वस्तू उपभोगाची आपली पद्धत तपासण्याची आवश्यकता असून पर्यावरणावर होणारा त्याचा परिणाम आपण कसा कमी करू शकतो याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यासंदर्भातल्या अनेक आव्हानांवर तोडगा काढण्याच्या दिशेने चक्राकार अर्थव्यवस्था हे महत्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले. भारत - ऑस्ट्रेलिया चक्राकार अर्थव्यवस्था हॅकेथॉनच्या समारोप कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे ते संबोधित करत होते.
वस्तूंचे रिसायकलिंग आणि पुनर्वापर करणे, अपव्यय टाळणे आणि संसाधन क्षमता सुधारणे हा आपल्या जीवन शैलीचा भाग व्हायला हवा. हॅकेथॉनमध्ये सादर झालेल्या नवोन्मेशी कल्पनांमुळे, चक्राकार अर्थव्यवस्थेबाबत आघाडीची भूमिका घेण्यासाठी या दोन देशांना प्रेरणा मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या कल्पना मोठ्या प्रमाणात साकारण्यासाठी मार्ग शोधण्याचे आवाहन त्यांनी केले. पृथ्वी मातेकडून मिळत असलेल्या वस्तूंचे आपण मालक नव्हे तर भविष्यातल्या पिढ्यांसाठीचे केवळ विश्वस्त आहोत याचा विसर आपल्याला पडता कामा नये असे त्यांनी सांगितले.
हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या युवा सहभागींचा उत्साह आणि चैतन्य म्हणजे भारत- ऑस्ट्रेलियाच्या भविष्यातल्या भागीदारीचे प्रतिक आहे. कोविड पश्चात जगाला आकार देण्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मजबूत भागीदारी महत्वाची भूमिका बजावेल.आपले युवक, आपले युवा नवोन्मेशी,आपले स्टार्ट अप या भागीदारीच्या अग्रस्थानी असतील असे पंतप्रधान म्हणाले.