पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंगळुरू टेक समिट, 2020 चे उद्घाटन करणार आहेत.
बंगळुरू टेक समिट 19 ते 21 नोव्हेंबर, 2020 दरम्यान होणार आहे. कर्नाटक सरकारने माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि स्टार्टअप वरील कर्नाटक इनोव्हेशन ॲण्ड टेक्नॉलॉजी सोसायटी (केआयटीएस) हा कर्नाटक सरकारचा उपक्रम तसेच सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क इंडिया (एसटीपीआय) आणि एमएम ऍक्टिव्ह साय-टेक कम्युनिकेशन्स यांच्या सहकार्याने ही शिखर परिषद आयोजित केली आहे.
बंगळुरू टेक शिखर परिषदेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, स्विस महासंघाचे उपाध्यक्ष गाय परमेलिन आणि इतर अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय मान्यवर सहभागी होणार आहेत. याशिवाय या शिखर परिषदेत देशातील आणि विदेशातील विचारवंत, उद्योजक, तंत्रज्ञ, संशोधक, नवउन्मेषक , गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि शिक्षकदेखील सहभागी होणार आहेत.
यावर्षी “नेक्स्ट इज नाऊ” अशी शिखर परिषदेची संकल्पना आहे. ‘माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स’ आणि ‘जैवतंत्रज्ञान’ या क्षेत्रातील प्रमुख तंत्रज्ञान आणि नवसंशोधनाच्या प्रभावावर लक्ष केंद्रित करून कोरोना महामारी नंतर जगात उद्भवणाऱ्या प्रमुख आव्हानांवर या शिखर परिषदेत चर्चा होईल.