“तुमची निष्ठा, समर्पित वृत्ती, धैर्य, निर्धार आणि ध्यास यांना अभिवादन करण्यासाठी मी अधीर झालो होतो आणि तुमची भेट घेण्याची ओढ लागली होती”
“भारत चंद्रावर पोहोचला आहे! आम्ही आमचा राष्ट्रीय अभिमान चंद्रावर प्रस्थापित केला आहे”
“हा नवा भारत 21व्या शतकात जगातील मोठमोठ्या समस्यांवर तोडगे काढेल”
“चंद्रावर यान उतरण्याचा क्षण हा या शतकातील सर्वात जास्त प्रेरणादायी क्षण आहे”
“आज संपूर्ण जग भारताची वैज्ञानिक वृत्ती, आपले तंत्रज्ञान आणि आपला वैज्ञानिक दृष्टीकोन यांच्या सामर्थ्याचा अनुभव घेत आहे आणि हे सामर्थ्य मान्य करत आहे”
“आपल्या ‘मून लँडर’ ने चंद्रावर ‘अंगद’ प्रमाणे भक्कम पाय रोवले आहेत”
“चांद्रयानचे मून लँडर ज्या जागेवर उतरले तो भाग ‘शिव शक्ती’ म्हणून ओळखला जाईल”
“ज्या ठिकाणी चांद्रयान 2 ने आपल्या पाऊलखुणा उमटवल्या त्या स्थानाला ‘ तिरंगा’ म्हटले जाईल”
“चांद्रयान-3च्या चांद्रमोहिमेच्या यशात आपल्या महिला वैज्ञानिकांनी, देशाच्या नारी शक्तीने मोठी भूमिका बजावली आहे”
“तिसऱ्या रांगेपासून पहिल्या रांगेपर्यंतच्या प्रवासात इस्रोसारख्या आपल्या संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे”
“भारताच्या दक्षिण भागापासून चंद्राच्या दक्षिण भागापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता”
“यापुढे 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्यात येईल”
“भारताच्या प्राचीन ग्रंथांमधील खगोलशास्त्रीय सूत्रे शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करण्यासाठी आणि त्यांचे नव्याने अध्ययन करण्यासाठी नव्या पिढीने पुढाकार घ्यावा.”
पंतप्रधानांनी अतिशय उत्साहात नमूद केले की, “भारत चंद्रावर पोहोचला आहे! आम्ही आमचा राष्ट्रीय अभिमान चंद्रावर प्रस्थापित केला आहे”

ग्रीसचा दौरा आटोपून मायदेशी परतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळूरु येथे  इस्रोच्या टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) ला भेट दिली आणि चांद्रयान-3 च्या यशाबद्दल इस्रोच्या चमूसमोर आपले विचार व्यक्त केले. चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या चमूमधील शास्त्रज्ञांची त्यांनी भेट घेतली ज्यावेळी त्यांना चांद्रयान-3 मोहिमेद्वारे मिळत असलेली माहिती आणि मोहिमेची प्रगती याविषयीची माहिती देण्यात आली.

 

या शास्त्रज्ञांना संबोधित करत असताना पंतप्रधानांनी इस्रोच्या बेंगळूरु येथील टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) मध्ये उपस्थित राहताना अतिशय आनंद झाला असल्याचे सांगितले आणि असे काही क्षण अतिशय दुर्मिळ असतात ज्यावेळी आपले शरीर आणि मन इतक्या जास्त आनंदाने भरून जाते, असे त्यांनी सांगितले. प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही विशेष क्षण येतात ज्यावेळी मन कमालीचे अधीर होते, उतावीळ होते, अगदी तशाच प्रकारच्या भावना आपल्या देखील मनात आपण दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यावर असताना निर्माण झाल्या होत्या आणि सातत्याने चांद्रयान-3 मोहिमेकडेच आपले लक्ष लागलेले होते, असे ते म्हणाले.

इस्रोच्या बेंगळूरु येथील टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) मध्ये आपल्या पूर्वनियोजित नसलेल्या भेटीमुळे शास्त्रज्ञांना झालेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. यावेळी अतिशय भावुक झालेल्या पंतप्रधानांनी सांगितले की शास्त्रज्ञांची  निष्ठा, समर्पित वृत्ती, धैर्य, निर्धार आणि ध्यास यांना अभिवादन करण्यासाठी आपण अधीर झालो होतो आणि त्यांची भेट घेण्याची ओढ लागली होती.

हे यश सामान्य यश नाही आहे, असे पंतप्रधान म्हणाले. अनंत अवकाशातील भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचा दाखला देणारी ही कामगिरी आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी अतिशय उत्साहात नमूद केले की, “भारत चंद्रावर पोहोचला आहे! आम्ही आमचा राष्ट्रीय अभिमान चंद्रावर प्रस्थापित केला आहे”

या अभूतपूर्व कामगिरीला अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, “ हा आजचा भारत आहे, जो निर्भय आहे आणि अथक प्रयत्न करत राहणारा आहे.” नव्या आणि एका अभिनव पद्धतीने विचार करणारा हा नवीन भारत आहे, जो काळोख्या भागात जातो आणि जगामध्ये प्रकाश पसरवतो, असे ते म्हणाले. हा भारत 21व्या शतकातील जगामध्ये निर्माण होणाऱ्या मोठमोठ्या समस्यांवर तोडगे काढले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चांद्रयानाने ज्या क्षणी चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला तो क्षण देशाच्या स्मृतीमध्ये चिरंतन टिकून राहणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “चंद्रावर यान उतरण्याचा क्षण हा या शतकातील सर्वात जास्त प्रेरणादायी क्षण आहे”, पंतप्रधानांनी सांगितले. प्रत्येक भारतीयाला हा आपल्या स्वतःचा विजय वाटला आहे, असे त्यांनी नमूद केले. या महान यशाचे श्रेय पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांना दिले

 

मून लँडरच्या भक्कम पाऊलखुणांच्या छायाचित्रांचे वर्णन करताना पंतप्रधानांनी सांगितले, “आपल्या ‘मून लँडर’ ने चंद्रावर ‘अंगद’ प्रमाणे भक्कम पाय रोवले आहेत” एकीकडे विक्रमचे धैर्य आहे तर दुसरीकडे प्रज्ञानचे शौर्य आहे, असे ते म्हणाले. यापूर्वी कोणीही न पाहिलेल्या चंद्राच्या पृष्ठभागाची ही छायाचित्रे आहेत आणि हे भारताने करून दाखवले आहे. “आज संपूर्ण जग भारताची वैज्ञानिक वृत्ती, आपले तंत्रज्ञान आणि आपला वैज्ञानिक दृष्टीकोन यांच्या सामर्थ्याचा अनुभव घेत आहे आणि हे सामर्थ्य मान्य करत आहे”, पंतप्रधान म्हणाले.

चांद्रयान-3 चे हे यश केवळ एकट्या भारताचे नाही तर ते संपूर्ण मानवजातीचे यश आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या मोहिमेतून हाती येणारे निष्कर्ष प्रत्येक देशासाठी चांद्रयान मोहिमेची नवी दालने खुली करणार आहे असे त्यांनी अधोरेखित केले. ही मोहीम केवळ चंद्रावरील अनेक अज्ञात गोष्टींचीच उकल करणार नाही तर भारतावरील आव्हानांवर मात करण्यामध्येही योगदान देईल. पंतप्रधानांनी पुन्हा एकदा चांद्रयान-3 मोहिमेतील प्रत्येक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंता आणि सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी घोषणा केली, “ चांद्रयानचे मून लँडर ज्या जागेवर उतरले तो भाग ‘शिव शक्ती’ म्हणून ओळखला जाईल”. शिव मध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि शक्ती आपल्याला हा संकल्प पूर्ण करण्याचे सामर्थ्य देते. चंद्राचे हे शिवशक्ती स्थान देखील आपल्याला हिमालयासोबत कन्याकुमारीशी असलेल्या संबंधांची अनुभूती देत आहे, असे ते म्हणाले.

विज्ञानाच्या पाठपुराव्यामुळे होत असलेल्या कल्याणाच्या महत्त्वावर भर देत पंतप्रधान म्हणाले, “या पवित्र संकल्पाला शक्तीचे आशीर्वाद हवेत आणि ही शक्ती म्हणजे आपली नारी शक्ती आहे.” चांद्रयान-3 च्या या चांद्रमोहिमेच्या यशात आपल्या देशाच्या महिला शास्त्रज्ञांनी, देशाच्या नारी शक्तीने मोठी भूमिका बजावली आहे. चंद्रावरील शिवशक्ती हे स्थान भारताच्या वैज्ञानिक आणि तत्वज्ञानाधारित विचारसरणीचा दाखला देणारे प्रतीक बनेल, असे त्यांनी नमूद केले. 

चांद्रयान 2 च्या पाऊलखुणा ज्या ठिकाणी उमटल्या आहेत त्या ठिकाणाला आता ‘तिरंगा’ म्हटले जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. हे स्थान भारताच्या प्रत्येक प्रयत्नासाठी प्रेरणा देईल आणि अपयश म्हणजे शेवट नाही, याचे स्मरण सतत करून देत राहील, असे पंतप्रधान म्हणाले. "प्रबळ इच्छाशक्ती असेल तर यश हमखास मिळतेच", असे ते म्हणाले.

चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरणारा भारत हा जगातला चौथा देश ठरला आहे, हे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात मर्यादित संसाधनात झाली होती, त्याचा विचार केल्यास ही कामगिरी अधिकच मोठी ठरते. जेव्हा भारताला तिसर्‍या जगातील देश मानले जात होते आणि आवश्यक तंत्रज्ञान व पाठबळ मिळत नव्हते तेव्हाच्या काळाची आठवण त्यांनी करून दिली. आज, भारत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि तो आता पहिल्या जगातील देशांमध्ये आहे मग ती वृक्षसंपदा असो किंवा तंत्रज्ञान असो. “तिसऱ्या रांगेतून पहिल्या रांगेपर्यंतच्या प्रवासात आपल्या ‘इस्रो’ सारख्या संस्थांनी मोठी भूमिका बजावली आहे”, असे कौतुक पंतप्रधानांनी संस्थेच्या योगदानावर प्रकाश टाकताना केले. इस्रोने मेक इन इंडियाला आज चंद्रावर नेले आहे, असे ते म्हणाले.

 

औचित्य साधत पंतप्रधानांनी इस्रोचे परिश्रम देशवासीयांसमोर ठेवले. “दक्षिण भारतापासून चंद्राच्या दक्षिणेपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता,” असे पंतप्रधान म्हणाले आणि इस्रोने आपल्या संशोधन कार्यस्थळी कृत्रिम चंद्राची निर्मितीही केल्याची माहिती दिली. अशा अंतराळ मोहिमांच्या यशाचे श्रेय पंतप्रधानांनी भारतातील युवकांमधील नवोन्मेष आणि विज्ञानासाठी असलेल्या अपूर्व ओढीला दिले. “मंगळयान आणि चांद्रयानचे यश आणि गगनयानच्या तयारीने देशातील तरुण पिढीला एक नवीन दृष्टीकोन दिला आहे. तुमची मोठी कामगिरी म्हणजे भारतीयांच्या एका पिढीला जागृत करणे आणि तिला ऊर्जा देणे, ही असल्याचे'', मोदी म्हणाले. आज भारतातील मुलांमध्ये चांद्रयानचे नाव गुंजत आहे. प्रत्येक बालकाला त्याचे भविष्य शास्त्रज्ञांमध्ये दिसत असल्याचे ते म्हणाले.

चांद्रयान 3 ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले तो 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिन' म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. राष्ट्रीय अंतराळ दिन विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची भावना साजरी करेल आणि आपल्याला कायम प्रेरणा देत राहील, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी नमूद केले की अवकाश क्षेत्राची क्षमता केवळ उपग्रह प्रक्षेपित करणे आणि अंतराळ संशोधनापुरती मर्यादित नाही तर त्याची ताकद जीवन सुलभता आणि प्रशासनातील सुविधा यामध्येही दिसून येते. आपल्या पंतप्रधानपदाच्या सुरुवातीच्या काळात केंद्र सरकारमधील संयुक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी इस्रोसोबत आयोजित केलेल्या कार्यशाळेची आठवण त्यांनी सांगितली. अंतराळ उपयोजनेत प्रशासनाला जोडण्यासाठी करण्यात आलेल्या प्रचंड प्रगतीचा त्यांनी उल्लेख केला. त्यांनी स्वच्छ भारत अभियान, दुर्गम भागात शिक्षण, दळणवळण आणि आरोग्य सेवा; दूर -औषधोपचार आणि दूर- शिक्षण यातील अवकाश तंत्रज्ञानाच्या भूमिकेचा उल्लेख केला. नैसर्गिक आपत्तीच्या काळात 'नाविक' (NAVIC) प्रणालीचे सहाय्य आणि योगदान याबद्दलही त्यांनी सांगितले. “आपल्या पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याचा आधारदेखील अवकाश तंत्रज्ञान आहे. यामुळे प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख करण्यात खूप मदत होत आहे. अंतराळ अनुप्रयोगाची ही व्याप्ती, जी काळाबरोबर विस्तारत आहे, ती आपल्या तरुणांसाठीदेखील संधी वृद्धिंगत करत आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांच्या सहकार्याने ‘प्रशासनात अंतराळ तंत्रज्ञान’ या विषयावर राष्ट्रीय हॅकेथॉन आयोजित करण्याची पंतप्रधानांनी इस्रोला विनंती केली. " या राष्ट्रीय हॅकेथॉनमुळे आपले प्रशासन अधिक प्रभावी होईल आणि देशवासियांना आधुनिक उपाय उपलब्ध होतील,असा विश्वास मला वाटतो," असे पंतप्रधान म्हणाले.
 

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांच्या सहकार्याने ‘प्रशासनात अंतराळ तंत्रज्ञान’ या विषयावर राष्ट्रीय हॅकेथॉन आयोजित करण्याची पंतप्रधानांनी इस्रोला विनंती केली. " या राष्ट्रीय हॅकेथॉनमुळे आपले प्रशासन अधिक प्रभावी होईल आणि देशवासियांना आधुनिक उपाय उपलब्ध होतील,असा विश्वास मला वाटतो," असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी देशातील तरुण पिढीवर एक कार्य सोपवले आहे. ते म्हणाले, “भारतातील शास्त्रांमध्ये जी खगोलशास्त्रीय सूत्रे आहेत ती वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करण्यासाठी, त्यांचा नव्याने अभ्यास करण्यासाठी नवीन पिढीने पुढे यावे, अशी माझी इच्छा आहे. ते आपल्या वारशासाठीही महत्त्वाचे आहे आणि विज्ञानासाठीही महत्त्वाचे आहे. एक प्रकारे आज शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांवर ही दुहेरी जबाबदारी आहे. भारताकडे असलेला वैज्ञानिक ज्ञानाचा खजिना गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडात दबला आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत काळात आपल्याला हा खजिनाही शोधायचा आहे, त्यावर संशोधन करायचे आहे आणि त्याबद्दल जगालाही सांगायचे आहे.''

 

पंतप्रधानांनी तज्ज्ञांच्या अंदाजाचा संदर्भ दिला की भारताचा अंतराळ उद्योग येत्या काही वर्षांत 8 अब्ज डॉलर्सवरून 16 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल. अंतराळ क्षेत्रातील सुधारणांसाठी सरकार अथक प्रयत्न करत असताना, देशातील तरुणही प्रयत्न करत आहेत. गेल्या 4 वर्षात अंतराळाशी संबंधित स्टार्टअप्सची संख्या 4 वरून सुमारे 150 वर गेली आहे. दिनांक 1 सप्टेंबरपासून MyGov द्वारे आयोजित चांद्रयान मोहिमेबाबत आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी देशभरातील विद्यार्थ्यांना केले. 

21व्या शतकाच्या या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानात आघाडी घेण्याच्या महत्त्वावर भर देताना पंतप्रधान म्हणाले की, भारताकडे जगातील सर्वात युवा प्रतिभा आहे. “समुद्राच्या खोलीपासून ते आकाशाच्या उंचीपर्यंत, आकाशाच्या उंचीपासून अंतराळाच्या खोलीपर्यंत, तरुण पिढ्यांसाठी कारण्यासारखे बरेच काही आहे”, पंतप्रधान म्हणाले. त्यांनी 'डीप अर्थ' ते 'डीप सी' पर्यंतच्या आणि पुढील पिढीतील संगणक ते अनुवांशिक अभियांत्रिकी संधींवर प्रकाश टाकला. "भारतात तुमच्यासाठी सतत नवीन संधी खुल्या होत आहेत", असे ते म्हणाले.

भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शनाची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली आणि भावी पिढी आजच्या महत्त्वाच्या मोहिमा पुढे नेणार असल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, शास्त्रज्ञ हे भावी पिढ्यांचे आदर्श आहेत. त्यांनी केलेले संशोधन आणि वर्षानुवर्षांची कठोर मेहनत हे सिद्ध करतात की, दृढनिश्चयातून कोणतीही गोष्ट साध्य करता येऊ शकते. आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, देशातील नागरिकांचा वैज्ञानिकांवर विश्वास आहे आणि जेव्हा जनतेचा आशीर्वाद मिळतो तेव्हा त्या ताकदीतून, देशाप्रतीच्या समर्पण भावनेने भारत, विज्ञान आणि तंत्रज्ञानात जागतिक अग्रणी ठरेल. “आमच्या नवोन्मेषाची हीच भावना 2047 मधील विकसित भारताचे स्वप्न साकार करेल”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi