देशात 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उदिृष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकीकृत प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधानांनी आज वरिष्ठ अर्थतज्ञ, उत्पादन, प्रवास आणि पर्यटन, तयार कपडे आणि एफएमसीजी क्षेत्रातल्या उद्योजकांशी तसेच कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वित्त क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा केली.
अर्थसंकल्पाचा एक भाग म्हणून नवी दिल्लीत नीती आयोगाच्या कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
सुमारे दोन तास चाललेल्या या खुल्या चर्चेमुळे प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांचे अनुभव तसेच आपापल्या क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांचे अनुभव ऐकायला मिळाल्याबद्दल आनंद झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
यामुळे धोरणकर्ते आणि विविध हितधारकांमध्ये समन्वय वाढेल असे ते म्हणाले.
5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेची कल्पना अचानक सुचलेली नाही तर देशाच्या सामर्थ्याच्या सखोल ज्ञानावर आधारित कल्पना आहे असे पंतप्रधान म्हणाले.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत क्षमतेने अर्थव्यवस्थेच्या मूलभूत तत्वांची ताकद आणि पुन्हा उभारी घेण्याची क्षमता दर्शवल्याचे ते म्हणाले.
पर्यटन, नगर विकास, पायाभूत आणि कृषी आधारित उद्योग यासारख्या क्षेत्रांमध्ये अर्थव्यवस्थेला गती देण्याची तसेच रोजगार निर्मितीची अपार क्षमता असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या प्रकारच्या मंचावरुन केल्या जाणाऱ्या खुल्या चर्चेमुळे निकोप चर्चा होऊन समस्या जाणून घ्यायला मदत होते असे ते म्हणाले.
यामुळे सकारात्मकतेचे वातावरण आणि आपण करु शकतो अशी भावना समाजात वाढीस लागेल असे पंतप्रधान म्हणाले.
भारत ही अमर्याद संधींची भूमी असून सर्व संबंधितांनी वास्तव आणि समज यामधील दरी सांधण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती त्यांनी केली.
आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करायला हवे आणि एका देशाप्रमाणे विचार करायला सुरुवात करायला हवी असे ते म्हणाले.
शंकर आचार्य, आर. नागराज, फरजाना आर्फिदी यांच्यासारखे अर्थतज्ञ, व्हेंचर कॅपिटालिस्ट प्रदीप शाह, अप्पाराव मल्लवरपू, दीप कालरा, पतांजली गोविंद केसवानी, दीपक सेठ, श्रीकुमार मिश्रा यांच्यासारखे उद्योजक आणि आशिश धवन, शिव सरीन यांच्यासारखे तज्ञ या चर्चेत सहभागी झाले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल, कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्राम विकास, पंचायत राज मंत्री नरेंद्र तोमर, विविध मंत्रालयांचे सचिव, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार आणि नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हे देखील बैठकीला उपस्थित होते.