पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू होण्याआधी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नव्या संसदेत शपथविधी सोहळा होणार असल्याने आजचा दिवस संसदीय लोकशाहीसाठी अभिमानास्पद आणि गौरवशाली दिवस असल्याचे ते म्हणाले. आजच्या महत्त्वाच्या दिवशी आपण सर्व नवनिर्वाचित खासदारांचे मनःपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांचे अभिनंदन करतो, असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
18 व्या लोकसभेची स्थापना ही भारतातील सामान्य माणसाच्या संकल्पांची पूर्तता करण्याचे साधन असल्याचे ते म्हणाले. नवी गती देत आणि नवी उंची गाठण्यासाठी नव्या उत्साहाने सुरुवात करण्याची एक महत्त्वाची संधी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 18 व्या लोकसभेला आजपासून होत असलेली सुरुवात ही 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. देशात पार पडलेल्या जगातील सर्वात मोठ्या निवडणुकीचे भव्यतेने झालेले आयोजन ही 140 कोटी भारतीय नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे असे ते म्हणाले. या निवडणुकीत 65 कोटींपेक्षा जास्त मतदारांनी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत भाग घेतल्याची बाब त्यांनी नमूद केली. स्वातंत्र्यानंतर केवळ दुसऱ्यांदाच देशाने एखाद्या सरकारला सलग तिसऱ्यांदा काम करण्याचा जनादेश दिला आहे. 60 वर्षांनंतर ही संधी पहिल्यांदाच मिळाली असल्याने त्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
या सरकारला सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी निवडून दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी जनतेचे आभार मानले. जनतेची ही निवड म्हणजे सरकारचे हेतू, धोरणे आणि लोकांप्रती असलेल्या समर्पण भावनेवरचे शिक्कामोर्तबच आहे अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. गेल्या 10 वर्षांत आपण एक परंपरा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, कारण आमचा या गोष्टीवर विश्वास आहे की सरकार चालविण्यासाठी बहुमत आवश्यक असते, परंतु देश चालविण्यासाठी सहमती जास्त महत्वाची असते, असे पंतप्रधान म्हणाले. 140 कोटी नागरिकांच्या आशा - आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वसहमती साधत सर्वांना सोबत घेऊन भारत मातेची सेवा करण्यासाठी हे सरकार सातत्यपूर्णरितीने प्रयत्नशील असल्याची बाबही पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केली.
सर्वांना सोबत घेऊन भारताच्या संविधानाच्या मर्यादेत राहून निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी 18 व्या लोकसभेत शपथ घेतलेल्या तरुण खासदारांच्या संख्येबद्दल आनंद व्यक्त केला. भारतीय परंपरेनुसार 18 या संख्येच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सांगितले की, “गीतेचे 18 अध्याय आहेत ज्यात कर्म, कर्तव्य आणि करुणेचा संदेश आहे, पुराणे आणि उपपुराणांची संख्या 18 आहे, 18 ची मूळ संख्या 9 आहे जी परिपूर्णतेचे प्रतीक आहे, आणि भारताची कायदेशीर मतदानाची वयोमर्यादा 18 वर्षे आहे. “18 वी लोकसभा ही भारतासाठी अमृतकाळ आहे. या लोकसभेची निर्मिती हे देखील एक शुभ संकेत आहे”, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी सांगितले की उद्याची 25 जून ही तारीख आणीबाणीच्या काळाला 50 वर्ष होत असल्याचा उल्लेख करत ती तारीख भारतीय लोकशाहीवर एक काळा डाग आहे. मोदी म्हणाले की,”भारताची नवीन पिढी तो दिवस कधीही विसरणार नाही की जेव्हा भारतीय संविधान पूर्णपणे नाकारले गेले, लोकशाहीचे दमन केले गेले आणि देशाला कारागृहात रूपांतरित केले गेले.” त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी नागरिकांना भारताच्या लोकशाही आणि लोकशाही परंपरांचे संरक्षण करण्याचा संकल्प घेण्याचे आवाहन केले, जेणेकरून असे संकट पुन्हा कधीही येऊ नये. पंतप्रधान म्हणाले, "आम्ही एक उत्साहपूर्ण लोकशाही आणि सामान्य लोकांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याचा संकल्प करू, हा संकल्प भारतीय संविधानानुसार असेल."
लोकांनी सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी सरकारची निवड केल्यामुळे सरकारची जबाबदारी तिप्पट वाढली आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, सरकार पूर्वीपेक्षा तीनपट अधिक मेहनत करेल आणि तीनपट अधिक सकारात्मक परिणाम आणेल.
देशाच्या नव्याने निवडून आलेल्या खासदारांकडून उच्च अपेक्षा असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी सर्व खासदारांना लोककल्याण, लोकसेवा आणि जनहितासाठी शक्य तितक्या सर्व उपाययोजना करण्याचे आवाहन केले. विरोधी पक्षाच्या भूमिकेवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “लोक विरोधी पक्षाकडून त्यांनी पूर्णपणे त्यांची भूमिका बजावण्याची अपेक्षा करतात आणि लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धरून ठेवण्याची अपेक्षा करतात आणि मला आशा आहे की विरोधक त्या अपेक्षेला न्याय देतील”, मोदी यांनी घोषणांऐवजी प्रत्यक्ष कार्ये हवी आहेत हे अधोरेखित केले आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा सर्व खासदार प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त केला.
एक विकसित भारताची संकल्पना पूर्ण करण्याची आणि जनतेच्या विश्वासाला बळकटी देण्याची जबाबदारी सर्व खासदारांची आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “25 कोटी नागरिक गरीबीच्या जाळ्यातून बाहेर पडल्यामुळे भारताला त्यात लवकरच यश मिळेल आणि गरिबीतून मुक्तता मिळेल असा नवा विश्वास निर्माण झाला आहे. आपल्या देशातील लोक 140 कोटी नागरिक कठोर परिश्रम करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत म्हणूनच आपण त्यांना जास्तीत जास्त संधी देण्याची गरज आहे” यावर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की, “हे सदन संकल्पांचे सदन बनेल आणि 18 वी लोकसभा सामान्य नागरिकांच्या स्वप्नांची पूर्तता करेल.” शेवटी सर्व खासदारांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आणि त्यांना त्यांच्या नवीन जबाबदारीची पूर्तता अत्यंत समर्पणाने करण्याचे आवाहन केले.