पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिडनी इथे ऑस्ट्रेलियातील प्रमुख कंपन्यांच्या कार्यकारी प्रमुखांच्या गोलमेज परिषदेला संबोधित केले. या बैठकीला, पोलाद, बँकिंग, ऊर्जा, खनिज आणि माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते. तसेच, ऑस्ट्रेलियातील आघाडीच्या विद्यापीठांचे कुलगुरु देखील या बैठकीला उपस्थित होते.
देशात, आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठी आणि उद्योग स्नेही वातावरण निर्मितीसाठी करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणा आणि उपक्रम यावेळी, पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. यात, पायाभूत दळणवळण सुविधा एकमेकांशी जोडण्यासाठीचे मिशन गती शक्ती अभियान, जन धन आधार मोबाईल त्रिसूत्री , राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, हायड्रोजन मिशन 2050, पीएलआय योजना, अवकाश आणि भू-अवकाश क्षेत्रे खाजगी गुंतवणूकीसाठी खुली करणे, वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी नवे धोरण, आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना इत्यादीची माहिती दिली.
पायाभूत सुविधा, ज्यात, डिजिटल पायाभूत सुविधासह पायाभूत क्षेत्र , माहिती तंत्रज्ञान, फीन-टेक, टेलिकॉम, सेमीकंडक्टर, अवकाश, अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन, शिक्षण, औषधनिर्माण, आरोग्यसेवा, वस्त्रोद्योग, कृषी आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रांमध्ये भारताने गुंतवणुकीच्या संधी खुल्या केल्या असून, सर्व कंपन्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आमंत्रण पंतप्रधानांनी दिले.
या सर्व क्षेत्रातील कंपन्यांनी भारतातील त्यांच्या समकक्ष कंपन्यांशी परस्पर लाभदायक अशी भागीदारी करावी, यासाठी पंतप्रधानांनी त्यांना प्रोत्साहन दिले.
Interacted with top CEOs during the business roundtable in Sydney. Elaborated on the business opportunities in India and the reform trajectory of our Government. Invited Australian businesses to invest in India. pic.twitter.com/vxxCY3P5ez
— Narendra Modi (@narendramodi) May 24, 2023