आदरणीय पंतप्रधान शिंझो ॲबे,
आदरणीय शिष्टमंडळ सदस्य,
प्रसार माध्यम प्रतिनिधी,
कोन्नचिवा (शुभ दुपार/नमस्कार)
माझे विशेष मित्र, पंतप्रधान शिंझो ॲबे यांचे भारतात, विशेषत: गुजरातमध्ये स्वागत करण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद वाटतो. पंतप्रधान ॲबे आणि माझी भेट यापूर्वी अनेकदा विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये झाली आहे. मात्र भारतात त्यांचे स्वागत करणे ही माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब आहे. काल संध्याकाळी मला त्यांच्यासोबत साबरमती आश्रमात जाण्याची संधी मिळाली. आम्ही दोघे आज दांडी कुटिर येथेही गेलो. आज सकाळी आम्ही दोघांनी, जपानच्या सहकार्याने साकारणाऱ्या मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन केले हे फार मोठे पाऊल आहे. ही केवळ अतिजलद रेल्वे सेवेची सुरुवात नाही. भविष्यातील आपल्या गरजा लक्षात घेत रेल्वेची ही झेप मला नवभारताच्या निर्मितीची जीवनरेखा असल्याचे प्रतित होते आहे. भारताच्या वेगवान प्रगतीचा संपर्क आता अधिक वेगाशी जोडला गेला आहे.
मित्रहो,
परस्पर विश्वास, परस्परांच्या हिताची आणि काळजीची समज तसेच उच्चस्तरीय निरंतर संपर्क हे भारत-जपान संबंधांचे वैशिष्टय आहे. आमच्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक सहयोगाचा परिघ केवळ द्विपक्षीय किंवा प्रादेशिक स्तरापुरता मर्यादित नाही. जागतिक मुद्दयांबाबतही आमच्यात दृढ सहयोग कायम आहे. गेल्यावर्षी माझ्या जपान दौऱ्यादरम्यान आम्ही अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापरासंदर्भात एक ऐतिहासिक करार केला होता. त्याबद्दल मी जपानचे नागरिक, जपानची संसद आणि विशेष म्हणजे पंतप्रधान ॲबे यांचे हृदयापासून आभार मानतो. स्वच्छ ऊर्जा आणि वातारवरणातील बदल याविषयी आमच्या सहयोग क्षेत्रात या करारामुळे नवा अध्याय जोडला गेला आहे.
मित्रहो,
2016-17 मध्ये भारतात जपानने 4.7 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, हे प्रमाण गेल्यावर्षाच्या तुलनेत 80 टक्के जास्त आहे. आता जपान हा भारतातील तिसऱ्या क्रमाकांचा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. भारताचा आर्थिक विकास आणि सोनेरी भविष्यासाठी जपानमध्ये किती विश्वासाचे आणि आशादायक वातावरण आहे, हे यावरुन स्पष्ट होते. आगामी काळात भारत आणि जपानमध्ये वाढत्या उद्योगाबरोबरच लोकांचा लोकांशी संपर्कही वाढेल, असा अंदाज या वाढत्या गुंतवणूकीवरुन बांधता येतो. जपानच्या नागरिकांसाठी आम्ही व्हिसा ऑन अराएव्हल ही सुविधा आधीच सुरु केली आहे. आता आम्ही भारत आणि जपानच्या टपाल खात्याच्या सहकार्याने कूल बॉक्स सेवा सुरु करणार आहोत, जेणेकरुन भारतात राहणारे जपानी लोक जपानमधूनच आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ मागवू शकतील. त्याचबरोबर जपानमधील उद्योग समुदायाला मी विनंती करतो की, त्यांनी भारतात जास्तीत जास्त जपानी रेस्टॉरन्ट सुरु करावे. आजघडीला भारत अनेक स्तरावर परिवर्तनाच्या नव्या दिशेने वाटचाल करत आहे. उद्योग करण्यातील सुलभता असो, स्कील इंडिया असो, कर सुधारणा असो किंवा मेक इन इंडिया, या उपक्रमांच्या माध्यमातून भारत पूर्णपणे बदलतो आहे. जपानच्या उद्योगांसाठी ही फार मोठी संधी आहे. जपानमधील अनेक कंपन्या आमच्या राष्ट्रीय पथदर्शी कार्यक्रमांशी सखोलपणे जोडल्या गेल्या आहेत. आजच संध्याकाळी दोन्ही देशांच्या उद्योग नेतृत्वांसोबत आमची चर्चा आणि कार्यक्रमात त्यांचे प्रत्यक्ष लाभ जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. जपानच्या अधिकृत विकासात सहाय्यात आम्ही सर्वात मोठे सहयोगी आहोत आणि विविध क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आज झालेल्या करारांचे मी हार्दिक स्वागत करतो.
मित्रहो,
आमची चर्चा आणि आज झालेले सामंजस्य करार, भारत आणि जपानच्या भागिदारीतील सर्व क्षेत्रे अधिक दृढ करतील असा मला विश्वास वाटतो. याचबरोबर मी पुन्हा एकदा पंतप्रधान ॲबे आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाचे मी स्वागत करतो.
इज्यो दे गोजाइमस
अरिगातो गोजाइमस (धन्यवाद)
अनेकानेक धन्यवाद.
Expanding the horizons of bilateral relationship.
— Raveesh Kumar (@MEAIndia) September 14, 2017
The two leaders witness the exchange of MoUs/Agreements between #IndiaJapan pic.twitter.com/OBARyOTGOy
द्धिपक्षीय संबंधों का विस्तार
— Raveesh Kumar (@MEAIndia) September 14, 2017
दोनों प्रधान मंत्रिओं के समक्ष #IndiaJapan के बीच समझौता ज्ञापनों का आदान-प्रदान हुआ pic.twitter.com/mpBDxqORkt