जगात, स्वतःशीच स्पर्धा केली. आज भारतासमोर असलेली परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे, कारण आज आपल्या समोर असलेली जागतिक आव्हाने, सर्वंकष स्वरूपाची असून ती विविध मार्गांनी पुढे येत आहेत. आज ‘भारताची वेळ’ या संकल्पनेवर जगभरात चर्चा होत आहे, ही साधारण गोष्ट नाही. विशेषत: आज जेव्हा शतकातून एखादवेळीच होणाऱ्या एवढ्या मोठ्या महामारीचा फटका जगाला बसला असून, त्या पाठोपाठ दोन देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाची झळ जगाला बसली आहे. “ आज एक नवा इतिहास रचला जात आहे,आणि  आपण सगळे एकत्रितपणे त्याचे साक्षीदार होत आहोत”, असे पंतप्रधान म्हणाले. आज जग भारतावर विश्वास व्यक्त करत आहे.

जागतिक पातळीवर भारताच्या यशाची मालिकाच सांगतांना पंतप्रधान म्हणाले, की आज भारत जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी आर्थव्यवस्था आहे, स्मार्टफोन डेटा वापरात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश आहे, तसेच जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्ट अप व्यवस्था आज भारतात आहे.

वर्ष 2023 मधील पहिल्या 75 दिवसांतील देशाच्या उपलब्धीवर प्रकाश टाकतांना, पंतप्रधान म्हणाले, की याच काळात भारताचा ऐतिहासिक हरित अर्थसंकल्प मांडला गेला, कर्नाटकच्या शिवमोग्गा इथं नवे विमानतळ सुरु करण्यात आले, मुंबई मेट्रोचा दूसरा टप्पा सुरु झाला. जगातील सर्वात मोठ्या नदीवरील क्रूझ ने आपला प्रवास पूर्ण केला, बंगळुरू-म्हैसूर द्रुतगती मार्गाचे उद्घाटन झाले, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या एका टप्प्याचे उद्घाटन झाले. मुंबई ते विशाखापट्टणम वंदे भारत गाड्या सुरु झाल्या. धारवाडच्या आयआयटी परिसराचे उद्घाटन झाले आणि देशाने अंदमान निकोबार बेटांना 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण साध्य केल्यानंतर भारताने E-20 इंधनाची सुरुवात केली. तुमकुरु येथे आशियातील सर्वात प्रगत हेलिकॉप्टर उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले आणि एअर इंडियाने विमानांची आतापर्यंतची सर्वात मोठी मागणी (ऑर्डर) दिली. गेल्या 75 दिवसांत, भारतात ई-संजीवनी अॅपद्वारे 10 कोटी ई-वैद्यकीय सल्ले पूर्ण करण्याचा टप्पा गाठला गेला आहे. 8 कोटी कुटुंबात नवीन नळजोडणी देण्यात आली आहे, रेल्वे जाळ्याचे 100 टक्के विद्युतीकरण झाले आहे, 12 आणखी चित्ते कुनो नॅशनल पार्क मध्ये आले आहेत, भारताच्या महिला संघाने 19 वर्षांखालील T20 विश्वचषक जिंकला तसेच दोन ऑस्कर जिंकल्याचा आनंदही देशाने याच काळात अनुभवला. गेल्या 75 दिवसांत, G20 च्या 28 महत्त्वाच्या बैठका झाल्या, ऊर्जा शिखर परिषद आणि जागतिक भरड धान्य परिषदही झाली. आणि बेंगळुरू येथील एरो इंडिया प्रदर्शनात शंभरहून अधिक देशांनी भाग घेतला, अशी माहितीही त्यांनी दिली. सिंगापूरसोबत युपीआय व्यवहार जोडणी तयार करण्यात आली. तुर्कीएला मदत करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ सुरू केले आणि भारत-बांगलादेश गॅस पाइपलाइनचे उद्घाटन तर आजच संध्याकाळी करण्यात आले, अशी माहितीही त्यांनी दिली. “या सगळ्या उपलब्धी, ही वेळ भारताची असल्याचेच प्रतिबिंबित करतात” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. 

आजच्या भारतात, एकीकडे भारत जागतिक पायाभूत सुविधा, जसे की रस्ते, रेल्वे, बंदरे आणि विमानतळे बांधण्याचे काम वेगाने सुरु आहे, तर दुसरीकडे, भारतीय संस्कृती आणि देशाची सुप्त शक्ती याविषयी जगभरात आकर्षण निर्माण झाले आहे. “आज योगशास्त्र जगभरात अधिक लोकप्रिय झाले आहे. आज लोकांमध्ये आयुर्वेदाविषयी उत्साह आहे, तसेच भारतीय खाद्यसंस्कृती विषयी देखील उत्साह आहे.” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

भारतीय चित्रपट आणि संगीत देखील आपल्या नव्या ऊर्जेने लोकांचे लक्ष आकर्षित करत आहेत. भारतातील भरड धान्ये-श्री अन्न देखील आता लोकांपर्यंत पोहोचत आहे, असे मोदी यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असो किंवा आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी युती असो, ‘जागतिक कल्याणा’साठी भारताच्या कल्पना आणि क्षमता जगाने ओळखल्या आहेत यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. “म्हणूनच आज जग म्हणत आहे – ही भारताची वेळ आहे.”, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. या सर्व गोष्टींवर हा आणखी व्यापक प्रभाव पडत असून  त्याचेच फळ म्हणजे अनेक देश भारतातून चोरून नेलेल्या प्राचीन मूर्ती आज स्वतःहून परत देत आहेत.

“भारताची वेळ या संकल्पनेतील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे, आज सरकारच्या वचनांना कामगिरीची जोड मिळाली आहे. आज प्रसारमाध्यमे कोणते मथळे देतात, आज काल कोणते मथळे असत, यांची त्यांनी तुलना केली. गेल्या काळातल्या ठळक बातम्या, भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या असत, त्याविरोधात रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या लोकांच्या असत. पण आजच्या ठळक बातम्यामध्ये, भ्रष्टाचार केल्यावर कारवाई करणाऱ्या संस्थांविरोधात, आंदोलन करणाऱ्यांच्या बातम्या होतात, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काळात, या घोटाळ्यांच्या बातम्या करुन, माध्यमांनी मोठा टीआरपी मिळवला होता, अशी मिष्किल टिप्पणी त्यांनी केली. आता याच माध्यमांना भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्याच्या बातम्या देऊन, आपला टीआरपी वाढवण्याची संधी मिळाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पूर्वी शहरांमध्ये बॉम्बस्फोट आणि नक्षलवादी कारवायांच्या घटनांच्या बातम्या येत असत.  मात्र आज शांतता आणि समृद्धीच्या बातम्या आहेत. पूर्वी पर्यावरणाच्या नावाखाली मोठमोठे पायाभूत प्रकल्प थांबवले जात असल्याच्या बातम्या येत असत, तर आज नवीन महामार्ग आणि द्रुतगती मार्ग बांधण्याबरोबरच पर्यावरणाशी संबंधित सकारात्मक बातम्या येत असल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

ते पुढे म्हणाले की दुर्दैवी रेल्वे अपघातांच्या बातम्या यापूर्वी सामान्य होत्या , मात्र आता आधुनिक रेल्वे गाड्या सुरू झाल्यामुळे हे अपघात कमी झाल्याचे  मथळ्यांमध्ये दिसून येत  आहे.  एअर इंडिया घोटाळे आणि गरिबीचा उल्लेख करत ते म्हणाले की आज जगातल्या सर्वात मोठ्या विमान व्यवहाराच्या बातमीचा हल्ली मथळा असतो. “भारतीय मोमेंट अर्थात ही वेळ भारताची आहे या उक्तीमुळे वचन आणि कामगिरीतला हा बदल घडून आला आहे” असं ते पुढे म्हणाले. देशात आज  आत्मविश्वास आणि दृढ निर्धार पुरेपूर  असतानाच आणि इतर देशही भारताबाबत आशावादी असताना भारताला अवमानकारक वागणूक देत भारताचं नैतिक खच्चीकरण करणाऱ्या नकारात्मक चर्चा होत  आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भारताने गुलामगिरीच्या काळात दीर्घकाळ गरीबी पाहिली आहे याकडे लक्ष वेधत पंतप्रधान म्हणाले की, “भारतातल्या गरीबाला लवकरात लवकर गरीबीतून बाहेर पडायचं आहे. आपल्या भविष्यातल्या पिढ्यांबरोबरच त्याला त्याचं जीवनमान बदलायचं आहे.” पंतप्रधान म्हणाले की सर्व सरकारांचे प्रयत्न हे त्यांची क्षमता आणि समज यावर आधारित होते. सध्याच्या सरकारला नवीन परिणाम घडवायचे होते आणि त्यामुळे त्यांनी आपला वेग आणि व्याप्ती वाढवल्याचे त्यांनी अधोरेखित केलं. विक्रमी वेगानं 11 कोटी शौचालयं बांधणं, 48 कोटी लोकांना बँकिंग प्रणालीशी जोडणं, पक्क्या घरांचे पैसे लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट जमा करणं अशी काही उदाहरणं त्यांनी यावेळी दिली.     घर बांधण्याच्या पूर्ण प्रक्रियेचं सातत्याने निरीक्षण केलं जात होतं आणि या घरांची भौगोलिक स्थान निश्चितीही केली जात होती असं ते पुढे म्हणाले. गेल्या नऊ वर्षात तीन कोटीहून अधिक घरं बांधून  ती गरिबांना हस्तांतरित केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. या घरांमध्ये महिलांनाही मालकी हक्क असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. भारतात गरीब महिलांना सक्षम वाटेल तो क्षण येईलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जगभरात संपत्तीच्या अधिकारांच्या आव्हानांबाबत विचार करताना, पंतप्रधानांनी जागतिक बँकेच्या अहवालाचा दाखला दिला ज्यात माहिती दिली आहे की जगातील केवळ 30 टक्के लोकसंख्येने त्यांच्या मालमत्तेची कायदेशीर नोंद केली आहे. जागतिक विकासासमोर मालमत्ता अधिकारांचा अभाव हा एक मोठा अडथळा मानला जात असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. अडीच वर्षांपूर्वी पी एम स्वामित्व योजनेची सुरुवात झाली ज्यात जमिनीचं मोजमाप हे ड्रोन तंत्रज्ञानाच्या आधाराने केलं गेलं यावर त्यांनी भर दिला. आतापर्यंत भारतातल्या दोन लाख चौतीस हजार गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण झालं असून एक कोटी बावीस लाख प्रॉपर्टी कार्ड वितरित केल्याची माहिती त्यांनी दिली. “अशा प्रकारच्या अनेक मूक क्रांती आज देशात होत असून त्यामुळे इंडिया मोमेंटचा पाया रचला जात आहे” असं पंतप्रधान म्हणाले. पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून जवळजवळ अडीच लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केले असून याचा लाभ भारतातल्या 11 कोटी छोट्या शेतकऱ्यांना झाल्याची माहिती त्यांनी दिली.

“धोरणात्मक निर्णय ठप्प होणे आणि जैसे थे परिस्थिती राहणे हे देशाच्या प्रगतीतले मोठे अडथळे आहेत” असं पंतप्रधान म्हणाले. ठराविक कुटुंबांची कालबाह्य विचारसरणी तसंच दृष्टिकोन आणि मर्यादा यामुळे देशात दीर्घकाळ स्तब्धता राहिली याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले की जर देशाला पुढे जायचं असेल तर नेहमी गतिशीलता आणि धाडसी निर्णय क्षमता असणे  गरजेचं आहे, जर देशाला प्रगती साध्य करायची असेल तर नवीन गोष्टींचा स्विकार करण्याची क्षमता हवी आणि प्रयोगशील मानसिकता असणं आवश्यक आहे, देशवासियांची क्षमता आणि बुद्धिमत्तेबाबत दृढ विश्वास असायला हवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचे आशीर्वाद आणि ध्येय निश्चितीत सहभाग असायला हवा असं ते म्हणाले.  समस्यांवर केवळ सरकारच्या आणि सत्तास्थानांच्या माध्यमातून पर्याय शोधण्याने केवळ मर्यादित निकाल हाती येतात पण जेव्हा 130 कोटी देशवासीयांचं सामर्थ्य गतीशील होतं, जेव्हा प्रत्येकाचे प्रयत्न एकत्र येतात तेव्हा देशासमोर कोणतीही समस्या राहू शकत नाही हे त्यांनी अधोरेखित केलं. देशातल्या जनतेचा सरकारवर विश्वास असायला हवा हे त्यांनी अधोरेखित केलं आणि आज नागरिकांमध्ये सरकार बाबत हे सरकार आपली काळजी घेत आहे असा विश्वास निर्माण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. सुप्रशासनात मानवी स्पर्श आणि संवेदनशीलता असल्याचं पंतप्रधान म्हणाले आम्ही प्रशासनाला मानवी स्पर्श दिला आणि तेव्हाच एवढा मोठा परिणाम घडून येऊ शकतो असे ते म्हणाले. व्हायब्रंट व्हिलेज योजनेचं उदाहरण देत ते पुढे म्हणाले की ही योजना लोकांमध्ये आत्मविश्वास चेतवणारी असून देशातले पहिले गाव म्हणून या क्षेत्राच्या विकासाला प्राथमिकता दिल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकार मधले मंत्री नियमितपणे ईशान्य भागाला भेट देत असून त्यांनी प्रशासनाबरोबर मानवी स्पर्शाचा दुवा जोडला असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी सांगितलं की त्यांनी स्वतः ईशान्य भारताला पन्नास वेळा भेट दिली आहे. अशा प्रकारची संवेदनशीलता केवळ ईशान्येकडचं अंतर कमी करत नाही तर मोठ्या प्रमाणावर शांतता निर्माण करण्यातही सहाय्यभूत ठरत  असल्याचं त्यांनी सांगितलं. युक्रेन संघर्षाच्या काळातल्या सरकारच्या  कार्य संस्कृतीवर त्यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले की सरकार सुमारे 14 हजार कुटुंबांच्या संपर्कात होतं आणि त्यांनी सरकारचा प्रतिनिधी प्रत्येक घरात पाठवला होता. या कठीण प्रसंगी सरकार त्यांच्याबरोबर आहे याचा विश्वास आम्ही त्यांच्या मनात जागवला असं ते म्हणाले. मानवी संवेदनशीलता जागरूक असलेल्या प्रशासनामुळे इंडिया मोमेंटला गती मिळते असा त्यांनी सांगितलं. अशा प्रकारचा मानवी स्पर्श प्रशासनाकडे नसता तर कोरोना विरूद्धचं महायुद्ध कधीही जिंकता आलं  नसतं हे त्यांनी अधोरेखित केलं. भारत आज जे काही साध्य करत आहे ते लोकशाहीच्या सामर्थ्यामुळे आणि आपल्या संस्थांच्या सामर्थ्यामुळे असंल्याचं मोदी यावेळी म्हणाले. लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेलं सरकार निर्णायक निर्णय घेत असण्याला जग साक्षी आहे असं मोदी यांनी सांगितलं.  गेल्या काही वर्षात भारतानं अनेक नवीन संस्था निर्माण केल्या असं त्यांनी सांगितलं आणि आंतरराष्ट्रीय सौर युती आणि आपत्ती निवारक पायाभूत सुविधांची निर्मिती ही काही उदाहरणे त्यांनी दिली. भविष्याचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात नीती आयोगाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. देशात कॉर्पोरेट प्रशासन बलशाली करण्यात राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून भारतात आधुनिक करप्रणाली निर्माण करण्यात जीएसटी परिषदेची अहम भूमिका असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. कोरोना काळातही देशात अनेक निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्याचं त्यांनी सांगितलं. जागतिक आर्थिक आणीबाणीच्या काळात आज भारताची अर्थव्यवस्था सशक्त असून बँकिंग प्रणाली सामर्थ्यवान असल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही आपल्या संस्थांची ताकद असल्याचं ते म्हणाले. सरकारनं आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या 220 कोटी मात्रा  दिल्याचं त्यांनी सांगितलं. आपली लोकशाही आणि आपल्या लोकशाही संस्थांवर अशा प्रकारांमुळे मोठे आघात होत असल्याचं ते म्हणाले. पण अशा आघातांमधून सुद्धा भारत आपल्या उद्दिष्टाकडे वेगाने वाटचाल करत आपली उद्दिष्ट साध्य करेल अशी मला खात्री आहे असं त्यांनी पुढे सांगितलं. आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी भारतीय माध्यमांची भूमिका जगभरात व्यापक होण्याची गरज व्यक्त केली. स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव मध्ये ‘सबका प्रयास’ ची कास धरत आपण इंडिया मोमेंट सामर्थ्यशील करतानाच विकसित भारताचा प्रवास आणखी बलवान केला पाहिजे असा संदेश पंतप्रधानांनी दिला.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage