पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी शीख प्रतिनिधीमंडळाची भेट घेतली.
दिल्लीतील गुरुद्वारा श्री बाला साहिब जी यांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त ‘अखंड पाठ’ आयोजित केला होता. 15 सप्टेंबर रोजी प्रारंभ झालेल्या 'अखंड पाठाची' 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी सांगता झाली. शीख प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधानांची भेट घेऊन गुरुद्वारातून आणलेला प्रसाद आणि आशीर्वाद दिले.
भेटीदरम्यान शीख प्रतिनिधीमंडळाने पगडी बांधून आणि सिरोपा देऊन पंतप्रधानांचा सत्कार केला. पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थनाही करण्यात आली. शीख समुदायाच्या सन्मानासाठी आणि कल्याणासाठी पंतप्रधानांच्या पथदर्शी उपक्रमाबद्दल प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधानांचे आभार मानले. 26 डिसेंबरला “वीर बाल दिवस” म्हणून घोषित करणे, कर्तारपूर साहिब कॉरिडॉर पुन्हा सुरू करणे, गुरुद्वारांद्वारे चालवल्या जाणाऱ्या लंगरवरील जीएसटी हटवणे, अफगाणिस्तानातून गुरु ग्रंथसाहिबच्या प्रती भारतात पोहोचणे सुनिश्चित करणे यासह पंतप्रधानांनी केलेल्या अनेक प्रयत्नांना त्यांनी उजाळा दिला.
शीख प्रतिनिधीमंडळात अखिल भारतीय केंद्रीय गुरु सिंग सभेचे अध्यक्ष तरविंदर सिंग मारवाह; अखिल भारतीय केंद्रीय गुरु सिंग सभेचे कार्याध्यक्ष वीर सिंग; केंद्रीय गुरु सिंग सभेचे दिल्ली प्रमुख नवीन सिंग भंडारी; टिळकनगरच्या गुरुद्वारा सिंग सभेचे अध्यक्ष हरबंस सिंग आणि गुरुद्वारा सिंग सभेचे मुख्य ग्रंथी राजिंदर सिंग यांचा समावेश होता.