पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिन्ही दलातील प्राथमिक प्रशिक्षण सुरु करणाऱ्या अग्नीवीरांच्या पहिल्या तुकडीला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.
या पथदर्शी अग्निपथ योजनेचे बिनीचे शिलेदार झाल्याबद्दल पंतप्रधानांनी अग्निवीरांचे अभिनंदन केले. आपल्या सशस्त्र दलांना अधिक बळकट करण्यात आणि त्यांना भविष्यासाठी सज्ज करण्यात ही परिवर्तनकारी योजना परिणामकारक ठरेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या युवा अग्नीवीरांमुळे भारताचे सशस्त्र दल अधिक उत्साहपूर्ण आणि तंत्रज्ञान स्नेही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अग्नीवीरांच्या क्षमतेबद्दल दृढ विश्वास व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले की त्यांच्यातील ऊर्जा सशस्त्र दलांच्या शौर्याचे प्रतिबिंब आहे ज्याने राष्ट्राचा ध्वज नेहमीच उंच फडकत ठेवला आहे.
नवा भारत नव्या जोमाने भरलेला असून आपल्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. 21 व्या शतकात युद्धाच्या स्वरूपात बदल होत आहेत, असे सांगून नव्याने उदयाला येत असलेल्या संपर्करहित युद्धपद्धतींमधील आणि सायबर युद्धामधील आव्हानांबद्दल चर्चा करताना पंतप्रधान म्हणाले की तांत्रिकदृष्ट्या प्रगत सैनिक आपल्या सशस्त्र दलांमध्ये महत्वाची भूमिका बजावतील. आपल्या वर्तमान पिढीतील युवावर्गाकडे तशी क्षमता आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळात आपले अग्नीवर सशस्त्र दलांमध्ये प्रमुख भूमिका बजावतील, असे ते म्हणाले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी अग्नीपथ योजना कशा प्रकारे लाभदायक आहे, याविषयी पंतप्रधानांनी चर्चा केली. महिला अग्नीवीर आपल्या कामगिरीने ज्या प्रकारे नौदलाची शान वाढवत आहेत, त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच आपण तिन्ही दलांमध्ये महिला अग्नीवीरांना पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. सियाचीनमध्ये तैनात असलेल्या महिला सैनिक आणि आधुनिक लढाऊ विमाने चालवणाऱ्या महिलांची उदाहरणे देत पंतप्रधानांनी विविध आघाड्यांवर महिला सशस्त्र दलांनी कशाप्रकारे नेतृत्व केले आहे याची आठवण करून दिली.
विविध भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तैनात झाल्यानंतर अग्नीवीरांना समृद्ध अनुभवांची शिदोरी तर मिळेलच शिवाय त्यांना या संधीचा लाभ त्या प्रदेशातील भाषा शिकून घेण्यात आणि तेथील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि जीवनशैली जाणून घेण्यात होईल, असे त्यांनी सांगितले. सांघिक कार्य आणि नेतृत्व कौशल्याचा सन्मान यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवा आयाम मिळेल, असे ते म्हणाले. अग्निवीरांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातले त्यांचे नैपुण्य अधिक वाढवण्यासाठी कार्य करत असताना नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक राहण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
पंतप्रधानांनी युवक आणि अग्निवीरांच्या क्षमतेचे कौतुक केले आणि 21 व्या शतकात तेच राष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत, असे सांगून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.