गुजरातमध्ये रामकृष्ण मठात आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी पूजनीय श्रीमद स्वामी गौतमानंद जी महाराज यांच्यासह, रामकृष्ण मठ आणि मिशन संस्थेच्या देशविदेशातील आदरणीय संतांप्रती तसेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अन्य मान्यवरांप्रती अभीष्टचिंतन व्यक्त केले. तसेच माता शारदादेवी, गुरुदेव रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांना पंतप्रधान मोदी यांनी आदरांजली वाहिली. आजचा कार्यक्रम श्रीमद स्वामी प्रेमानंद महाराज यांच्या जयंतीदिनी आयोजित केला असल्याचा उल्लेखही करत त्यांनी त्यांनाही आदरांजली अर्पण केली.
"जगात सकारात्मक कार्य उभारण्यासाठी महान व्यक्तींनी त्यांची ऊर्जा सत्कारणी लावण्याचा प्रघात अनेक शतकांपासून पडलेला दिसून येतो" असे उदगार पंतप्रधानांनी यावेळी काढले. स्वामी प्रेमानंद महाराज यांच्या जयंतीला नव्या प्रार्थना सभागृहाची आणि लेखांबा येथील साधू-निवासाची उभारणी झाल्याने भारताच्या संतपरंपरेला आणखी बळ मिळाल्याची भावना मोदी यांनी व्यक्त केली. सेवा आणि शिक्षणाचा एक प्रवास सुरु होत आहे आणि येत्या अनेक पिढ्यांना त्याचा लाभ होणार आहे, अस विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री रामकृष्ण देव मंदिर, गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रुग्णालय आणि प्रवाशांसाठी धर्मशाळा अशा लोकहितकारी वास्तूंची उभारणी झाल्यामुळे आध्यात्मिकतेचा आणि मानवसेवेच्या मूल्याचा प्रसार करण्यास साहाय्य होईल, असेही त्यांनी सांगितले. संतांचा सहवास आणि अध्यात्मिक वातावरणाची त्यांना स्वतःला गोडी असल्याचे सांगत,पंतप्रधानांनी या सर्व उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
मोदी यांनी यावेळी साणंदमधील आठवणी जागवल्या. अनेक वर्षे उपेक्षित राहिलेल्या या भागाला आता चिर-प्रतीक्षित असा आर्थिक विकास अनुभवता येत आहे, असे सांगून, संतांच्या आशीर्वादाने, सरकारच्या प्रयत्न्नांनी व धोरणांनी ही विकासाची दिशा मिळाली आहे, असे उदगार त्यांनी काढले. काळाबरोबर समाजाच्या गरजा बदलत जातात असे मोदी यांनी नमूद केले. साणंद हे आर्थिक विकासाबरोबरच आध्यात्मिक विकासाचेही केंद्र झाले पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की संतुलित जीवनासाठी, पैशाबरोबर अध्यात्मदेखील तितकेच महत्त्वाचे असते. आपले साधूसंत आणि ऋषी यांच्या मार्गदर्शनाखाली सानंद आणि गुजरात याच दिशेने वाटचाल करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
कोणत्याही वृक्षाच्या फळाची क्षमता त्यातील बीजावरून ओळखली जाते अशी टिप्पणी करत पंतप्रधान म्हणाले की रामकृष्ण मठ हा असाच एक वृक्ष आहे ज्याच्या बीजांमध्ये स्वामी विवेकानंदांसारख्या महान तपस्वी व्यक्तीची अनंत उर्जा भरलेली आहे. या मठाच्या निरंतर विस्तारामागे हेच कारण आहे असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, मानवतेवर झालेला त्याचा परिणाम अगणित आणि अमर्याद आहे. रामकृष्ण मठाच्या केंद्रस्थानी असलेली संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला स्वामी विवेकानंदांना समजून घ्यावे लागेल आणि त्यांच्या संकल्पनांनुसार जीवन जगावे लागेल ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. ते पुढे म्हणाले की जेव्हा ते स्वामींच्या त्या संकल्पनांनुसार जीवन जगायला शिकले तेव्हा त्यांनी स्वतः या मार्गदर्शक प्रकाशाचा अनुभव घेतला आहे. रामकृष्ण मिशन आणि त्यातील संतांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांसह आपल्या जीवनाला कशी दिशा दिली याबद्दल मठातील संत जाणून आहेत. संतांच्या आशीर्वादाने आपण स्वतः देखील मिशनशी संबंधित अनेक कार्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे हे पंतप्रधानांनी अधोरेखित करून सांगितले. वर्ष 2005 मध्ये त्यांनी पूज्य स्वामी आत्मस्थानंदजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत रामकृष्ण मिशनकडे बडोदा येथील दिलाराम बंगला हस्तांतरित केला त्याबद्दलची आठवण सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की स्वामी विवेकानंदांनी देखील या बंगल्यात काही काळ व्यतीत केला होता.
काही काळ मिशनचे कार्यक्रम आणि महत्त्वाच्या घटनांमध्ये सहभागी होण्याचे सौभाग्य लाभल्याचे नमूद करत मोदी म्हणाले की आज जगभरात रामकृष्ण मिशनच्या 280 हून अधिक शाखा कार्यरत आहेत आणि भारतात रामकृष्ण तत्वज्ञानाशी संबंधित सुमारे 1200 आश्रम केंद्रे कार्यरत आहेत. ते पुढे म्हणाले की मानवतेच्या सेवेच्या निश्चयाचा पाया म्हणून हे आश्रम काम करत असून गुजरात फार पूर्वीपासून रामकृष्ण मिशनच्या सेवाभावी कार्याचा साक्षीदार आहे. काही दशकांपूर्वी सुरतला आलेल्या पुराच्या वेळी, मोरबी धरणाच्या अपघातानंतर, भूज येथे भूकंपानंतर झालेल्या विध्वंसाच्या वेळी आणि ज्या ज्या प्रसंगी गुजरातवर आपत्ती कोसळली अशा प्रत्येक वेळी रामकृष्ण मिशनशी संबंधित लोकांनी पुढे येऊन पीडितांची मदत केली आहे त्या घटनांचे वर्णन पंतप्रधानांनी केले. गुजरातमध्ये भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या 80 हून अधिक शाळांची पुनर्बांधणी करण्यात रामकृष्ण मिशनने दिलेल्या योगदानाचे स्मरण करून पंतप्रधान पुढे म्हणाले की गुजरातमधील जनतेला अजूनही ते सेवाभावी कार्य लक्षात आहे आणि ते त्यापासून प्रेरणा देखील घेत असतात.
स्वामी विवेकानंद यांचे गुजरातशी असलेले आध्यात्मिक संबंधाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की,त्यांच्या जीवन प्रवासात गुजरातने मोठी भूमिका बजावली. ते पुढे म्हणाले की,स्वामी विवेकानंदांनी गुजरातमध्ये अनेक ठिकाणी भेटी दिल्या होत्या आणि शिकागो जागतिक धर्म परिषदेबद्दल स्वामीजींना प्रथम गुजरातमध्येच माहिती मिळाली.
ते पुढे म्हणाले की गुजरातमध्येच त्यांनी अनेक धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केला आणि वेदांताच्या प्रचारासाठी स्वतःला तयार केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, 1891 मध्ये स्वामीजी पोरबंदरमधील भोजेश्वर भवनात अनेक महिने राहिले आणि तत्कालीन गुजरात सरकारने ही वास्तू रामकृष्ण मिशनकडे स्मारक मंदिर बांधण्यासाठी सोपवली होती.गुजरात सरकारने 2012 ते 2014 या काळात स्वामी विवेकानंद यांची 150 वी जयंती साजरी केली. तसेच गांधीनगर येथील महात्मा मंदिरात समारोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये देश-विदेशातील त्यांचे हजारो अनुयायी सहभागी झाले होते,याचे स्मरणही पंतप्रधान मोदी यांनी केले.स्वामीजींचा गुजरातशी असलेला ऋणानुबंधांच्या स्मरणार्थ गुजरात सरकार आता स्वामी विवेकानंद टुरिस्ट सर्किटच्या उभारणीसाठी ‘रूपरेषा ’ तयार करत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी समाधान व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद हे आधुनिक विज्ञानाचे खंदे समर्थक होते यावर प्रकाश टाकून पंतप्रधान म्हणाले की, विज्ञानाचे महत्त्व केवळ गोष्टी किंवा घटनांच्या वर्णनापुरते मर्यादित नाही, तर विज्ञानाचे महत्त्व आपल्याला प्रेरणा देण्यात आहे आणि ते आपल्याला पुढे घेवून जाते, याबद्दल आहे,असा स्वामी विवेकानंदांचा विश्वास होता. आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या वाढत्या वर्चस्वावर भर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताची ओळख जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था म्हणून बनली आहे.जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारत पावले टाकत आहे.पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात आधुनिक बांधकाम आणि समस्यांना पर्याय, उत्तर प्रदान करणे यासारख्या अनेक कामगिरीच्या माध्यमातून भारताला ओळखले जात आहे. भारताने जागतिक आव्हानांवर उपाय उपलब्ध करून देत आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, आजचा भारत ज्ञान, परंपरा आणि प्राचीन शिकवणींच्या बळावर पुढे जात आहे. "स्वामी विवेकानंदांचा असा विश्वास होता की,युवा शक्ती हा देशाचा कणा आहे."असे त्यांनी सांगितले. तरुणांच्या सामर्थ्याबद्दल स्वामी विवेकानंदांचे एक अवतरण सांगताना पंतप्रधान म्हणाले की, हीच वेळ आहे आणि ती जबाबदारी आपणच उचलली पाहिजे. ते पुढे म्हणाले की, भारताने आज अमृत कालचा नवा प्रवास सुरू केला आहे आणि विकसित भारताचा अतुलनीय संकल्प केला आहे. निर्धारित कालमर्यादेत आपण ध्येय गाठले पाहिजे यावर भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी “भारत हे जगातील सर्वात तरुण राष्ट्र आहे” यावर प्रकाश टाकला. ते पुढे म्हणाले की आज भारतातील तरुणांनी आपली कार्यकुशलता आणि क्षमता जगामध्ये सिद्ध केली आहे आणि भारतातील युवा शक्तीच जगातील मोठ्या कंपन्यांचे नेतृत्व करत आहे आणि भारताच्या विकासाची जबाबदारी घेतली आहे. आज देशाकडे वेळ आणि संधी आहे, हे अधोरेखित करून पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्र उभारणीच्या प्रत्येक क्षेत्रात नेतृत्वासाठी तरुणांना तयार करण्याची गरज व्यक्त केली.
तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांप्रमाणेच राजकारणातही आपल्या तरुणांनी देशाचे नेतृत्व करण्याची गरज असल्याचे ते पुढे म्हणाले. या दिशेने, 12 जानेवारी 2025 रोजी, स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी, जो युवा दिन म्हणून साजरा केला जातो, सरकार दिल्लीत युवा नेतृत्व संवादाचे आयोजन करत आहे, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. या संवादात देशातील दोन हजार निवडक तरुणांना आमंत्रित केले जाईल, तर भारतभरातून कोट्यवधी तरुण यात सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले. तरुणांच्या दृष्टीकोनातून विकसित भारताच्या संकल्पावर चर्चा केली जाईल आणि तरुणांना राजकारणाशी जोडण्याचा मार्गदर्शक आराखडा तयार केला जाईल, असेही ते म्हणाले. येणाऱ्या काळात 1 लाख प्रतिभावान आणि उत्साही तरुणांना राजकारणात सहभागी करून घेण्याच्या सरकारच्या संकल्पावर मोदींनी प्रकाश टाकला.हे तरुण 21व्या शतकातील भारतीय राजकारणाचा आणि देशाच्या भविष्याचा नवा चेहरा बनतील, असेही ते म्हणाले.
पृथ्वीला अधिक चांगले बनवण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत विकास या दोन महत्त्वाच्या कल्पना लक्षात ठेवल्या पाहिजेत यावर भर देत पंतप्रधानांनी या दोन संकल्पनांच्या समन्वयाने आपण अधिक चांगले भविष्य निर्माण करू शकू, असे सांगितले. स्वामी विवेकानंद अध्यात्माच्या व्यावहारिक बाजूवर भर देत असत आणि समाजाच्या गरजा पूर्ण करू शकणारे अध्यात्म त्यांना हवे होते, असे पंतप्रधान म्हणाले. स्वामी विवेकानंद विचारांच्या शुद्धतेसोबतच परिसर स्वच्छ ठेवण्यावरही भर देत असत, असेही त्यांनी सांगितले. आर्थिक विकास, समाजकल्याण आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये समतोल राखून शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते यावर पंतप्रधानांनी भर दिला. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार आपल्याला मार्गदर्शन करतील यावर त्यांनी भर दिला.
अध्यात्म आणि शाश्वतता या दोन्हींमध्ये संतुलन महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, यापैकी एक मनामध्ये संतुलन निर्माण करते, तर दुसरे आपल्याला निसर्गाबरोबर संतुलन राखण्याची शिकवण देते. मिशन लाइफ, एक पेड माँ के नाम यांसारख्या आपल्या मोहिमांना गती देण्यात रामकृष्ण मिशन सारख्या संस्था महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यांच्या पाठिंब्याने या अभियानाचा विस्तार आणखी वाढवता येईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
“स्वामी विवेकानंदांना भारताला एक मजबूत आणि स्वावलंबी देश म्हणून पाहायचे होते”, असे पंतप्रधान म्हणाले.देश आता त्यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले. हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावे तसेच सशक्त आणि सक्षम भारताने पुन्हा एकदा मानवतेला दिशा दिली पाहिजे यावर पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना भर दिला. या स्वप्नपूर्तीसाठी देशातील प्रत्येक नागरिकाला गुरुदेव रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करावे लागतील, असेही ते म्हणाले.