देशाच्या काही भागांमध्ये नुकत्याच झालेल्या तोडफोडीच्या घटनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. या घटनांमध्ये दोषी असणाऱ्यांवर कठोरकारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. देशाच्या काही भागांमध्ये पुतळे पाडले जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पंतप्रधानांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटनांचा तीव्र निषेध केला आहे. गृहमंत्रालयही तोडफोडीच्या या घटनांकडे गांभिर्याने पाहत आहे. राज्यांनी अशा घटना रोखण्यासाठी तातडीने आवश्यक ती पावले उचलावित असे, निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत. अशा घटनांशी सर्व संबंधितांवर योग्य त्या नियमांतर्गत खटले दाखल करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेही गृहमंत्रालयाने सांगितले आहे.