अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
दोन दिवसांच्या भारत भेटीवर आलेल्या डॉ. अब्दुल्ला यांचे पंतप्रधानांनी स्नेहपूर्ण स्वागत केले.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या बहुआयामी धोरणात्मक भागीदारीच्या दृढतेचा पुनरुच्चार उभय नेत्यांनी यावेळी केला. नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय धोरणात्मक भागिदारी परिषदेच्या बैठकीतल्या नव्या विकासात्मक भागिदारीच्या घोषणेचे आणि वाढत्या सहकार्याचे या दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. द्विपक्षीय आर्थिक आणि विकासात्मक सहकार्य वाढवण्यासंदर्भात आणि याबाबत असलेल्या अमाप संधीविषयी यावेळी चर्चा झाली.
अफगाणिस्तानमध्ये क्षमता वृध्दी आणि पायाभूत सुविधांसाठी भारताच्या सहकार्याची अफगाणिस्तान प्रशंसा करत असल्याच्या भावना डॉ. अब्दुल्ला यांनी व्यक्त केल्या.
शांततापूर्ण, समृध्द आणि लोकशाही अफगाणिस्तानसाठी या देशाच्या प्रयत्नांना सहकार्य देण्याच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.
अफगाणिस्तानमधल्या सुरक्षेबाबत विचारविमर्श यावेळी करण्यात आला. यासंदर्भात घनिष्ठ सहकार्य सुरु ठेवायला उभय नेत्यांनी मान्यता दिली.
बैठकीच्या समारोपाच्यावेळी, पोलिस प्रशिक्षण आणि विकास याविषयी तांत्रिक सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारावर या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.