व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2019 च्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्झीयोयेव यांची द्विपक्षीय बैठक पार पडली. तत्पूर्वी राष्ट्रपती मिर्झीयोयेव यांच्या नेतृत्वाखाली उच्च अधिकार प्राप्त प्रतिनिधी मंडळ काल गांधीनगर येथे दाखल झाले. गुजरातचे राज्यपाल ओ.पी.कोहली यांनी त्यांचे स्वागत केले.
बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी राष्ट्रपती मिर्झीयोयेव आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे गुजरातमध्ये स्वागत केले. राष्ट्रपती मिर्झीयोयेव यांच्या 30 सप्टेंबर-1 ऑक्टोबर 2018 दरम्यान भारत भेटीचे पंतप्रधानांनी स्मरण केले आणि त्या दौऱ्यादरम्यान घेण्यात आलेल्या विविध निर्णयांच्या प्रगती आणि अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त केले. या दौऱ्यात गुजरात आणि उझबेकिस्तानच्या अंदीजान प्रांतादरम्यान झालेल्या सहकार्यावरील सामंजस्य कराराचा उल्लेख करतांना पंतप्रधानांनी उझबेकिस्तान प्रतिनिधी मंडळात अंदीजान प्रांताचे राज्यपाल उपस्थित असल्याची दखल घेत उभय देशांमधील संबंध अधिक दृढ होतील अशी आशा व्यक्त केली.
उझबेकिस्तानमधील समरकंद येथे 12-13 जानेवारी 2019 रोजी परराष्ट्र मंत्रालय स्तरावरील पहिल्या भारत-मध्य आशिया चर्चेसाठी राष्ट्रपती मिर्झीयोयेव यांनी दिलेल्या समर्थनाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. या बैठकीत अफगाणिस्तानमधील शांतता आणि विकासाला सहकार्य करण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली होती.
राष्ट्रपती शौकत मिर्झीयोयेव यांनी व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. भारताकडून गुंतवणुकीला उझबेकिस्तानचे सर्वोच्च प्राधान्य असून माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, औषध निर्मिती, आरोग्य सेवा, शेती आणि पर्यटन ही उझबेकिस्तानची भारताबरोबर संभाव्य सहकार्यासाठी प्राधान्य क्षेत्रे असल्याचे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.
पहिल्या भारत-मध्य आशिया चर्चेच्या यशस्वी निष्कर्षांबद्दल राष्ट्रपती मिर्झीयोयेव यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. मध्य आशिया प्रांतावर भारताचा सकारात्मक प्रभाव आणि अफगाणिस्तानात शांतता नांदावी यासाठी सहभागी देशांची संयुक्त इच्छा यातून दिसून येते.
भारताच्या उर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी युरेनिअमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबत भारतीय अणुऊर्जा विभाग आणि उझबेकिस्तानच्या नोवोई मिनरल्स ॲण्ड मेटलर्जिकल कंपनीदरम्यान करार उभय नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
उझबेकिस्तानमधील गृहनिर्माण आणि सामाजिक पायाभूत प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्यासाठी भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या 200 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या कर्जासंदर्भात भारताची एक्झिम बँक आणि उझबेकिस्तान सरकार यांच्यात करण्यात आलेल्या कराराचे उभय नेत्यांनी स्वागत केले. राष्ट्रपती मिर्झीयोयेव यांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 200 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या कर्जाची घोषणा केली होती.