देशातील कोविड-19 विषयक सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. देशातील प्राणवायूची उपलब्धता, औषधे, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा इत्यादी बाबींचा त्यांनी परामर्श घेतला.
देशात प्राणवायूची उपलब्धता आणि पुरवठा वाढविण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यावर काम करणाऱ्या अधिकारप्राप्त गटाने पंतप्रधानांना दिली. राज्यांना वितरित केल्या जात असलेल्या प्राणवायूमध्ये होत असलेल्या वाढीची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. देशातील द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचे उत्पादन ऑगस्ट 2020 मध्ये दररोज 5700 मेट्रिक टन इतके होत असे, तेच आता (25 एप्रिल 2021 रोजी) 8922 मेट्रिक टन इतके झाले असल्याविषयी यावेळी चर्चा झाली. द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचे देशान्तर्गत उत्पादन एप्रिल 2021 अखेरपर्यंत प्रतिदिनी 9250 मेट्रिक टनापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
पीएसए प्राणवायू निर्मिती प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्यासाठी राज्य सरकारांशी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तर असे प्रकल्प उभारण्यासाठी राज्यांनाही प्रोत्साहन देत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली.
प्राणवायूच्या वाहतुकीसाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वेसेवेची तसेच भारतीय हवाई दलाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या उड्डाणांची त्यांना माहिती देण्यात आली.
वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि कोविड व्यवस्थापन विषयक अधिकारप्राप्त गटाने पंतप्रधानांना, खाटा आणि अतिदक्षता विभागांची उपलब्धता वाढविण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच संसर्गाची साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) सुरु असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली. कोविड व्यवस्थापनासाठी विकसित केलेल्या विशिष्ट मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी राज्यांतील संबंधित संस्थांनी करण्याची खबरदारी घेण्यावर पंतप्रधानांनी भर दिला.
कोविड समुचित वर्तनाविषयी जनजागृती करण्यासाठी होत असलेल्या कामाची माहिती संपर्कविषयक अधिकारप्राप्त गटाने दिली.
कॅबिनेट सचिव, गृहसचिव, माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव, औषध उद्योग सचिव, नीती आयोगाचे सदस्य, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक, जैवतंत्रज्ञान सचिव यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी सदर बैठकीला उपस्थित होते.