पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या बुरुजावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात, भारताच्या अर्थव्यवस्थेची जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थाच्या क्रमवारीत 10 वरुन पाचव्या स्थानापर्यंतची झेप, इथल्या 140 कोटी नागरिकांचेच श्रेय असल्याचेच सांगितले. केंद्र सरकारने, पैशांच्या विनियोगातील गळती थांबवली, एक भक्कम अर्थव्यवस्था निर्माण केली आणि जास्तीत जास्त निधी गरिबांच्या कल्याणासाठी खर्च केला, त्यामुळेच, अर्थव्यवस्थेने ही प्रगती साध्य केली, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज मला माझ्या देशातील लोकांना सांगायचे आहे, की जेव्हा देश आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतो, तेव्हा त्याचा अर्थ तो केवळ सरकारी खजिना भरलेला असतो, असा नाही, तर, त्यातून देशाची आणि देशातल्या लोकांची क्षमता वाढवली जाऊ शकते. जर सरकारने त्यांच्याकडील पै न पै केवळ जनतेच्या कल्याणासाठी खर्च करण्याचा संकल्प केला, तर त्याचे परिणाम आपल्याला आपोपाच दिसतात, असे पंतप्रधान म्हणाले. 10 वर्षांपूर्वी, केंद्र सरकार राज्यांसाठी 30 लाख कोटी रुपये खर्च करत असे.मात्र गेल्या नऊ महिन्यांत, ही रक्कम 100 लाख कोटी रुपयांपर्यन्त पोहोचले आहे.
स्वयंरोजगाराच्या क्षेत्राविषयी बोलतांना पंतप्रधान म्हणाले, “ 20 लाख कोटींपेक्षा अधिक कर्जे युवाकांना त्यांचा उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी देण्यात आली आहेत.आतापर्यंत 8 कोटी लोकांनी आपले उद्योग सुरू करत, एक दोघांना त्यात रोजगारही दिला आहे. म्हणूनच, प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ मिळणाऱ्या आठ कोटी युवकांमध्ये आणखी आठ-दहा कोटी युवकांना रोजगार देण्याची क्षमता आहे.” असे पंतप्रधान म्हणाले.
कोविड- 19 महामारीचा संदर्भ देत, मोदी म्हणाले “आम्ही कोविड काळात एमएसएई उद्योगांना वाऱ्यावर सोडले नाही. ह्या महामारीच्या काळात त्यांना सरकारकडून 3.5 लाख कोटी रुपयांची मदत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या नव्या आणि विकासोत्सुक युवा वर्गाविषयी बोलतांना ते म्हणाले. “ जेव्हा देशातून गरीबी संपते, तेव्हा मध्यमवर्गांची ताकद वाढते. आणि मी तुम्हाला आज वचन देतो की येत्या पांच वर्षात देश तिसऱ्या अर्थव्यवस्थेचे शिखर नक्कीच गाठेल, जेव्हा गरिबांची क्रयशक्ती वाढते, त्याचवेळी मध्यमवर्गाची व्यापार करण्याची ताकद वाढते, मग ते शहर असो की गांव, जेव्हा एखाद्या गावाची क्रयशक्ती वाढते. गावे आणि शहरांची अर्थव्यवस्था अधिक वेगाने धावू लागते. हा परस्पर सबंध हेच आपले अर्थचक्र आहे. आणि त्या अर्थचक्राला गती देऊन, आपल्याला पुढे जायचे आहे.”
याशिवाय, पंतप्रधान म्हणाले, “जेव्हा प्राप्तिकराची (सवलत) मर्यादा 2 लाख रुपयांवरून 7 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाते. तेव्हा तर त्याचा सर्वात मोठा फायदा पगारदार वर्गाला विशेषत: मध्यमवर्गीयांना होतो.”
जगाला एकत्रितपणे भेडसावणाऱ्या अलीकडच्या समस्यांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, “जग अद्याप कोविड-19 महामारीच्या फटक्यातून बाहेर आलेले नाही आणि त्यात युद्धाने एक नवीन समस्या निर्माण केली. आज जग महागाईच्या संकटाचा सामना करत आहे.”
महागाईशी लढा देण्याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले, “भारताने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. आपल्या गोष्टी जगापेक्षा चांगल्या आहेत असा विचार आपण करू शकत नाही, मात्र माझ्या देशबांधवांवरचा महागाईचा भार कमी करण्यासाठी आपल्याला या दिशेने अधिक पावले उचलावी लागतील. महागाई आटोक्यात आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच राहतील.”