हिमाचल प्रदेशातल्या मंडी इथे 11,000 कोटी रुपयांच्या जल विद्युत प्रकल्पांचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन आणि भूमिपूजन
आज उद्घाटन झालेले जल विद्युत प्रकल्प म्हणजे पर्यावरण स्नेही विकासाप्रती भारताच्या कटीबद्धतेचे द्योतक
2030 पर्यंत स्थापित विद्युत क्षमतेच्या 40 टक्के उर्जा बिगर जीवाश्म उर्जा स्त्रोतातून करण्याचे भारताने 2016 मध्ये ठेवलेले उद्दिष्ट, 2030च्या पूर्वी , यावर्षी नोव्हेंबरमधेच केले साध्य.
प्लास्टिक सर्वत्र झाले असून नद्यांमध्येही प्लास्टिक जमा होत असून हिमाचलमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करायला हवेत
भारताला आज जर जगाचे औषधालय म्हणून ओळखले जात असेल तर त्यामध्ये हिमाचल प्रदेशचे मोठे योगदान
कोरोना जागतिक महामारीच्या काळात हिमाचल प्रदेशने देशातल्या इतर राज्यांबरोबरच अन्य देशानांही केली मदत
बाबी प्रलंबित ठेवण्याच्या मानसिकतेमुळे हिमाचल प्रदेशच्या जनतेला अनेक दशके प्रतीक्षा करावी लागली, इथले अनेक प्रकल्प अनेक वर्षे रखडले
15-18 वयोगटातल्या मुलांना लस देण्याच्या तसेच फ्रंटलाईन कर्मचाऱ्याना आणि सह व्याधी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्रीकॉशन डोस देण्याबाबत दिली माहिती
मुलींचे लग्नासाठीचे वय वाढवून 21 केल्याने त्यांना अभ्यासासाठी पूर्ण वेळ देता येईल आणि त्यांना करिअर करणे शक्य होईल
देशाची सुरक्षा भक्कम करण्यासाठी आपल्या सरकारने गेल्या सात वर्षात केलेल्या कार्याचा, सैनिक, माजी सैनिक यांच्या साठी घेतलेल्या निर्णयांचा हिमाचल प्रदेशलाही मोठा लाभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातल्या मंडी इथे दुसऱ्या हिमाचल प्रदेश जागतिक गुंतवणूकदार  परिषदेचे  अध्यक्षस्थान भूषवले. या परिषदेमुळे सुमारे 28,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांद्वारे या प्रदेशात गुंतवणुकीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. 11,000 कोटी रुपयांच्या जल विद्युत प्रकल्पांचे आज पंतप्रधानांनी उद्घाटन आणि भूमिपूजन केले. रेणुकाजी धरण प्रकल्प, लुहरी टप्पा  1 जलविद्युत  उर्जा प्रकल्प आणि धौलसीध जलविद्युत प्रकल्पाचा यात समावेश आहे. सवरा-कुड्डू जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटनही   पंतप्रधानांनी केले. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यावेळी उपस्थित होते.

हिमाचल प्रदेश  या राज्याने आणि त्यातल्या पर्वत राजीने आपल्या जीवनात मोठी भूमिका बजावल्याचे सांगून या राज्या समवेत असलेल्या  भावबंधांचे त्यांनी स्मरण केले. दुहेरी इंजिन सरकारच्या चार वर्षांबद्दल त्यांनी हिमाचल प्रदेश मधल्या जनतेचे अभिनंदन केले.  या चार वर्षांच्या काळात राज्याने महामारीच्या आव्हानाला तोंड दिले आणि विकासाची नवी शिखरेही गाठल्याचे पंतप्रधान म्हणाले. हिमाचल प्रदेशच्या जनतेच्या स्वप्नांची  पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि त्यांच्या मेहनती चमूने सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे पंतप्रधान म्हणाले. 

इझ ऑफ  लिव्हिंग अर्थात जनतेचे जीवनमान सुखकर करणे हे  सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक असून यामध्ये विद्युत अर्थात विजेची मोठी भूमिका आहे. आज उद्घाटन झालेले जल विद्युत प्रकल्प हे  पर्यावरण स्नेही विकासाप्रती भारताच्या कटीबद्धतेचेच द्योतक आहेत . गिरी नदीवरचा  श्री रेणुकाजी धरण प्रकल्प जेव्हा  पूर्ण होईल तेव्हा मोठ्या क्षेत्राला त्याचा थेट लाभ होईल. या प्रकल्पातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा मोठा भाग इथल्या विकासासठी उपयोगात आणला जाईल असे त्यांनी सांगितले. 

नव भारताच्या बदललेल्या कार्यशैलीचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. पर्यावरणाशी निगडीत शाश्वत  विकास उद्दिष्टांची भारत वेगाने पूर्तता करत आहे त्याविषयी त्यांनी माहिती दिली. भारताने 2016 मध्ये,  2030 पर्यंत स्थापित विद्युत क्षमतेच्या 40 टक्के उर्जेची पूर्तता , बिगर जीवाश्म उर्जा स्त्रोतातून करण्याचे उद्दिष्ट ठेवले.   नोव्हेंबरमधेच भारताने हे उद्दिष्ट साध्य केले याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान राहील असे ते म्हणाले. पर्यावरणाचे रक्षण करत भारताने विकासाला दिलेल्या गतीबद्दल संपूर्ण जग भारताची प्रशंसा करत आहे.  सौर उर्जा ते जल विद्युत,पवन उर्जा ते हरित हायड्रोजन, नविकरणीय उर्जेच्या प्रत्येक स्त्रोताचा  पुरेपूर वापर करण्यासाठी देश सातत्याने काम करत असल्याची माहिती  पंतप्रधानांनी दिली.

पंतप्रधानांनी एक वेळ वापराच्या प्लॅस्टिक उच्चाटनाच्या आपल्या संकल्पनेकडे पुन्हा लक्ष वेधले. प्लॅस्टिकमुळे पर्वतांना होत असलेल्या हानीबाबत सरकार दक्ष आहे, असे ते म्हणाले. एक वेळ वापराच्या प्लॅस्टिकविरोधात देशव्यापी मोहिमेसोबत सरकार प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनाबाबतही काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. वर्तनामधल्या बदलांच्या आवश्यकतेवर भर देताना मोदी म्हणाले, “ हिमाचल स्वच्छ ठेवण्याची, प्लॅस्टीक आणि इतर कचरामुक्त ठेवण्याची खूप मोठी जबाबदारी देखील पर्यटकांवर आहे. प्लॅस्टीक सर्वत्र पसरले आहे, प्लॅस्टिक नद्यांमध्ये जात आहे, यामुळे हिमाचलला होणारी हानी थांबवण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न केले पाहिजेत.”

हिमाचल प्रदेशातील औषध उत्पादन क्षेत्रामध्ये होत असलेल्या वृद्धीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. जर भारताला जगाचे औषध भांडार म्हटले जात असेल तर त्यामागे असलेले बळ हिमाचलचे आहे, असे ते म्हणाले. हिमाचल प्रदेशाने केवळ इतर राज्यांनाच मदत केलेली नाही तर इतर देशांना देखील कोरोनाच्या जागतिक महामारीत मदत  केली आहे, असे मोदी म्हणाले.

या राज्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा दाखला देत पंतप्रधान म्हणाले, “ आपल्या प्रौढ लोकसंख्येपैकी सर्वांना लसींच्या मात्रा देण्यामध्ये हिमाचलने इतर सर्वांना मागे टाकले आहे. सरकारमध्ये असलेले जे येथे आहेत त्यांनी राजकीय स्वार्थामध्ये बुडून न जाता हिमाचलच्या प्रत्येक नागरिकाला लस कशी मिळेल याकडे आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले.”

मुलींच्या लग्नाचे वय बदलण्याच्या सरकारच्या अलीकडेच घेतलेल्या निर्णयाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. मुलांना लग्न करण्यासाठी जी वयोमर्यादा आहे तीच वयोमर्यादा मुलींना देखील असली पाहिजे, असा आम्ही निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. लग्नाचे वय 21 वर्षे करण्यामुळे मुलींना अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देता येईल आणि त्यांना आपली कारकीर्द घडवण्यासाठी देखील पुरेसा वेळ मिळू शकेल, असे ते म्हणाले.

लसीकरणासाठी नव्या श्रेणींची अलीकडेच केलेल्या घोषणेबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. प्रत्येक गरज विचारात घेऊन सरकार अतिशय संवेदनशीलतेने आणि सावधगिरीने काम करत आहे. आता सरकारने 15 ते 18 वयोगटातील प्रत्येक किशोरवयीन मुलाचे तीन जानेवारीपासून लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षात कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्या आरोग्य क्षेत्रातील लोक, आघाडीवरील कर्मचारी हे देशाचे सामर्थ्य बनून राहिले आहेत. या लोकांना खबरदारीची मात्रा देण्याचे काम देखील 10 जानेवारी पासून सुरू करण्यात येणार आहे. ज्यांना आधीपासून काही गंभीर आजार आहेत अशा 60 वर्षांवरील वृद्धांना देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने खबरदारीची मात्रा घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

सबका साथ, सबका विकास, सबका विकास आणि सबका प्रयास या मंत्राने काम करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली. प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या विचारधारा असतात. पण आपल्या देशात लोकांना अगदी स्पष्टपणे दोन विचारधारा दिसत आहेत. विलंबाची विचारधारा असलेल्या लोकांनी पर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या लोकांचा कधीही विचार केला नाही. विलंबाची विचारसरणी असलेल्यांनी हिमाचलच्या लोकांना कित्येक वर्षे ताटकळत ठेवले.

यामुळे अटल टनेलच्या कामाला अनेक वर्षे विलंब झाला. रेणुका प्रकल्प देखील तीन दशके रखडला. या सरकारची केवळ विकासाशी वचनबद्धता आहे, असे पंतप्रधान म्हणाले. अटल टनेलचे काम पूर्ण झाले तसेच चंदीगड ते मनाली आणि सिमला यांना जोडणाऱ्या रस्त्याचे देखील रुंदीकरण करण्यात आले.

हिमाचल हे अनेक संरक्षण दल कर्मचाऱ्यांचे घर आहे. यावेळी पंतप्रधानांनी संरक्षण दलाचे कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली. हिमाचल प्रदेशच्या प्रत्येक घरात देशाचे रक्षण करणारे वीर सुपुत्र आणि सुकन्या आहेत, असे ते म्हणाले. आमच्या सरकारने गेल्या सात वर्षात देशाच्या सुरक्षेत वाढ करण्याचे प्रयत्न केले.  सैनिकांसाठी, माजी संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचा फायदा हिमाचलच्या लोकांनाही मोठ्या प्रमाणात झाला आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025

Media Coverage

India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 डिसेंबर 2024
December 24, 2024

Citizens appreciate PM Modi’s Vision of Transforming India