संयुक्त राष्ट्र महासभेच्या (पीजीए) 77 व्या सत्राचे अध्यक्ष साबा कोरोसी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान, साबा कोरोसी यांनी जलस्रोत व्यवस्थापन आणि संधारण क्षेत्रासह समुदायांसाठी राबवण्यात येणाऱ्या भारताच्या परिवर्तनात्मक उपक्रमांची प्रशंसा केली. सुधारित बहुपक्षीयतेच्या दिशेने भारताच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकत, कोरोसी यांनी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नांमध्ये भारत आघाडीवर असल्याचे महत्त्व अधोरेखित केले.
पदभार स्वीकारल्यानंतर भारताचा पहिलाच द्विपक्षीय दौरा केल्याबद्दल पंतप्रधानांनी साबा कोरोसी यांचे आभार मानले. जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित साबा कोरोसी यांच्या दृष्टिकोनाची त्यांनी प्रशंसा केली. संयुक्त राष्ट्र 2023 जल परिषदेसह 77 व्या संयुक्त राष्ट्र महासभे दरम्यान कोरोसी यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील उपक्रमांना भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याचे आश्वासन त्यांनी साबा कोरोसी यांना दिले.
समकालीन भू-राजकीय वास्तविकता खऱ्या अर्थाने प्रतिबिंबित व्हावी या दृष्टीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह बहुपक्षीय प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी भर दिला.