आदरणीय राष्ट्राध्यक्ष, अलेक्झांडर लुकाशेंकू,
मित्रहो,
आणि प्रसार माध्यमातील सर्व सदस्य,
राष्ट्राध्यक्ष लुकाशेंकू यांचे भारतात स्वागत करतांना मला आनंद होत आहे. दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक संबंधांना यावर्षी 25 वर्षे पूर्ण होत असतानांच ते भारतात आले आहेत.
यापूर्वी 1997 आणि 2007 साली राष्ट्राध्यक्ष लुकाशेंकू यांचे भारतात स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळाली होती. या भेटीतील आदरणीय राष्ट्रपतींना भारतात घडणाऱ्या परिवर्तनाचा अनुभव घेण्याची आणि ती पाहण्याची संधी मिळेल, अशी आशा मला वाटते.
आजची आमची चर्चा विविध विषयांवर आधारित आणि भविष्याशी निगडीत अशी होती. गेल्या अडीच दशकातील परस्पर संबंधांचा ओलावा उबदारपणा आमच्या चर्चेत कायम राहिला. द्विपक्षीय मुद्दे तसेच प्रादेशिक आणि जागतिक घडामोंडी संदर्भातील मतांची आम्ही देवाण-घेवाण केली. आमच्या भागिदारीच्या संरचेनचाही आम्ही आढावा घेतला आणि त्याचा विस्तार करण्यासाठी आवश्यक कल्पना आणि उपक्रमांबाबत चर्चा केली. सहकार्याच्या सर्व पैलूंबाबत संवाद वाढविण्याचा निर्णय आम्ही घेतला.
आपापल्या देशातील नागरिकांच्या हितासाठी दोन्ही देशातील भागिदारी वाढविण्यासंदर्भात भारताप्रमाणेच राष्ट्राध्यक्ष लुकाशेंकूही उत्सुक असल्याचे या भेटीत दिसून आले.
यापुढे आम्ही विविध आर्थिक मुद्दयांशी संबंधित प्रकल्पांवर काम करु तसेच परस्पर नैसर्गिक संबंध अधिक सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहू
आमच्या कंपन्यांनी खरेदी-विक्री या आराखडयातून बाहेर पडून अधिक सखोल भागिदारीकडे लक्ष दिले पाहिजे. फार्मास्यूटिकल्स, तेल आणि वायू, अवजड यंत्रसामुग्री आणि उपकरणे या क्षेत्रात उद्योग आणि गुंतवणूकीच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. गेल्यावर्षी फार्मास्यूटिकल्स क्षेत्रात भारतीय कंपन्यांनी तीन संयुक्त उपक्रम मार्गी लावत सकारात्मक सुरुवात केली आहे.
टायर, कृषी उद्योग क्षेत्रातील यंत्रसामुग्री आणि खाण कामासाठीची उपकरणे यांच्या उत्पादन क्षेत्रातही भागिदारीच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे बांधकामासाठीच्या अवजड यंत्रसामुग्रीची भारतात गरज वाढत असून बेलारुसकडे ती पूर्ण करण्याची औद्योगिक क्षमता आहे.
“मेक इन इंडिया” कार्यक्रमांतर्गंत, संरक्षण क्षेत्रात विकास आणि उत्पादन वाढीला आम्ही प्रोत्साहन देत आहोत. बेलारुसमध्ये विशिष्ट कार्यक्रमांसाठी 2015 साली भारताने देऊ केलेले 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स या पत रकमेचा विनियोग करण्यासंदर्भातील चर्चाही आम्ही सुरु ठेवली.
युरेशियन इकॉनॉमिक युनियन आणि इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरच्या अशा बहुपर्यायी आर्थिक उपक्रमांच्या माध्यमातून भारत आणि बेलारुस यांच्यात सध्या काम सुरु आहे. युरेशियन इकॉनॉमिक युनियनशी मुक्त व्यापार करारासंदर्भात भारताच्या वाटाघाटी सुरु आहेत.
मित्रहो,
विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्य बळकट करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. “बेलारुस” हा या क्षेत्रातील आमचा दीर्घकालीन सहकारी आहे.
धातू शुध्दीकरण आणि साहित्य, नॅनो मटेरियल, जैविक आणि वैद्यकीय विज्ञान तसेच रसायने अभियांत्रिकी विज्ञान अशा क्षेत्रांमध्ये नाविन्य आणि व्यावसायिक दृष्टीकोनावरही भर दिला जाईल. या प्रक्रियेत युवकांच्या अधिकाधिक सहभागाला प्रोत्साहन दिले जाईल.
बेलारुसच्या तंत्रज्ञानाबाबत माहिती देण्यासाठी भारतात तंत्रज्ञान प्रात्यक्षिक केंद्र उभारण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.
विकासात्मक सहकार्य क्षेत्रातही भारत आणि बेलारुस यांच्यातील भागिदारी दृढ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भारतीय तांत्रिक आणि सहकार्य कार्याक्रमात बेलारुस सक्रीय सहभागी आहे.
आंतरराष्ट्रीय मंचावर परस्पर स्वारस्याच्या बाबींसंदर्भात दोन्ही देशांमध्ये उत्तम सहकार्य आहे.
विविध मुद्दयांसंदर्भात भारत आणि बेलारुस यांचा परस्परांना पाठिंबा कायम राहील.
मित्रहो,
राष्ट्राध्यक्ष लोकाशेंकू आणि मी दोन्ही देशातील नागरिकांच्या सांस्कृतिक देवाण-घेवाणीचा समृध्द इतिहास आणि त्यामुळे निर्माण झालेला विश्वास याबाबत चर्चा केली. बेलारुसमधील अनेकांना भारतीय संस्कृती, खाद्यपदार्थ, चित्रपट, संगीत, नृत्य, योग आणि आयुर्वेद याबद्दल स्वारस्य असल्याचे समजल्यानंतर मला आनंद झाला.
दोन्ही देशांमधील संबंधांची अधिक मजबूत पायाभरणी करण्यासाठी पर्यटन आणि नागरिकांचे मुक्त आवागमन या बाबी उपयुक्त ठरतील, असे मला वाटते.
सरतेशेवटी राष्ट्राध्यक्ष लोकाशेंकू आमचे आदरणीय पाहुणे असून त्यांनी आमचे आतिथ्य स्वीकारल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आज आमच्यात झालेल्या चर्चा आणि त्यातील निकषांनुसार बेलारुससोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्नशील राहील. राष्ट्राध्यक्ष लूकाशेंकू यांचे भारतातील वास्तव्य स्मरणीय व्हावे, हीच सदिच्छा.
धन्यवाद.