पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातल्या कलबुर्गी येथे आणि तामिळनाडूतल्या कांचीपूरम येथे महत्वाच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला.
कर्नाटकातल्या कलबुर्गी येथे पंतप्रधानांनी बंगळुरू येथील इएसआयसी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय फलकाचे अनावरण करून ते राष्ट्राला अर्पण केले. तसेच हुबळी येथील केआयएमएसचा सुपर स्पेशालिटी ब्लॉक, बंगळुरू येथील आयकर अपिल न्यायाधिकरण इमारत तसेच बंगळुरू विद्यापीठात पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थिंनींसाठी महिला वसतीगृह आदींचे बटण दाबून उद्घाटन केले. पंतप्रधानांनी बीपीसीएलच्या डेपोचे रायचूर येथून कलबुर्गी येथे स्थलांतर करण्यासाठीची पायाभरणी आणि नामफलकाचे अनावरण केले.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना : आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थींशी पंतप्रधानांनी संवाद साधला.
तामिळनाडूतल्या कांचीपूरम येथे पंतप्रधानांनी विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा शुभारंभ केला. यामध्ये विक्रावंदीपासून तंजापूरपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग 45-सी चे चौपदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग-4 वरील करीयापेट्टी-बलाजपेट भागातील सहा मार्गिकांचे भूमिपूजनही पंतप्रधानांनी केले. 5 एमएमपीटीए क्षमतेचे एनमोर एलएनजी टर्मिनलही पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले. या टर्मिनलमुळे तामिळनाडू आणि शेजारील राज्यांमधील एलएनजीची मागणी पूर्ण व्हायला मदत होईल. इरोड-करूर-तिरुचिरापल्ली तसेच सालेम-करूर-डिंडीगल रेल्वेमार्गांचे विद्युतीकरणही पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले.
चेन्नई येथील डॉ. एमजीआर जानकी महिला कला आणि विज्ञान महाविद्यालयातील डॉ. एमजी.रामचंद्रन यांच्या पुतळ्याचे अनावरणही पंतप्रधानांनी व्हिडिओ लिंकद्वारे केले.
आज शुभारंभ करण्यात आलेल्या विकास कामांचा कर्नाटक आणि तामिळनाडूमधल्या लोकांना मोठा फायदा होणार आहे.