राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे सभापती यांच्या संयुक्त निमंत्रणावरून मालदीवच्या ‘पिपल्स मजलिस’चे सभापती मोहम्मद नशीद यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
नशिद यांचे स्वागत करताना पंतप्रधानांनी नमूद केले की दोन्ही संसदेमधील संबंध भारत-मालदीव संबंधांचा एक महत्त्वाचा घटक आहे; या भेटीमुळे दोन्ही बाजूंमधील मैत्री दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावर्षी जूनमध्ये माले येथे झालेल्या आपल्या भेटीची पंतप्रधानांनी आठवण करून दिली; या दौऱ्यात त्यांनी पिपल्स मजलीसला संबोधितही केले होते. त्यावेळी पंतप्रधानांनी मालदीवमधील लोकशाही समृद्ध आणि मजबूत करण्यासाठी सभापती नशीद यांच्या नेतृत्त्वाचे मालदीवच्या जनतेसमोर कौतुक केले होते. स्थिर, समृद्ध आणि शांततापूर्ण मालदीवसाठी, मालदीव सरकारबरोबर घनिष्ठपणे काम करणे सुरू ठेवण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचे पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
गेल्या वर्षी मालदीवमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यापासून भारत-मालदीवच्या मजबूत संबंधासाठी पंतप्रधानांकडून सतत दिलेल्या पाठिंब्याबद्दल सभापती नशिद यांनी त्यांचे आभार मानले. मालदीवच्या लोक-कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या विकास सहकार्याच्या पुढाकारांबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. त्यांनी मालदीव सरकारच्या ‘इंडिया फर्स्ट’ धोरणाला पाठिंबा दर्शविला आणि संसदीय प्रतिनिधीमंडळाच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील बंधुभाव आणि मैत्रीपूर्ण संबंध आणखी दृढ होण्यास मदत होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.