पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या 54 व्या पोलिस महासंचालकांच्या परिषदेला पंतप्रधानांनी आज मार्गदर्शन केले. गेले दोन दिवस या परिषदेमध्ये विविध विषयांवर विचार मंथन करण्यात आले. आज सायंकाळी परिषदेचा समारोप पंतप्रधानांच्या मार्गदर्शनपर भाषणाने झाला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रपती पदक सन्मान मिळवलेल्या गुप्तचर संस्थेच्या पोलिस अधिका-यांचा गौरव करण्यात आला.
परिषदेच्या माध्यमातून येत असलेल्या महत्वपूर्ण आणि मौलिक सूचना तसेच विचारांची होणारी देवाण-घेवाण लक्षात घेवून पूर्वी एक दिवसीय होणारी पोलिस महासंचालकांची ही परिषद आता 2015 पासून दोन-तीन दिवसांची होवू लागली आहे. तसेच अलिकडे या परिषदेचे आयोजन दिल्लीच्याबाहेर देशात वेगवेगळ्या भागात होवू लागली आहे. तसेच परिषदेच्या आयोजन प्रक्रियेत अतिशय महत्वपूर्ण बदल करण्यात आले असून पंतप्रधान आणि गृहमंत्री यांची उपस्थिती या परिषदेला असते. देशाला असलेला धोका लक्षात घेवून पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या नेतृत्वाखाली या परिषदेत पोलिस महासंचालकांची समिती नियुक्त करण्यात आली. तसेच या परिषदेत काही धोरणात्मक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावर्षी देशांतर्गत दहशतवाद, नक्षलवादी कारवाया, सागरी सुरक्षा, सायबर धोका अशा महत्वपूर्ण विषयावर वेगवेगळ्या 11 गाभा समूह स्थापन करून विचारमंथन करण्यात आले.
देशभरामध्ये शांतता नांदण्यासाठी पोलिस कर्मचारी करीत असलेल्या अथक परिश्रमाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पोलिस दलाचे कौतुक केले. पोलिसांच्या या कष्टामागे त्यांचा परिवारही आहे, हे आपण कोणीही विसरता कामा नये, असंही मोदी यावेळी म्हणाले. पोलिस दलाच्या आश्वासक कामगिरीमुळे समाजात पोलिसांविषयी विशेषतः महिला आणि मुलांच्या मनात आदराची भावना असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. महिला आणि मुलींना समाजात वावरताना सुरक्षित वाटतं, त्याचे श्रेय पोलिस खात्याला जाते, असंही मोदी यावेळी म्हणाले.
सामान्य जनतेला नेमके काय वाटते, त्यांच्या पोलिसांकडून आशा-अपेक्षा काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाची एखाद्या शस्त्राप्रमाणे मदत होत आहे.
सरकारने ‘अॅक्ट ईस्ट’ धोरण तयार केले आहे, यासाठी ईशान्येकडील राज्यांमधील पोलिस महासंचालकांनी विशेष मदत करण्याचे आवाहन या परिषदेत करण्यात आले.
पोलिस अधिकारी वर्गाला सातत्याने तणावपूर्ण परिस्थितीमध्ये कार्यरत रहावं लागत आहे, यातून मार्ग काढण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी परीक्षा देताना ते उमेदवार येत असलेल्या तणावाचे व्यवस्थापन करतात, तसेच पोलिस अधिकारी वर्गानेही तणाव कमी करण्याचे प्रयत्न करावेत. राष्ट्रहितासाठी समाजातल्या दुर्बल घटकासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.