नेतृत्वाविषयी स्वामी विवेकानंदांचा उपदेश अनुसरण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या युवकांना केले आहे. दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला ते आज संबोधित करत होते. व्यक्ती विकास ते संस्था उभारणी आणि संस्था उभारणी ते व्यक्ती विकास हे सदाचारी चक्र सुरु करण्यासाठी स्वामीजींचे योगदान त्यांनी विशद केले.
स्वामी विवेकानंद यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींनी संस्थांची निर्मिती केली आणि त्यांनी संस्था उभारणाऱ्या नव्या व्यक्तींना घडवले. यामुळे व्यक्ती विकास ते संस्था उभारणी असे सदाचाराचे चक्र सुरु झाले, असे पंतप्रधान म्हणाले. व्यक्ती कंपनीची उभारणी करते आणि कंपनीची परिसंस्था अनेक प्रतिभावान व्यक्तींचा उदय घडवते आणि या व्यक्ती त्यांच्या काळात नव्या कंपन्या घडवतात असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात उपलब्ध असलेल्या लवचिकतेचा आणि कल्पक शिक्षण प्रारुपाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले.
युवकांच्या आशा आकांक्षा, कौशल्ये आणि त्यांची पसंती यांना प्राधान्य देत उत्तम व्यक्ती घडवण्याचा या धोरणाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. युवकांना उत्तम शैक्षणिक आणि उद्योजकता संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत यावर त्यांनी भर दिला. देशात परिसंस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असून या परीसंस्था अभावी आपल्या युवकांना अनेकदा परक्या देशाकडे पाहणे भाग पडत होते असे ते म्हणाले.
आत्मविश्वास, निर्मळ मन, निडर वृत्ती आणि साहसी असलेला युवक देशाचा पाया असल्याचे स्वामी विवेकानंद यांनीच जाणले यावर पंतप्रधानांनी भर दिला. युवकांसाठी स्वामी विवेकानंद यांनी दिलेले मूलमंत्र त्यांनी सांगितले. शारीरिक तंदुरुस्तीसाठी ‘लोखंडासारखे बलवान स्नायू आणि पोलादासारख्या नसा’ हा मंत्र त्यांनी अधोरेखित केला. केंद्र सरकार ‘फिट इंडिया’ मोहीम, योग यांना प्रोत्साहन आणि क्रीडा क्षेत्रासाठी आधुनिक सुविधा पुरवत आहे. व्यक्तिमत्व विकासासाठी ‘स्वतःवर विश्वास ठेवा’ नेतृत्व आणि संघटन कार्यासाठी स्वामीजींनी ‘सर्वावर विश्वास ठेवा ‘ असा संदेश दिला आहे.