महामहिम,पंतप्रधान अँटोनियो कोस्टा, मान्यवर प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी,
सुरुवातीलाच, पोर्तुगालमध्ये गेल्या आठवड्यात लागलेल्या वणव्यात बळी पडलेल्यांविषयी मी अतिशय दुःख आणि सहानुभूती व्यक्त करतो. या आगीचे पीडित आणि त्यांच्या कुटुबियांचा आम्ही सदैव विचार करू आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करू.
मित्रांनो, अतिशय प्राचीन ऐतिहासिक आणि भक्कम आर्थिक आणि एकमेकांच्या जनतेशी जनतेचे संबंध असलेले आम्ही दोन देश आहोत. त्यामुळेच कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने आतापर्यंत पोर्तुगालला द्विपक्षीय भेट दिली नसल्याचे जाणून मला आश्चर्य वाटले. मात्र, केवळ सहा महिन्यांच्या काळात भारत आणि पोर्तुगाल यांच्यात दुस-यांदा चर्चा होत असल्याचे पाहून मला अतिशय समाधान होत आहे. अतिशय जिव्हाळ्याने आणि प्रेमाने इतक्या अल्प कालावधीच्या आगाऊ सूचनेनंतर माझे स्वागत केल्याबद्दल मी पंतप्रधान कोस्टा यांचा ऋणी आहे. आम्हाला या वर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधान कोस्टा यांचे केवळ द्विपक्षीय भेटीसाठीच नव्हे तर जगभरात राहणा-या परदेशस्थ भारतीयांचा सोहळा असलेला प्रवासी भारतीय दिवसाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्वागत करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. जगभरातील सर्वोत्तम परदेशस्थ भारतीयांचे पंतप्रधान कोस्टा प्रतिनिधित्व करतात.
मित्रांनो, पंतप्रधान कोस्टा आणि मी आज विविध प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा केली आणि त्यांच्या ऐतिहासिक भारतभेटीनंतर झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. आमचे आर्थिक संबंध सातत्याने वरच्या दिशेने प्रवास करत आहेत. गेल्या वर्षी द्विपक्षीय व्यापारात वाढ होऊन तो 17 टक्के झाला आणि 2016-17 मध्ये पोर्तुगालची भारतातील थेट परदेशी गुंतवणूक जरी कमी असली तरी ती दुप्पट झाली. पण तरीही आपल्याला दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये मालवाहतूक, सेवा, भांडवल आणि मानव संसाधन यांचा ओघ वाढवण्यासाठी आणखी बरेच काही करता येईल. यासंदर्भात पोर्तुगीज अर्थव्यवस्थेची उभारी आणि भक्कम भारतीय विकास यामुळे आपल्या दोघांनाही एकत्र विकसित होण्याच्या उत्तम संधी निर्माण झाल्या आहेत. मित्रांनो, पोर्तुगाल उद्योजकतेसाठी युरोपीय विश्वातील सर्वात जास्त सक्रिय व्यवस्था म्हणून उदयाला येत आहे. भारतातही अतिशय भक्कम आणि स्थिर अशी स्टार्ट अप उद्योग व्यवस्था आहे. स्टार्ट अप व्यवस्था हे एक अतिशय उत्तम असे अवकाश असून त्यामध्ये युवकांना घडवले जात आहे, नव्या कल्पनांना, तंत्रज्ञानाला आणि समाजाला फायदेशीर ठरतील अशी मूल्ये आणि संपत्ती निर्माण करणा-या नवीन्यपूर्ण संकल्पनांना वाव दिला जात आहे. पंतप्रधान कोस्टा यांच्या भारत भेटीदरम्यान मी त्यांच्याशी भारत-पोर्तुगाल आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप केंद्राबाबत चर्चा केली होती. अतिशय थोड्या कालावधीत ही संकल्पना प्रत्यक्षात येत असलेली पाहताना मला आनंद होत आहे. पंतप्रधान कोस्टा यांच्या सोबत संयुक्तपणे ती सुरू करण्याची मी प्रतीक्षा करत आहे. करआकारणी, प्रशासकीय सुधारणा, विज्ञान, अंतराळ, युवक व्यवहार आणि क्रीडा क्षेत्रातील नवे करार आपली भागीदारी विस्तारण्यासाठी वाव देत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आपल्या सहकार्याला देखील चालना मिळत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान विषयक सहकार्याला पाठबळ देण्यासाठी आम्ही 40 लाख युरोंचा संयुक्त एस अँड टी निधी उभारण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे. नॅनोतंत्रज्ञान, सागरी विज्ञान आणि महासागरशास्त्र या क्षेत्रातील तज्ञांकडूनही ज्ञान मिळवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ही कल्पना पंतप्रधान कोस्टा यांच्या भारतभेटीच्या वेळी उदयाला आली. अंतराळ आणि महासागर विज्ञान या दोन्ही क्षेत्रांमध्ये आम्हाला पोर्तुगालसोबत अटलांटिक आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे.
मित्रांनो,
आमच्या दोन्ही देशांच्या जनतेचे परस्परांशी अतिशय जागृत आणि सातत्याने वृद्धिंगत होत जाणारे संबंध आहेत. पोर्तुगालमधील भारतीय वंशाच्या लोकांनी आमचे द्विपक्षीय संबंध बळकट करण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पोर्तुगीजांचे फूटबॉलवर अतिशय प्रेम आहे. पंतप्रधान कोस्टा स्वतःच फूटबॉलचे मोठे चाहते आहेत. यामुळे आमच्या दोन्ही देशांच्या समाजांना जोडणारा एक बंध तयार होईल. आमची सांस्कृतिक भागीदारी विस्तारत आहे. आम्ही लिस्बन विद्यापीठामध्ये भारतीय शास्त्र अध्ययनाचे पद स्थापन केले आहे. भारतीय चित्रपट पोर्तुगीज उपशीर्षकांसह दाखवले जात आहेत आणि परस्परांना उपयुक्त ठरेल असा हिंदी पोर्तुगीज शब्दकोष तयार केला जात आहे. गोवा आणि पोर्तुगाल यांच्यात सतराव्या शतकात झालेल्या पत्रव्यवहारांचा समावेश असलेल्या 12000 कागदपत्रांची डिजिटल आवृत्ती आम्हाला दिल्याबद्दलही मी पोर्तुगालचे आभार मानत आहे. आमच्या संशोधकांना हा महत्त्वाचा पुरातन ठेवा खूपच फायदेशीर ठरेल.
मित्रांनो,
भारत आणि पोर्तुगाल आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय भक्कम भागीदार आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व मिळवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आणि त्याचबरोबर बहुस्तरीय निर्यात नियंत्रण व्यवस्थेला सातत्यपूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल मी पोर्तुगालचे आभार मानतो. दहशतवाद आणि हिंसाचारी कट्टरवाद यांच्या विरोधातही आमचे सहकार्य बळकट करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
महामहिम,
पुन्हा एकदा अतिशय जिव्हाळ्याने केलेले स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल आणि तुमच्या व्यग्र वेळापत्रकातून आमच्यासाठी वेळ काढल्याबद्दल मी तुमचे आभार मानत आहे.
मुईतो ओब्रिगादो, खूप खूप धन्यवाद
PM @antoniocostapm & I held wide ranging talks. We reviewed the progress since his visit to India. Our bilateral trade and FDI has grown: PM pic.twitter.com/iFrQkPG3b2
— PMO India (@PMOIndia) June 24, 2017
Start-up sphere is an interesting space for cooperation. It is a great means to generate value and wealth for society: PM @narendramodi pic.twitter.com/FqH6QhsFAt
— PMO India (@PMOIndia) June 24, 2017
New agreements in taxation, science, youth affairs and sports outline the expanding scope of our partnership: PM @narendramodi pic.twitter.com/nnYAZprtjV
— PMO India (@PMOIndia) June 24, 2017