परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारहाणीत मृत्यू पावलेले नवी दिल्लीतील ई-रिक्ष चालक रवींद्र कुमार यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य निधीतून 1 लाख रुपये मंजूर केले आहेत. उघड्यावर मूत्र विसर्जन करणाऱ्या दोन व्यक्तींना थांबवणारे रवींद्र कुमार यांचा मारहाणीत मृत्यू झाला होता. पंतप्रधानांनी या घटनेची निंदा केली असून या निर्घृण कृत्याला जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तत्पूर्वी केंद्रीय नगर विकास तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत ई-रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. हे कृत्य निंदनीय असल्याचे सांगत नायडू यांनी आपल्या वेतनातून 50 हजार रुपयांचा धनादेश कुटुंबीयांना दिला. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, असेही नायडू यांनी स्पष्ट केले.