पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश गुंतवणुकदार परिषद 2018 ला संबोधित केले.
जेंव्हा परिवर्तन घडते तेंव्हा ते सर्वांनाच प्रत्यक्ष रुपात दिसते. उत्तर प्रदेशमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणातल्या गुंतवणुकदारांच्या सहभागाने इतकी विशाल गुंतवणुकदार परिषद आयोजित करणे हे परिवर्तनाचेच द्योतक आहे. इतक्या कमी काळात या राज्याने स्वत:ला विकास आणि भरभराटीच्या मार्गावर नेले याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
या राज्याला विपुल संसाधने लाभली असून अपार क्षमताही लाभली आहे. कृषी क्षेत्र ही या राज्याची ताकद आहे. राज्यातले नकारात्मक वातावरण बदलून सकारात्मक आणि आशादायी वातावरण निर्माण केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रशंसा केली. विविध क्षेत्रासाठी, राज्य सरकार योग्य धोरणं राबवत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. शेतकरी, महिला आणि युवकांप्रती दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरकार गांभीर्याने काम करत असल्याचे ते म्हणाले.
एक जिल्हा, एक उत्पादन योजनेच्या दिशेने राज्य सरकार काम करत आहे. एक जिल्हा, एक उत्पादन या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या स्किल इंडिया मिशन, स्टँड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया, प्रधानमंत्री मुद्रा योजना यासारख्या योजना उपयुक्त ठरणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
कृषी क्षेत्रातली नासाडी रोखण्यासाठी प्रधान मंत्री किसान संपदा योजना उपयुक्त ठरेल. राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड असल्यामुळे इथेनॉल उत्पादनाची राज्यात मोठी क्षमता आहे. उत्तर प्रदेशात संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर उभारण्यात येणार असून त्यामुळे बुंदेलखंड विभागाच्या विकासाला मदत होणार आहे.
प्रयाग येथे पुढच्या वर्षी आयोजित केला जाणारा कुंभमेळा, जगातला अशा प्रकारचा सर्वात मोठा कार्यक्रम ठरेल असेही पंतप्रधान म्हणाले.