पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमधील विंध्याचल प्रदेशातील मिर्झापूर आणि सोनभद्र जिल्ह्यातील ग्रामीण पेयजल पुरवठा प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान गाव पाणी व स्वच्छता समिती / पाणी समिती सदस्यांशी संवाद साधतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील यावेळी उपस्थित राहतील.
या प्रकल्पांमुळे 2,995 गावांमधील ग्रामीण भागातील घरांना नळ जोडणी दिली जाणार असून या जिल्ह्यांतील जवळपास 42 लाख लोकांना याचा फायदा होणार आहे. या सर्व खेड्यांमध्ये गाव पाणी व स्वच्छता समिती / पाणी समिती गठीत करण्यात आल्या असून प्रकल्पांचे क्रियान्वयन आणि देखभाल करण्याची जबाबदारी या समित्यांची असणार आहे. प्रकल्पांचा एकूण अंदाजित खरच 5,555 कोटी रुपये आहे. हे प्रकल्प 24 महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
जल जीवन अभियानाविषयी
15 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केल्यानुसार, वर्ष 2024 पर्यंत देशातील प्रत्येक ग्रामीण घरात नळ जोडणी देण्याचे जल जीवन अभियानाचे उद्दिष्ट आहे. ऑगस्ट, 2019 मध्ये अभियानाची घोषणा केली तेव्हा ग्रामीण भागातील 18.93 कोटी ग्रामीण घरांपैकी केवळ 3.23 कोटी (17%) नळ जोडणी होती म्हणजेच पुढील चार वर्षांत 15.70 कोटी घरांना नळ जोडणी द्यायची होती. गेल्या 15 महिन्यांत देशात कोविड-19 साथीच्या रोगाची परिस्थिती असताना देखील 2.63 कोटी कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली असून सद्यस्थितीत सुमारे 5.86 कोटी (30.67%) ग्रामीण घरांमध्ये नळ जोडणी दिली आहे.