पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील म्हैसूर येथील म्हैसूर विद्यापीठात ‘प्रोजेक्ट टायगर’च्या 50 व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स (IBCA) म्हणजेच, मार्जार कुळातील मोठ्या वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठीचे आंतरराष्ट्रीय सहकार्य या मोहिमेचा देखील प्रारंभ केला. यावेळी त्यांनी विविध साहित्य प्रकाशित केले. ‘अमृत काल का व्हिजन फॉर टायगर कॉन्झर्वेशन’ हे पुस्तक तसेच व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापनाच्या पाचव्या फेरीचा सारांश अहवाल आणि अखिल भारतीय व्याघ्र अंदाज (पाचवी फेरी)चा सारांश अहवाल प्रसिद्ध केला. यासोबतच त्यांनी भारतातील वाघांची संख्या घोषित केली. व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी एक विशेष नाणेही जारी केले.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारतातील वाघांच्या वाढत्या संख्येच्या गौरवपूर्ण क्षणाचा उल्लेख केला आणि वाघांना उभे राहून मानवंदना दिली. व्याघ्र प्रकल्पाला आज 50 वर्षे पूर्ण होत असून या ऐतिहासिक घटनेचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत आणि प्रकल्पाचे हे यश केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. भारताने केवळ वाघांची संख्या कमी होणे रोखले नाही, तर वाघांची भरभराट होऊ शकेल अशी परिसंस्थाही उपलब्ध करून दिली आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात जगातील एकूण वाघांपैकी 75% वाघांचा अधिवास भारतात असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. भारतातील व्याघ्र प्रकल्प 75,000 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापत असून गेल्या दहा ते बारा वर्षांत देशातील वाघांची संख्या 75 टक्क्यांनी वाढली आहे, हा निव्वळ योगायोग असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
इतर देशात वाघांची संख्या एकतर स्थिर असताना किंवा कमी होत असताना इतर देशांच्या तुलनेत भारतातील वाघांची संख्या वाढत आहे, याबाबत जगभरातील वन्यजीवप्रेमींच्या मनात असलेल्या प्रश्नाचा पुनरुच्चार करताना याचे उत्तर भारताच्या परंपरा आणि संस्कृतीमध्ये तसेच जैवविविधता आणि पर्यावरणाकडे भारतीयांचा नैसर्गिक कल यामध्येच दडलेले आहे, असे ते म्हणाले.
“भारत पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यातील संघर्षावर विश्वास न ठेवता दोन्हीच्या सहअस्तित्वाला समान महत्त्व देतो”, असे पंतप्रधानांनी सांगितले. भारताच्या इतिहासातील वाघांचे महत्त्व लक्षात घेऊन पंतप्रधानांनी मध्य प्रदेशातील दहा हजार वर्ष जुन्या गुहेतील चित्रात वाघांचे चित्रण आढळून आल्याचा उल्लेख केला. मध्य भारतातील भारिया समाज आणि महाराष्ट्रातील वारली समाज वाघाची पूजा करतात तर भारतातील अनेक समुदाय वाघाला मित्र आणि भाऊ मानतात, असेही त्यांनी सांगितले. माँ दुर्गा आणि भगवान अयप्पा देखील वाघावर स्वार असतात याची त्यांनी आठवण करून दिली.
वन्यजीव संरक्षणात भारताच्या अनोख्या कामगिरीचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, “भारत हा असा देश आहे जिथे निसर्गाचं संरक्षण करणे हा संस्कृतीचा भाग मानला जातो.” जगाच्या भूभागापैकी भारताकडे केवळ दोन पूर्णांक चार शतांश टक्के एवढा भाग आहे, पण जागतिक ज्ञात जैवविविधतेत भारत आठ टक्के एवढं योगदान देत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताकडे जगातला सर्वात मोठा व्याघ्र संरक्षण प्रकल्प आहे. जवळजवळ तीस हजार एवढी संख्या असलेला आशियाई हत्तींचा सर्वात मोठा गजप्रकल्प भारतात आहे, सुमारे तीन हजार एवढी संख्या असलेले एकशिंगी गेंडे भारतात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. भारत हा जगातला एकमेव देश असा आहे की जिथे आशियाई सिंह असून त्यांची संख्या 2015 मधल्या 525 च्या तुलनेत 2020 मध्ये 675 वर पोहोचली आहे. भारतातील बिबट्यांच्या संख्येचाही त्यांनी उल्लेख केला. बिबट्यांची भारतातली संख्या चार वर्षात 60 टक्क्यांनी वाढल्याचं त्यांनी नमूद केलं. गंगा नद्यांसारख्या नदी स्वच्छता अभियानाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी अधोरेखित केलं की काही जलचर प्रजाती ज्या एकेकाळी असुरक्षित गणल्या जायच्या त्यांच्या संख्येत लक्षणीय प्रगती आढळून आली आहे. ही कामगिरी साध्य करण्यासाठी लोकसहभाग आणि वन्यजीव संवर्धन संस्कृतीला त्यांनी याचं श्रेय दिलं.
“वन्यजीव संपन्नतेसाठी परिसंस्था संपन्न होणं महत्त्वाचं असतं” असं पंतप्रधान म्हणाले. यासाठी भारताने केलेल्या कामगिरीचा त्यांनी उल्लेख केला. रामसर स्थळांच्या आपल्या यादीत भारताने 11 पाणथळ ठिकाणांची भर घालत रामसर स्थळांची संख्या 75 वर नेल्याचा उल्लेख त्यांनी केला. वर्ष 2019 च्या तुलनेत भारताने वर्ष 2021 पर्यंत वने आणि वृक्ष आच्छादित क्षेत्रात 2200 चौरस किलोमीटरहून अधिक वाढ केल्याचा उल्लेख त्यांनी केला. गेल्या दशकात राखीव सामुदायिक ठिकाणांमध्ये 43 वरून 100 पर्यंत वाढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं. तसंच, ज्यांच्या सभोवतालचा परिसर जैव संवेदनशील परिक्षेत्र म्हणून अधिसूचित केली आहेत अशा राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्यांची संख्या नऊ वरून 468 पर्यंत वाढल्याचं आणि ही वाढसुद्धा केवळ एका दशकातली असल्याचं त्यांनी सांगितलं.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना वन्यजीव संरक्षण करण्याच्या आपल्या अनुभवाच्या आठवणी त्यांनी त्यांनी यावेळी सांगितल्या. सिंहांची संख्या वाढण्यासाठी केलेल्या कामांचा त्यांनी उल्लेख केला. केवळ एका भूभागात काम करून वन्यजीवांचं संवर्धन केलं जाऊ शकत नाही यावर त्यांनी भर दिला. स्थानिक नागरिक आणि प्राणी यांच्यामध्ये भावनिक आणि आर्थिक नातेसंबंध निर्माण करण्याची गरज असल्यावर त्यांनी जोर दिला. गुजरातमध्ये वन्यजीव मित्र कार्यक्रम सुरू केल्याचा पंतप्रधानांनी अधोरेखित केलं ज्यात शिकारीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी प्रोत्साहनपर रोख पुरस्कार दिले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. गीरच्या अभयारण्यात सिंहांसाठी पुनर्वसन केंद्र तसंच वनविभागात महिला वनरक्षक आणि वनाधिकाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती त्यांनी दिली. गीरमध्ये आता पर्यटन आणि जैव पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन अनुकूल परिसंस्था निर्माण झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
व्याघ्र प्रकल्पाच्या यशाला अनेक आयाम आहेत असं सांगत, यामुळे पर्यटन विकास, जनजागृती मोहीमा यात वाढ होऊन व्याघ्र प्रकल्पांच्या ठिकाणी मानव-प्राणी संघर्ष कमी झाला असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. "वाघांच्या अस्तित्वामुळे सर्वच ठिकाणी स्थानिक लोकांचे जीवन आणि पर्यावरण यावर सकारात्मक परिणाम झाला आहे", असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.
नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या चित्त्यांचा संदर्भ देत चित्त्यांचे आंतरखंडीय आणि आंतरस्थानीय (ट्रान्स-कॉन्टिनेंटल ट्रान्सलोकेशन) यशस्वी स्थानांतरण झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. हाच चित्ता काही दशकांपूर्वी भारतातून नामशेष झाला होता, हे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. कुनो राष्ट्रीय उद्यानात काही दिवसांपूर्वी चित्त्याची चार सुंदर पिल्ले जन्माला आल्याचे त्यांनी स्मरण केले. सुमारे 75 वर्षांपूर्वी नामशेष होऊन पुनश्च भारताच्या भूमीवर चित्ता जन्माला आला आहे, असे ते यावेळी म्हणाले. जैवविविधतेच्या संरक्षण आणि समृद्धीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य करण्याच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी भर दिला.
“वन्यजीव संरक्षण हा एकाच देशाचा मुद्दा नसून तो वैश्विक आहे”, असे सांगत त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य स्थापन करण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांनी भर दिला. 2019 मध्ये, पंतप्रधानांनी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आशियातील शिकारी आणि अवैध वन्यजीव व्यापाराविरूद्ध एकत्रित येण्याचे आवाहन केले होते, अशी माहिती देत इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजेच व्याघ्र जमातींच्या प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठीचे आंतरराष्ट्रीय सहकार्य हा याच भावनेचा विस्तार आहे असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान पुढे म्हणाले की, यामुळे या मार्जार कुळातील प्राण्यांशी संबंधित संपूर्ण परिसंस्थेसाठी आर्थिक आणि तांत्रिक संसाधने एकत्रित करणे सोपे होईल; तसेच विविध देशांच्या अनुभवांतून संवर्धन आणि संरक्षण याविषयीचे धोरण सहजपणे लागू करता येईल.
“व्याघ्र जमातींच्या प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठीचे आंतरराष्ट्रीय केलेल्या सहकार्याचे उद्दिष्ट, वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबटे, प्यूमा, जग्वार आणि चित्ता यासह जगातील 7 प्रकारच्या व्याघ्र जमातींचे संवर्धन हे असेल”, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ज्या ज्या देशांत त्यांचा अधिवास आहे, ते देश या सहकार्याचा एक भाग असतील, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले. असे सदस्य देश त्यांचे अनुभव एकमेकांशी सामायिक करू शकतील, त्यांच्या सहकारी देशांना अधिक त्वरीत मदत करू शकतील आणि संशोधन, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीवर भर देत सहकार्य करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.ते पुढे म्हणाले, की “एकत्रितपणे आपण या प्रजातींना नामशेष होण्यापासून वाचवू शकू आणि एक सुरक्षित आणि सुदृढ परिसंस्था निर्माण करू,”.
भारताच्या जी 20 (G20) परिषदेच्या अध्यक्षपदाच्या काळातील ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या घोषवाक्यातून आपले पर्यावरण सुरक्षित राहिल्यास आणि आपली जैवविविधता सतत विस्तारत राहिल्यासच मानवतेसाठी एक चांगले भविष्य शक्य आहे हा संदेश अधिक व्यापक बनतो असे पंतप्रधान म्हणाले. “ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, ती संपूर्ण जगाची आहे”, असा पुनरुच्चार त्यांनी केला. कॉप 26 (COP26) परिषदेचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सांगितले की, भारताने मोठी आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केली आहेत आणि परस्पर सहकार्यावर विश्वास व्यक्त केला आहे ज्यामुळे पर्यावरण संरक्षणाचे प्रत्येक उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होऊ शकते.
याप्रसंगी उपस्थित असलेले परदेशी पाहुणे आणि मान्यवरांना भारतीय जीवनपद्धतीविषयी सांगत, पंतप्रधानांनी त्यांना भारताच्या आदिवासी समाजाच्या जीवन पद्धतीमधून आणि परंपरांमधून शिकवण घेण्याचे आवाहन केले. यावेळी पंतप्रधानांनी सह्याद्री आणि पश्चिम घाटातील आदिवासींचे वास्तव्य असलेल्या प्रदेशांचा उल्लेख केला. इथला आदिवासी समाज शतकानुशतके वाघांच्या संवर्धनासोबतच संपूर्ण जैवविविधता समृद्ध करण्यात कसे योगदान देत आहे याबद्दल सांगितले. निसर्गाकडून द्या आणि घ्या या समतोलाची आदिवासी समाजाची परंपरा इथे आपल्याला अंगीकारता येईल, असे ते म्हणाले. भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी ऑस्कर विजेता माहितीपट ‘द एलिफंट व्हिस्परर्स’चा उल्लेख केला. हा माहितीपट निसर्ग आणि प्राणी यांच्यातील अद्भुत नातेसंबंधाचा वारसा सांगणारा आहे, असे त्यांनी नमूद केले. "आदिवासी समाजाची जीवनशैली आपल्याला मिशन LiFE म्हणजेच 'पर्यावरण अनुकूल जीवनशैली' समजून घेण्यास खूप मदत करते, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
यावेळी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स (IBCA)ची घोषणा केली. जुलै 2019 मध्ये, पंतप्रधानांनी आशिया खंडात होणाऱ्या अवैध शिकारी आणि वन्यजीव व्यापाराला कठोरपणे आळा घालण्यासाठी जागतिक नेत्यांच्या, एकत्र घेण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांचे हे आवाहन लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स म्हणजेच मार्जार कुळातील मोठ्या वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठीचे आंतरराष्ट्रीय सहकार्य सुरू केले जात आहे, जी मार्जार कुळातील जगातील सात मोठ्या वन्यप्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धनावर लक्ष केंद्रित करेल. यामध्ये वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, प्यूमा, जग्वार आणि चित्ता, या प्राण्यांचा समावेश आहे. या प्रजातींना आश्रय देणारे देश या सहकार्याचे सदस्य असतील.
The success of Project Tiger is a matter of pride not only for India but for the whole world. pic.twitter.com/ucde8TPMZq
— PMO India (@PMOIndia) April 9, 2023
We do not believe in conflict between ecology and economy, but give importance to co-existence between the two. pic.twitter.com/hRv0xzsdK3
— PMO India (@PMOIndia) April 9, 2023
India is a country where protecting nature is part of culture. pic.twitter.com/0y3lLJMHeb
— PMO India (@PMOIndia) April 9, 2023
For wildlife to thrive, it is important for ecosystems to thrive.
— PMO India (@PMOIndia) April 9, 2023
This has been happening in India. pic.twitter.com/hSFkvGYlbj
Big Cats की मौजूदगी ने हर जगह स्थानीय लोगों के जीवन और वहां की ecology पर सकारात्मक असर डाला है। pic.twitter.com/L5E61uyQA3
— PMO India (@PMOIndia) April 9, 2023
Cheetahs had become extinct in India decades ago.
— PMO India (@PMOIndia) April 9, 2023
We brought this magnificent big cat to India from Namibia and South Africa.
This is the first successful trans-continental translocation of the big cat. pic.twitter.com/WLwHZXU8Gl
Protection of wildlife is a universal issue.
— PMO India (@PMOIndia) April 9, 2023
International Big Cat Alliance is our endeavour for protection and conservation of the big cats. pic.twitter.com/dLS3TRQGd4