कंबोडियाच्या साम्राज्याचे पंतप्रधान महामहीम ह्युन सेन,
त्यांच्या शिष्टमंडळातील माननीय सदस्य,
मान्यवर अतिथी,
प्रसारमाध्यमातील मित्रगण,
उपस्थित स्त्री-पुरुष,
तुम्हा सर्वांना शुभेच्छा!
पंतप्रधान ह्युन सेन यांचे पुन्हा एकदा स्वागत करताना मला आनंद होत आहे. दहा वर्षांच्या अंतराळानंतर त्यांची ही भारत भेट आहे.
पंतप्रधान तुम्ही स्वतः भारताशी अतिशय चांगल्या प्रकारे परिचित असलात आणि भारताला देखील तुमची ओळख असली, तरीही यावेळच्या भारतभेटीदरम्यान तुम्हाला आमच्या देशात होत असलेली आर्थिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तन जवळून पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे, अशी माझी खात्री आहे.
दोन दिवसांपूर्वी असियान भारत परिषदेमध्ये असियान-भारत सहकार्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. असियान समूहातील दहा देश आणि भारताच्या नेत्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले जेणेकरून भविष्यात असियान आणि भारत यांच्यातील सहकार्य एका नव्या उंचीवर पोहोचेल.
यासंदर्भात पंतप्रधान ह्युन सेन यांनी माझे निमंत्रण स्वीकारून आणि या परिषदेला उपस्थित राहून आमचा सन्मान केला आहे.
केवळ इतकेच नाही, तुम्ही या परिषदेच्या विचारमंथनात आणि फलनिष्पत्तीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देत आहे.
मित्रांनो,
गेल्या शतकाच्या उत्तरार्धात कंबोडियामध्ये झालेल्या राजकीय स्थित्यंतराच्या काळात या जुन्या मित्राच्या आणि त्यांच्या नागरिकांच्या पाठिशी भारत खंबीरपणे उभा राहिल्यावर भारत आणि कंबोडिया यांच्यातील ऐतिहासिक संबध आणखी दृढ झाले.
सद्यस्थितीतील गरजांनुसार सर्वच क्षेत्रातील संबंध आणखी बळकट करण्याबाबत पंतप्रधान ह्युन सेन यांनी सहमती व्यक्त केली आहे.
आर्थिक, सामाजिक विकास, क्षमतावृद्धी, संस्कृती, व्यापार, पर्यटन आणि दोन्ही देशातील जनतेचा परस्परांशी संवाद या सर्व क्षेत्रात कंबोडियाशी भागीदारी करण्याची भारताची केवळ इच्छाच नाही तर त्यासाठी भारत वचनबद्ध आहे.
आपला सामाईक वारसा, आपल्या सांस्कृतिक संबधांचा एक महत्त्वाचा भाग आहे. 12व्या शतकात बांधण्यात आलेले ऐतिहासिक अंग्कोर वात मंदिर हे या सहकार्याचेच उदाहरण आहे.
कंबोडियाच्या या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यामध्ये योगदान देता येत असल्याबद्दल भारताला आनंद वाटत आहे.
आपल्या भाषांची उत्पत्ती देखील पाली आणि संस्कृतपासून झाली आहे. आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांची मूळे अतिशय खोलवर रुजलेली असल्याने दोन्ही देशांच्या सहमतीने पर्यटनाला चालना मिळण्याच्या अनेक शक्यता आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे.
मित्रांनो,
भारतासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे की आमचा मित्र कंबोडिया झपाट्याने आर्थिक प्रगती करत आहे आणि गेल्या दोन दशकात वार्षिक 7 टक्के दराने विकास करत आहे.
जगातील सर्वात जास्त वेगाने विकास करणारी भारताची अर्थव्यवस्था आहे. आपल्या परंपरा आणि सांस्कृतिक मूल्ये सामाईक असल्याने आपल्या दोन्ही देशातील व्यापाराला चालना देण्यामध्ये एक नैसर्गिक समन्वय आहे.
कंबोडियाची उदार आर्थिक धोरणे आणि असियान आर्थिक समुदायाच्य स्थापनेमुळे कंबोडियामध्ये आरोग्य, औषधे, माहिती तंत्रज्ञान, कृषी, स्वयंचलित वाहन उद्योग आणि वाहनांचे सुटे भाग, वस्रोद्योग इत्यादी क्षेत्रातील भारतीय गुंतवणुकीला एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
आपले द्विपक्षीय व्यापारी संबंध आगामी वर्षांमध्ये आणखी वाढीला लागतील आणि भारतातील जास्तीत जास्त गुंतवणूकदार आणि व्यापारी कंबोडियामध्ये फायदेशीर व्यवसाय करू शकतील, असा मला विश्वास आहे.
मित्रांनो,
विकासामध्ये सहकार्य हा भारताच्या कंबोडियाशी असलेल्या संबंधांचा एक महत्त्वाचा भाग आहे.
भारताचा एक महत्त्वाचा भागीदार या नात्याने कंबोडियाचा सामाजिक आणि आर्थिक विकास करण्यासाठी भारत नेहमीच कटिबद्ध राहिला आहे आणि यापुढील काळातही ही बांधिलकी कायम राहील.
कंबोडियन सरकारच्या गरजांनुसार विविध प्रकल्पांसाठी विशेषतः आरोग्य, दळणवळण, डिजिटल कनेक्टिविटी या क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आम्ही अधिक जास्त कर्जाचे प्रस्ताव दिले आहेत.
दरवर्षी भारत कंबोडियामध्ये शीघ्र परिणामकारक 5 प्रकल्पांची अंमलबजावणी करत आहे. या प्रकल्पांची संख्या दरवर्षी 5 वरून 10 वर नेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तसेच आम्ही प्रकल्प विकासासाठी 500 करोड रुपयाच्या प्रकल्प विकास निधीची स्थापना देखील केली आहे.
या निधीचा वापर उद्योग आणि व्यवसायांचा विस्तार करण्यासाठी आणि पुरवठा साखळी आणखी प्रभावी बनवण्यासाठी देखील करता येऊ शकेल.
कंबोडियामध्ये आम्ही एक माहिती तंत्रज्ञानाचे आणि माहिती तंत्रज्ञानविषयक सेवांचे गुणवत्ता केंद्र उभारत आहोत.
पाच दशकांहून अधिक काळापासून भारतीय तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्य कार्यक्रमात, भारत कंबोडियाचा एक क्रियाशील भागीदार राहिला आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून 1400 पेक्षा जास्त कंबोडियन नागरिकांनी क्षमतावृद्धी प्रशिक्षण घेतले आहे.
आम्ही भविष्यातही हा कार्यक्रम सुरू ठेवणार आहोत आणि कंबोडियाच्या गरजेनुसार त्याचा विस्तार करण्याची आमची तयारी आहे.
मित्रांनो,
आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या दोन्ही देशांदरम्यान अतिशय चांगले सहकार्य आहे आणि अनेक प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय मंचावर आपले विश्वासार्ह संबंध आहेत.
भारत आणि कंबोडिया यांच्यात सध्या असलेला समन्वय आणखी वाढवत परस्परांना आंतरराष्ट्रीय मंचावर पाठबळ देणे सुरू राहील.
माझ्या भाषणाच्या शेवटी मी पंतप्रधान ह्युन सेन यांचे भारताचे एक एकात्मिक मित्र आणि आदरणीय अतिथी या नात्याने दिलेल्या भारत भेटीबद्दल आभार मानतो. त्यांचे भारतातील वास्तव्य सुखद आणि संस्मरणीय ठरेल, अशी मी आशा व्यक्त करतो.
मी याची देखील हमी देतो की नजीकच्या भविष्यात भारत कंबोडिया सहकार्य वृद्धिंगत करण्याची तयारी आहे जेणेकरून कंबोडिया आणि त्यांच्या नागरिकांशी असलेले आमचे अतिशय जवळचे आणि परंपरांगत घनिष्ठ संबंध आणखी बळकट होतील.