आदरणीय सभापतीजी, आदरणीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विस्तृत चर्चा या सभागृहाने केली आहे. सुमारे 38 मान्यवर सदस्यांनी आपले विचार मांडले आहेत. पहिल्याच भाषणासह अमित शाह यांनी प्रस्ताव मांडला. विनय सहस्रबुद्धे यांनी अनुमोदन दिले. गुलाम नबी आझाद, डी.पी. त्रिपाठी, प्रमोद तिवारी, सरदार बलवंत सिंह, नरेश अग्रवाल, दिलीप कुमार तिर्की , संजय राऊत, आनंद शर्मा, डेरेक ओब्रायन , डी. राजा, संजय सिंह, सुखेंदु शेखर राय, टी.के. रंगराजन, टी.जी. वेंकटेश यासारख्या अनेक आदरणीय सदस्यांनी विचार प्रकट केले. रोजगार असेल, भ्रष्टाचार असेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न असेल, परराष्ट्र धोरण असेल, सुरक्षा व्यवस्था असेल, आयुष्मान भारत असेल, अशा अनेक विषयांवर सर्वानी आपले विचार मांडले आहेत. गुलाम नबीजी यांचे भाषण तर मी इथे बसून ऐकले होते, इतरांचे मी खोलीत ऐकले आणि म्हणूनच त्यांची देहबोली पाहण्याची संधी मिळाली होती. जेव्हा ते वंशवादावर चर्चा करत होते, एका कुटुंबाला वाचवण्यासाठी खूप काही बोलत होते, जे सांगत होते ते ठीक आहे, मात्र त्यावेळी त्यांचा निरागसपणा खूप छान वाटत होता. बहुतांश मी पाहिले , आता आनंद शर्मा यांचेही ऐकत होतो. तर गुलाम नबी पासून आनंद शर्मा पर्यंत सर्व तर आपल्या जुन्या सरकारबद्दलच बोलण्याची संधी घेत होते. बाहेर तर कुणी ऐकत नाही, त्यामुळे इथे सांगावेच लागेल. असो, काँग्रेस पार्टी किंवा या राजकीय पक्षाने काय करायला हवे ते सांगायचा अधिकार मला नाही. मात्र तुम्ही आयुषमान भारत योजनेबाबत चर्चा केली आणि तुम्ही अमेरिकेचे अन ब्रिटनचे उदाहरण दिले. आता अमेरिकेचे मॉडेल आणि ब्रिटनचे मॉडेल आणि भारताची सामाजिक स्थिती दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. एखादी गोष्ट तिथे यशस्वी झाली, आपल्याकडे यशस्वी नाही होऊ शकत, काही गोष्टी तिथे अयशस्वी झाल्या ,आपल्याकडे निष्फळ ठरू शकतात. असा तर्क बरोबर नाही. आपण आपल्या दृष्टीने विचार करायला हवा. आपल्या देशाचा करायला हवा, मात्र हे यामुळे होते कारण जवळपास 50-55 वर्षे सत्तेत राहणे आणि वास्तवापासून अनभिज्ञ राहणे खूप स्वाभाविक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे विचार आणि मर्यादा येणे देखील खूप स्वाभाविक आहे. मात्र मला नाही वाटत यापैकी कुणी या गोष्टीवर असहमत असेल की आपल्या देशात आरोग्य क्षेत्रात खूप काही करण्याची आवश्यकता आहे. आणि खूप काही करण्याची आवश्यकता आहे याचा अर्थ असा नाही कि गुलाम नबी जेव्हा आरोग्यमंत्री होते, तेव्हा काही केले नाही. काही तरी केलेच असेल. मात्र खूप काही करण्याची आवश्यकता आहे हे नाकारू तर शकत नाहीत ना. आणि म्हणूनच, आम्हाला चर्चेतून हे देखील समजले कि देशाच्या आशा-आकांक्षांनुसार आपण काही गोष्टी कशा करू शकतो. आता हे ठीक आहे कि आम्ही आयुषमान योजना घेऊन आलो आहोत. यात त्रुटी असू शकतात. मात्र शेवटी ही योजना देशासाठी आहे. कुठल्या पक्षासाठी नाही त्यामुळे मला वाटते की काँग्रेसच्या मित्रांनीही एक कृती दल तयार करावे, अन्य दलाच्या लोकांनीही आपले कृती दल बनवावे , आयुषमान भारत योजनेचा अभ्यास करावा आणि त्यात काही त्रुटी असतील तर मी नक्की वेळ देईन. मी स्वतः वेळ देईन. अंतिम उद्देश काय आहे? अंतिम उद्देश हा आहे कि देशात गरीब आणि निम्न मध्यम वर्गाचे कुटुंब , जर आजार त्याच्या घरात झाला , जे काही त्याने केले आहे सगळे शून्यावर येऊन थांबेल. उणे होईल. कधी सावकारांकडून व्याजावर पैसे घेऊन उपचार करावे लागतात. कधी तो विचार करतो कि मुलांना कर्जात बुडवायचे नाही , आजार होऊ दे, आयुष्य कमी झाले तरी चालेल. ही मानसिक स्थिती बनली आहे. आणि कुणी केले, कुणी नाही केले , 7० वर्षे का नाही झाले हे सर्व प्रश्न उपथित होऊ शकतात. मात्र तो माझ्या चर्चेचा विषय नाही. आपण असे काही करायला हवे कि नको? सरकार जो विचार करत आहे, तुमच्यासारखी आमची विचारसरणी नाही कि ईश्वराने सगळे काही आपल्याला दिले आहे. आम्ही मानतो की या सभागृहात आपल्यापेक्षाही विद्वान आणि अनुभवी लोक आहेत. त्यांची विद्वत्ता आणि त्यांचा अनुभव एवढंच नाही तर बाहेरही देशात खूप विद्वत्ता आणि अनुभवी लोक आहेत. आपण सर्वानी एकत्र बसून या आयुषमान भारत योजनेत देशातील ४०-५० कोटी लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक विश्वास निर्माण करू शकतो का? म्हणूनच अर्थसंकल्पातील तरतुदी वगैरेंच्या चर्चा करून अडकून राहण्याची आवश्यकता नाही. ते पैलू आपल्याला चांगलेच परिचित आहेत. मात्र देशातील गरीबाला याचा लाभ मिळायला हवा. आणि मला नाही वाटत की यात कुणाची हरकत असेल? योजना लागू झाल्यानंतर काही त्रुटी आल्या असतील आणि लक्ष गेले नसेल, टीका केली ठीक आहे. आता सूचनेच्या कालावधीबाबत एका योजनेचा प्राथमिक विचार सादर झाला आहे. आपण सर्वानी मिळून तो अधिक चांगला कसा करता येईल आणि म्हणूनच मला वाटते की चांगल्या सूचना यायला हव्यात. जे लोक आज माझे भाषण जर टीव्हीवर ऐकत असतील, त्यांनाही मी आवाहन करतो कि यात एखादी चांगली सुयोग्य सूचना तुम्ही देऊ शकत असाल तर द्या. देशातील गरीबांसाठी करायचे आहे .यात काही पक्ष वगैरे नसतो. मला वाटते की, आपण सर्वानी मिळून ही गोष्ट पुढे नेऊ या.
ही गोष्ट खरी आहे की मी इथे बसून इंग्रजीत 9 लिहिले तर मला नाही वाटत इथली कुणीही व्यक्ती नाकारेल कि ते 9 आहेत. मात्र तिथे बसलेल्यांना 6 दिसतील. मी इंग्रजीत इथे 9 लिहिले, माझी चूक नाही. मात्र जर तुम्हाला 6 दिसत असतील तर मी काय करू? कारण तुम्ही तिथे बसले आहात. आणि म्हणूनच मला वाटते की आता मला कुणी सांगा जर भारताच्या व्यवसाय सुलभता मानांकनात सुधारणा झाली आहे तर आपल्याला दुःख का व्हायला हवे? या देशातील प्रत्येक नागरिकासाठी ही अभिमानाची बाब नाही का? जगात आपली एक प्रतिमा तयार झाली. देशासाठी एक चांगली गोष्ट आहे. आता आम्ही केले, तुम्ही केले, हा मुद्दा आपण निवडणुका लढवू तेव्हा खेळू. मात्र जेव्हा देशाबाबत बोलले जात आहे तर चांगले आहे. कुणी इथपर्यंत जातात की एखाद्या मानांकन संस्थेने सांगितले, तर आता आमच्यावर हल्लाबोल करणे शक्य होत नाही, मग त्या मानांकन संस्थेवर टीका करत राहतात. बहुधा जगात अन्यत्र कुठे असे काही होत नसेल. कधी कधी तर मला वाटते तुम्ही भारतीय जनता पार्टीवर टीका करायला हवी. भरपूर टीका करायला हवी. तुमचा अधिकार आहे. मोदींवर देखील टीका करायला हवी. भरपूर करायला हवी. केस उपटायला हवेत. लोकशाहीत तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. मात्र भाजपावर टीका करता करता तुम्ही विसरून जाता. भारतावर टीका करायला लागता, घसरता तुम्ही. तुम्ही मोदींवर हल्ला करता करता भारतावर हल्ला करता. भाजपावर आणि मोदींवर करता, ठीक आहे, राजकारणात तुम्हाला अधिकार आहे आणि करायलाही हवा. मात्र यामुळे मर्यादा ओलांडता . आणि त्यामुळे देशाचे खूप नुकसान होते. तुम्ही कधीही स्वीकारणार नाही कि इथे आमच्यासारखे लोक बसले आहेत. कसे स्वीकाराल. कधीही स्वीकारणार नाही. तुमचे दुःख आम्ही समजू शकतो. मात्र मेहेरबानी करून देशाचे नुकसान होईल असे काही करू नका. देशाची जगात एक प्रतिमा आहे, आता इथे एक विषय आला, आता राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात नवीन भारताची कल्पना मांडली आहे. स्वामी विवेकानंद यांनीही नव्या भारताची चर्चा केली होती. महात्मा गांधी देखील तरुण भारताबाबत बोलायचे. आपले माजी राष्ट्र्पती देखील या पदावर होते तेव्हा त्यांनीही नवीन भारताची संकल्पना मांडली होती. त्यामुळे मला समजत नाही काय समस्या आहे. आपल्याला नवीन भारत नको आहे. आपल्याला तर आपला तो भारत हवा आहे, आपल्याला जुना भारत हवा आहे. मला वाटते कि आपल्याला गांधीवाला भारत हवा आहे. मलाही गांधीवाला भारत हवा आहे. कारण गांधी म्हणाले होते कि स्वातंत्र्य मिळाले आहे, आता काँग्रेसची काही आवश्यकता नाही. काँग्रेस संपवायला हवी. काँग्रेसमुक्त भारत हा मोदींचा विचार नाही, गांधींचा आहे. आम्ही तर त्यांच्या पाऊलांवर पाऊल टाकत चालायचा प्रयत्न करत आहोत. आता तुम्हाला तो भारत हवा आहे. लष्कराच्या जीप घोटाळ्याचा भारत, पाणबुडी घोटाळेवाला भारत, बोफोर्स घोटाळेवाला भारत, हेलिकॉप्टर घोटाळेवाला भारत. तुम्हाला नवीन भारत नको आहे. तुम्हाला तो भारत हवा आहे. तुम्हाला तो आणिबाणीवाला, आपात्काल, देशाला तुरुंग बनवणारा भारत हवा आहे. जयप्रकाश नारायण, मोरारजी भाई देसाई यांच्यासारख्या लोकांना तुरुंगात बंद करणारा, देशातील लाखो लोकांना तुरुंगात डांबणारा, आणीबाणीवाला भारत हवा आहे. असा भारत हवा आहे तुम्हाला. लोकशाही अधिकार हिरावून घेणारा, देशातील वृत्तपत्रांना टाळे लावणारा, असा भारत तुम्हाला हवा आहे. तुम्हाला… तुम्हाला कोणता भारत हवा आहे , तो भारत मोठा वृक्ष पडल्यानंतर… हजारो निर्दोष शिखांची खुले आम हत्या होते. तुम्हाला… तुम्हाला नवीन भारत नकोय. तुम्हाला भारत हवा आहे. तो भारत… जो तंदूर कांड आहे आणि राजकीय नेत्यांसमोर प्रशासन गुडघे टेकतो. तो भारत हवा आहे. लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला गुन्हेगाराला विमानात बसवून… विमानात बसवून त्याला देशाबाहेर नेले जाते. तो भारत तुम्हाला हवा आहे. दावोस मध्ये… दावोसला तुम्ही देखील गेला होतात, दावोसला आम्ही देखील गेलो होतो. मात्र तुम्ही… तुम्ही कुणाची तरी चिट्ठी घेऊन कुणाला तरी पाठवता, तुम्हाला तो भारत हवा आहे. म्हणून तुम्हाला नवीन भारत नको आहे.
इथे जनधन योजनेचा राष्ट्रपतींनी उल्लेख केला आहे. आणि तुम्ही जनधनवर देखील टीका केली आहे. मला वाटते किमान वास्तव आपण स्वीकारायला हवे. राजकीय जे बोलायचे असेल ते बोलत रहा. आम्ही ज्या 31 कोटी जनधन खात्यांबाबत बोलत आहोत, ते सर्वच्या सर्व 2014 मध्ये आमचे सरकार बनल्यानंतर उघडली आहेत… आणि तो विक्रम कुणीही बदलू शकत नाही. ही नोंद उपलब्ध आहे म्हणून मला वाटते कि तुम्ही सत्य जरा तपासून पाहिले तर बरे होईल. तुम्ही असेही म्हणालात की आम्ही नेम चेंजर आहोत गेम चेंजर नाही.
आमची कामे पाहून खरे बोलायचे असेल तर तुम्ही म्हणाल कि आम्ही तर एम चेंजर आहोत. आम्ही लक्ष्याचा पाठलाग करणारे लोक आहोत आणि लक्ष्य साध्य करूनच राहू. म्हणूनच आम्ही जे लक्ष्य ठरवतो, निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार करतो, संसाधन तयार ठेवतो, कठोर परिश्रम करतो. जेणेकरून देशाला संकटांपासून मुक्ती देण्याच्या दिशेने आम्हालाही काही योगदान देता येईल. आणि म्हणूनच काँग्रेसचे हे आसुसणे खूप स्वाभाविक आहे… आमचा जयजयकार करा, आम्हाला पुन्हा पुन्हा आठवत रहा , प्रत्येक ठिकाणी आमची आठवण ठेवा अशी तुमची इच्छा असणे खूप स्वाभाविक आहे. आणि हे ऐकता ऐकता तूम्हाला सवय लागली आहे कि याशिवाय अन्य कोणतीही गोष्ट तुम्हाला पटतच नाही.
मला आनंद होईल आणि तुम्ही नोंदी तपासून पहा कि १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर तुमचे जेवढे पंतप्रधान झाले , काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान जे देशाचे पंतप्रधान बनले, त्यांच्या भाषणात कुठल्याही अन्य सरकारचा, अन्य कुठल्या राज्य सरकारचा, देशाच्या भल्यासाठी कुठले काम झाले असेल तर त्याचा उल्लेख केला असेल. मीच आहे जो लाल किल्ल्यावरून सांगतो की देश आज जिथे पोहचला आहे आतापर्यंतच्या सर्व सरकारांचे योगदान आहे, सर्व राज्य सरकारांचे योगदान आहे. आणि यात संकोच वाटायला नको. आम्ही या गोष्टीसाठी आतुरलेले नाही कि तुम्ही अटलजींचे नाव घ्यावे , आम्ही आतुरलेला नाही. तुम्ही नाईलाजाने म्हणालात तर ठीक आहे, तुम्हाला जे ठीक वाटेल तुम्ही नाव द्या. आणि तुम्ही हे देखील सांगितले २०१४ पूर्वी जे काही घडले सगळे तुमच्या खात्यात गेले. श्रेय घेण्याची खूप इच्छा होत आहे. आणि तुमचे नियम देखील भन्नाट आहेत. जेव्हा मी लहान होतो, गावात क्रिकेट खेळणाऱ्यांकडे पाहत होतो, लहान-लहान मुले खेळायची, नंतर पाहिले तर शेवटी भांडण व्हायचे. मला खूप आश्चर्य वाटायचे कि आता तर खेळत होते, आता भांडत आहेत. तर पुन्हा पाहिले.. त्यांचा एक नियम असायचा ज्याच्या हातात बॅट असेल तो फलंदाजी करायचा आणि जेव्हा तो बाद व्हायचा , म्हणायचा मी आता जातो. तुम्ही लोक देखील तसेच आहात , बॅटिंग तुम्हालाच मिळणार का? आणि आता बॅटिंग मिळाली नाही तर खेळ संपला, आम्ही जातो, असे नसते.
आता आधारचा विषय येतो, तेव्हा तुम्ही म्हणता कि काम आमचे आणि तुम्ही श्रेय लाटता. चांगले आहे जर तुम्ही असे म्हणत असाल तर , मात्र तुम्ही हे लक्षात ठेवायला हवे. ७ जुलै १९९८ रोजी याच सभागृहात आणि सभागृहाचे आताचे अध्यक्ष त्यावेळी इथे सदस्य होते. ७ जुलै १९९८ रोजी त्यांनी एक प्रश्न विचारला होता एक सदस्य या नात्याने, आणि तेव्हाचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणीजी यांनी उत्तर दिले होते याच सभागृहात आणि त्या उत्तरात ते म्हणाले होते पारपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, शिधापत्रिका देण्यासाठी तसेच आरोग्य सेवा, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश, सार्वजनिक-खासगी क्षेत्रात नोकरी, आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा तसेच जमिनीच्या नोंदी आणि शहरी मालमत्ता धारकांसाठी बहुउद्देशीय राष्ट्रीय ओळखपत्राचा वापर करता येईल. आधारचे बीज इथे आहे.
वीस वर्षांपूर्वी…
माननीय अध्यक्ष महोदय, तुम्हाला विनंती आहे की रेणुकाजींना काही करू नका, रामायण मालिकेनंतर असे हसणे ऐकण्याचे सौभाग्य आज लाभले आहे.
वीस वर्षांपूर्वी, ही दूरदृष्टी अटलबिहारी वाजपेयी यांची होती. मात्र काँग्रेस म्हणते आधार त्यांनी सुरु केले, तरीही आम्हाला तुम्हाला श्रेय देण्यात अडचण नाही. आधार तुमचे.
आम्ही पक्षाच्या आधी देश ठेवला आहे. आणि आमच्या निर्णयाचा आधार देशाचे हित असते. आज श्रेय लाटण्यासाठी तुम्ही उतावीळ आहात, खूप स्वाभाविक आहे. एसआयटी स्थापन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते. तुम्ही तीन वर्षे त्यावर निर्णय घेतला नाही, हे श्रेय तुम्हालाच जायला हवे. आम्ही पहिली एसआयटी स्थापन केली , मात्र तुम्ही म्हणू शकता की आमच्यासमोर हा विषय आला होता.
काळ्या पैशाविरोधात कारवाई करण्याचे श्रेय देखील काँग्रेसने घ्यावे. काँग्रेसने 28 वर्षे बेनामी संपत्ती कायदा लागू केला नाही. त्याचेही श्रेय तुम्हीच घ्या. आतापर्यंत 3500 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती – तुम्हाला माहित असायला हवे , आनंदजी तुम्ही कितेक वर्षे इथे बसलेले आहात मान्य, आणि तुमची बोलण्याची एक खास शैली देखील आहे. तुम्ही तर बर्फावर सूरी बनवून अडकवू शकता कळणारही नाही. मात्र हा बेनामी संपत्ती कायदा 28 वर्षांपूर्वी पारित झाला होता, दोन्ही सदनांमध्ये पारित झाला होता. मात्र त्याचे नियम बनवले गेले नाहीत, अधिसूचित केले नाही त्यामुळे तो अडकलेला होता. कुणी रोखले, हा कुणी विरोधी पक्ष जबाबदार नव्हता , माहितीसाठी सांगतो. मला बरे वाटले तुमच्यासारख्या विद्वानांना देखील काही आज सांगायला मिळाले.
आतापर्यंत 3500 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आता तुमच्या काळात एवढी बेनामी संपत्ती तयार झाली तर त्याचे श्रेय तर मिळायला हवे.. तुम्हालाच हे सारे श्रेय आहे. सगळे जग बदलले आहे, दिवाळखोरी संहिता, नादारी संहिता, मला नाही वाटत हे ज्ञान तुम्हाला होते. मात्र तुम्हाला श्रेय जायला हवे कि खूप लोकांचा लाभार्थ होता, तुम्ही हे बनवले नाही. श्रेय तुम्हाला जायला हवे. देशाच्या औद्योगिक क्षेत्राला , जागतिक समुदायाला भारताप्रति विश्वास वाटायला हवा, भारताचे नियम आणि कायद्यांप्रति विश्वास वाटायला हवा, असे निर्णय आम्ही घेतले. समान पद, समान वेतन चार दशके देशाच्या डोळ्यात धूळ फेकत राहिलात आणि 5०० कोटीचा अर्थसंकल्प देऊन निवडणुकीला सामोरे गेलात. वातावरण निर्माण झाले होते, काय करणार. आणि जेव्हा आम्ही आलो, आम्ही पाहिले कि कुठल्याही गोष्टीची नोंद नव्हती, बारकाईने अभ्यासही केला गेला नव्हता आणि जेव्हा आम्ही लागू केला, 11 हजार कोटी रुपयांची गरज होती, 11 हजार कोटी रुपये. तुम्ही 5०० कोटी कसे दिले असते, तर आता हे सारे श्रेय तुमचे झाले. जीएसटीसाठी मध्यरात्री समारंभ झाला . काँग्रेसने त्यावर बहिष्कार टाकला. सर्व पक्ष आले. आणि तुम्हाला वाटले कि आम्हाला हे श्रेय मिळेल. तुम्ही माना किंवा मानू नका, हे तुम्ही जे काही करत आहात जीएसटीच्या बाबतीत , याची जितकी नकारात्मकता आहे, ती तुमच्या खात्यात जमा होत आहे, होत राहील आणि देशाच्या डोक्यात पक्के होईल. तुम्ही फक्त कुणी श्रेय घेऊ नये याचीच फक्त चिंता करा.
जेव्हा नीम-कोटींगचा विषय आला, तुमच्याकडून सांगण्यात आले आम्ही निम कोटींग पद्धत चालू केली. हे बघा तुम्ही एखादी गोष्ट अर्धवट सुरु करून सोडून देता. तुम्ही त्यावर निर्बंध लावता यापेक्षा पुढे जायचे नाही. तेव्हा त्या योजनेचा लाभ होण्यापेक्षा नुकसानच अधिक होते. शेवटी नीम कोटिंगच्या मागे दोन विषय होते, जे तुम्हाला देखील माहित होते. एक युरियाची ताकद वाढते. त्यामुळे शेतकऱ्याचे युरिया कमी असले तरी काम भागते.
दुसरे, दर्जात्मक बदल होतो आणि उत्पादनात वाढ होते. ही सर्वमान्य बाब होती. आणि दुसरे असे की, युरिया शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याऐवजी कारखान्यांत जायचा बिल शेतकऱ्याच्या नावे यायचे. अनुदान शेतकऱ्याच्या नावाने कापले जायचे. आणि जायचे कारखान्यांमध्ये. आता 100 टक्के नीम कोटिंग असते. त्यामुळे हे कुठल्याही कारखान्यात वापरता येणार नाही. तुम्हालाही माहित होते. 35 टक्के केल्यानंतर 65 टक्क्यांचा दरवाजा कुणासाठी उघडा ठेवलात. याचे श्रेय मी कुणाला देऊ?
म्हणूनच आम्ही 1०० टक्कयांच्या मागे लागलो आहोत. एवढेच नाही, जे युरिया आयात केले जाते त्याचेही येण्यापूर्वी नीम कोटिंग केले जाते. हे सांगायचे अशासाठी कि हा त्याचाच परिणाम आहे की आज युरियाची टंचाई भासत नाही, नाहीतर मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, मला दरवर्षी दोन-तीन पत्रे युरियासाठी पंतप्रधानांना लिहावी लागत होती. मी इथे आलो, तेव्हा सुरुवातीला सर्व मुख्यमंत्र्यांकडून युरियासाठी पत्रे यायची. आणि आज एकही पत्र येत नाही. ना कुठे लाठीमार होते. लोकांना युरिया मिळत आहे. काही गोष्टी बदलता येऊ शकतात. मला हे सांगायला आवडेल कि कधी कधी राजकारण इतके वरचढ ठरते ही गोष्ट खरी आहे कि पुन्हा-पुन्हा निवडणुका, आणि त्याचाच परिणाम आहे कि योजना पूर्ण तयार असेल किंवा नसेल, आपण कोनशिला ठेवून मोकळे होतो. फिती कापतो. फळ्या बसवतो. आणि त्याचा परिणाम काय झाला. आता पहा, आम्हाला रेल्वेच्या अर्थसंकल्पात घोषणा बंद कराव्या लागल्या, आता तर रेल्वेचा अर्थसंकल्प मंजूर झाला. मात्र का, जेव्हा मी पाहिले कि जुन्या सरकारांनी १५०० पेक्षा अधिक अशा रेल्वेच्या योजना जाहीर केल्या होत्या, ज्याकडे नंतर पाहणारे देखील कुणी नाही. अशाच, झाल्या जाहीर. काही दिवस सभागृहात टाळ्या पडल्या. कुठल्यातरी वृत्तपत्रात छापून आले. त्या खासदाराने घरी जाऊन हार घातले , झाले संपले. या संस्कृतीमुळे देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल , मी एका प्रगती तंत्रज्ञानाचा वापर करून पुढाकार घेतला. मी स्वतः सर्व रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घ्यायला लागलो. सर्व राज्यांचे मुख्य सचिव असतात ऑनलाईन, भारत सरकारचे सर्व सचिव असतात मी ऑनलाईन सर्वांसमोर बसतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, असे-असे प्रकल्प समोर आले आहेत जे 3० वर्षांपूर्वी 4० वर्षांपूर्वी ठरवण्यात आले होते. भूमिपूजन झाले. त्यानंतर कागदावर त्याची एक रेघ देखील नाही. अशाप्रकारे मी एकेकाचा आढावा घ्यायला लागलो. सर्व विभागांना एकत्र आणायला लागलो, जुने सरकार होते, माझी कशी जबाबदारी असे केले नाही, शेवटी हा देश आहे, सलगता, सरकारे येतील जातील, तुम्ही बसाल, दुसरा बसेल, तिसरा बसेल, आपण कुणी त्यांना थांबवू तर शकत नाही. लोकशाही आहे, मात्र सरकारमध्ये ही भावना चालत नाही की हे तर जयराम रमेश यांच्या काळात झाले होते, टाळे मारा. असे होत नाही. आम्ही शोध घेतला, तुम्ही हैराण व्हाल- 9 लाख कोटी रुपयांहून अधिक प्रकल्प मी आतापर्यंत असे मार्गी लावले आहेत. सर्व मंत्रालयांना बसवले, जे काही असतील 3० वर्षे 4० वर्षे जुने आहेत. आता हेच प्रकल्प त्यावेळी झाले असते तर बहुधा काही हजार कोटींमध्ये झाले असते. मात्र आज 9 लाख 1० लाख कोटीचे प्रकल्प झाले. आणि म्हणूनच हे काम जे आम्ही करत आहोत. सरकार तुम्ही देखील चालवले आहे, आम्हीही चालवत आहोत. आणि जो कुणी सरकारमध्ये बसतो, त्याला चालवायचे असते. त्याची जबाबदारी असते. मात्र चांगल्या पद्धतीने चालवले असते आणि हे जे सगळीकडे दगड आहेत तुम्हा लोकांची नावे आहेत सर्व आहेत, बहुधा काही दगड लोकांनी चोरून नेले आहेत. मात्र श्रेय सगळे तुम्हाला जाते. योजना तुमच्या आहेत.
आता इथे आपले आझाद साहेब अन्न सुरक्षा विधेयकाबाबत बोलले आणि तारीखवार सांगितले. तुमच्यापैकी कुणीही विचारेल हो, तुम्ही ज्या तारखा दिल्या आहेत, आम्ही त्यानंतर आलो आहोत. एक वर्षांनंतर आलो आहोत. एका वर्षात तुम्ही का होऊ दिले नाही. आणि तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन विचारले कि सर्वोच्च न्यायालयाने विचारले आहे. तुम्हाला माहित असायला हवे कि केरळ जिथे तुमचे सरकार होते, त्याने स्वीकार केला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने दंडा मारला होता. मात्र आता तुम्ही ते देखील आमच्या माथी टाकत आहात. तुम्ही करायला हवे होते. आणि मला वाटते कि जो निर्णय आपण करू,तो पूर्ण करण्याच्या तयारीनेच करायला हवा.
आता खतांचे कारखाने उघडण्यासाठी, तर तुम्ही सांगत आहात, आमच्या काळी झाले, आमच्या काळी झाले, मात्र बंद देखील तुमच्या काळी झाले. हजारो लोक बेरोजगार देखील तुमच्याच काळात झाले, त्याचेही श्रेय घ्या. आणि म्हणूनच आज आम्ही ते जर लागू करत आहोत आणि धोरणात्मक बदल करून करत आहोत. आज बघा, आम्ही उत्तर प्रदेशात गोरखपूर, बिहारमध्ये बरौनी , झारखंडमध्ये सिंदरी , जे युरियाचे कारखाने जे बंद पडले होते, ते जलद गतीने पुढे नेण्यासाठी आम्ही काम करत आहोत. जगदीशपूर हल्दिया गॅस पाईपलाईन तिच्याबरोबर आम्ही ते जोडले. हा धोरणात्मक बदल केला जेणेकरून त्यांना गॅस मिळाला तर कारखाना चालवणे सोपे होईल. आणि हा तो भाग आहे देशाचा जिथे अशा प्रकारची व्यवस्था केली तर पूर्व भारताच्या विकासाची शक्यता वाढेल. आणि हे ते राज्य नाही जिथे भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकत आहे. देशासाठी गरजेचे आहे कि पूर्वेकडील राज्यांचा विकास व्हायला हवा. देशाचा समतोल विकास व्हायला हवा. या साध्या सरळ विकासाच्या थिअरीच्या आधारे आम्ही काम करत आहोत. आणि मला खात्री आहे कि तुम्ही या गोष्टींची प्रशंसा कराल.
आमचे माननीय सदस्य अमित शाह यांचे भाषण झाले. आणि मला बरे वाटले कि आझाद साहेबांनी त्यातून हे शोधून काढले कि तुम्ही इतके भाषण दिलेत, सरदार पटेलांचे नाव का नाही घेतले. मला बरे वाटले कि तुम्ही सरदार साहेबांचे स्मरण केलेत. अलिकडेच गुजरातमध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्या निवडणुकीत आमचे बाबू भाई बसले आहेत इथे, सरदार पटेल काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक साहित्यात सरदार साहेब होते. मला इतके छान वाटले कि चला खूप वर्षांनंतर हा देखील दिवस आला. मात्र आणखी मी विचार करत होतो कि ही परंपरा कायम रहावी मात्र गुजरातची निवडणूक संपली आणि इथे तुमच्या पक्षाचा कार्यक्रम होता. आताही जुनी छायाचित्रे पाहू शकता. पार्श्वभूमीला कुठेही सरदार साहेब नाहीत आणि त्यावेळी वृत्तपत्रांनी लिहिले की एक आठवड्यानंतर तुमच्या इथे कार्यक्रम होणार आहे आणि सरदार साहेब गायब आहेत.
सरदार साहेब यांचे नाव देणे याचा उल्लेख अध्यक्षजी यांनी केला नाही.त्याचा उपयोग करण्याचा आपण प्रयत्न केलात.सरदार साहेब आणि बाबासाहेब आंबेडकर यांना भारत रत्न कधी मिळाला, याचेही स्मरण असू दे.मध्ये इतका काळ का जावा लागला ? म्हणूनच आपण चर्चा करा, आरोप करा.राष्ट्रपतीजी यांच्या अभिभाषणाबाहेरचा हा मुद्दा होता तरीही आपण हा मुद्दा उपस्थित केलात, चांगली गोष्ट आहे.मात्र एखादा मुद्दा उपस्थित करताना चार बोटे आपल्याकडे असतात हे विसरू नका. आपणाला आश्चर्य वाटेल, आपल्या कार्यशैलीत इतक्या बारकाईने जाण्याचा स्वभाव नसेल कदाचित.
दीर्घ काळ मी मुख्यमंत्रीपदावर राहिलो हे माझे भाग्य आहे.आझाद साहेबही मुख्यमंत्री राहिले आहेत त्यांना माहित आहे की फार बारकाईने पाहायला लागते. शरदजी ही प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यांनाही माहित आहे.मुख्यमंत्री इकडे-तिकडे नाही होऊ शकत.त्यांना सर्व तपशीलवार द्या.आपण सर्व जे मुख्यमंत्री राहिलो आहोत त्यांना माहित आहे. मात्र इथे मुख्यमंत्री फार कमी येतात.आले तर छोटे खाते घेतात. माझ्याकडे मोठे काम आले आहे.म्हणूनच ती सवय माझ्या उपयोगाला आली आहे. आपल्या देशात गेल्या वर्षी जे सिंचन प्रकल्प झाले, धरणे बनली,मात्र हे पाणी कशासाठी आहे?शेतीसाठी आहे, आपण नेट वर्कच तयार केले नाही.40- 40, 50 -50 वर्षे, कोणी कल्पनाही करू शकत नाही की सहा मजली इमारत तयार केली आणि त्यासाठी जिने किंवा लिफ्टची सोयच केली नाही. अशी कामे झाली.मी त्यातली 99 निश्चित केली. हजारो करोड रुपयांच्या योजनेने काम सुरु केले. शेतकऱ्यांना पाणी मिळावे या दिशेने काम सुरु केले.50 योजना पूर्ण झाल्या आहेत तर बाकी योजना पूर्णत्वाच्या दिशेने सुरु आहेत.
प्रश्न असा आहे, आपण योजना बनवली-बनवली,चांगले काम केले- केले, मात्र विचार अपूर्ण, काम अपूर्ण आणि पैसे गेले, उपयोग नाही झाला.सर्वंकष, एकात्मिक दृष्टीकोन बाळगला असता तर चांगले झाले असते.आपल्या कालखंडात सुरु केलेली कामे जरी पूर्ण केली असती तरी देशाचे भले झाले असते.आपण केले नाही असे मी म्हणत नाही.मात्र काम कसे करायला हवे यात मोठी त्रुटी राहून गेली. ज्या- ज्या लोकांना चांगले काम करण्याची संधी मिळाली त्या सर्वांची ही जबाबदारी आहे.
आपण पहिले असेल आम्ही एक बदल घडवला,आपल्या देशात अर्थसंकल्पात तरतूद झाल्यावर मोठा आनंद मानला जातो.ही तरतूद झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट होतो.आराखडा पाहणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यातून काय आणि किती मिळाले हे पाहणाऱ्यांची संख्या तर त्याहून कमी आहे.आणि परिणाम, निष्पत्ती याबाबत तर चर्चाच होत नव्हती.आम्ही संपूर्ण कार्य संस्कृतीच अशी तयार केली. या सरकारचा आग्रह आहे आणि संसदेत आम्ही तो मांडतो की फल निष्पत्ती म्हणजेच ज्या कामासाठी निधी ठेवला त्या कामासाठी तो खर्च झाला की नाही.म्हणूनच फल निष्पत्तीवर भर देण्याचा आमचा प्रयत्न असायला हवा.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या विषयावर इथे चर्चा झाली.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात कोणाची हरकत असेल याचे मला आश्चर्य वाटते.कोणाची हरकत असू शकत नाही.यात कोणतेही राजकारण नाही,इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहे हे असे काम आहे जे आपण सर्वांनी केले पाहिजे. आता हे कसे होणार,जमिनीचे तुकडे वाढत जात आहेत.कुटुंबाचा आकार वाढला की 10 बिघा जमीन असेल तर ती मुलांच्यात वाटली जाते,2 बिघ, 1 बिघा झाली की अडचण येते.तर आम्हाला कृषी तंत्रज्ञाना कडे वळायला हवे.आम्हाला आधुनिकीकरण आणायला हवे. आपण हे केले तरच बदल घडेल.मृदा पत्रिका हा एक प्रयत्न आहे. प्रत्येक थेंबागणित अधिक पिक, सूक्ष्म सिंचन हा एक प्रयत्न आहे.आपल्या देशात एका काळात शेतकऱ्याची धारणा होती की भरपूर पाणी शेतात असल्याखेरीज ऊस पीक होणारच नाही.मात्र मी अनुभवाने सांगतो, मी गुजरातमध्ये होतो तेव्हा माझा नियम होता स्प्रिंक्लरच्या सहाय्याने ऊस शेती होते आणि साखरेचे प्रमाणही उंचावले आहे.आता हळू- हळू देशात पाण्याची बचत होईल.असे अनेक प्रयोग आहेत.यापूर्वी सगळ्यांना माहित आहे, जे केळी पिक घेत असता, त्यांना केळ्याचा घड काढल्यानंतर राहिलेल्या केळ्याच्या झाडाचा भाग काढून टाकण्यासाठी पैसे द्यावे लागत.एक एकरासाठी 5 हजार, 10 हजार,15हजार द्यावे लागत.
आपल्या कृषी विद्यापीठांनी त्या भागापासून धागा बनवला,वस्त्र आणि कपडे बनवले.उत्तम प्रतीचे कपडे तयार होत आहेत.एवढेच नव्हे तर त्या केळ्याच्या उरलेल्या झाडाचे तुकडे करून कोरड्या जमिनीवर पसरले तर 90 दिवस पाण्या विना तिथे झाडांची वाढ होत राहते. जे टाकाऊ होते ते आता संपत्तीत रुपांतर होत आहे आणि ते घेण्यासाठी लोक येत आहेत आणि त्याचे एकरी 10 हजार, 15 हजार देत आहेत.आपल्या देशात कृषी क्षेत्रातल्या टाकाऊ वर भर दिला तरी शेतकऱ्याला उत्पन्नात मदत होऊ शकते.आपल्या देशात साखरेचे जास्त उत्पादन झाले तरी शेतकरी अडचणीत येतो,आणि कमी उत्पादन झाले तरी अडचणीत येतो.शेतकऱ्याकडून चालवले जाणारे कारखाने आहेत.आम्ही इथेनॉल 10 टक्के केले. ज्या वेळी साखर बाजारपेठेवर जागतिक परिणाम होईल तेव्हा इथेनॉल कडे वळता येईल,शेतकऱ्याच्या सुरक्षिततेची शक्यता वाढेल.
शेतापासून बाजारपेठे पर्यंतच्या साखळीत अनेक त्रुटी आहेत त्यामुळे आपले लाखो-करोडो रुपयांचे नुकसान होत आहे हे आम्ही जाणतो.पायाभूत सुविधात काही त्रुटी आहेत.बियाण्यापासून ते बाजारपेठेपर्यंत आपला सर्वंकष दृष्टीकोन असेल तर प्रयत्न होईल आणि आम्ही त्या दिशेने काम करत आहोत. ई नाम योजना असो,ही योजना आता सुरु झाली आहे.काही राज्यांनी आपल्या ए पी एम सी कायद्यात बदल करायला हवेत ते बदल अद्याप केले नाहीत.मात्र शेतकऱ्यांनी सुमारे 36 हजार कोटी रुपयांची उलाढाल ई नाम मधून ऑनलाइन विक्री द्वारे केली आहे.36 हजार कोटी रुपये ही एक उत्तम सुरवात आहे.माझा विश्वास आहे ही उलाढाल आणखी पुढे जाईल.
आपल्याला मुल्यवर्धनाकडे वळावे लागेल.शेतकऱ्याने हिरवी मिरची पॅकिंग विकली तर खूप कमी पैसे मिळतात पण लाल मिरची असेल तर त्याची पूड करता येते प्क्याकिंग झाल्यानंतर चांगला ब्रांड असेल तर शेतकऱ्याचे उत्पन्न वाढते.आपल्याला मुल्य वर्धनाकडे जावे लागेल.
शेतीशी सबंधित काम,शेतात सौर उर्जा वापरली तर शेतकऱ्याचे उत्पन्न वाढू शकते.सौर पंप वीजही उत्पन्न करू शकतो,डिझेलचा खर्चही कमी करू शकतो.विजेचा खर्च कमी करू शकतो.ती वीज राज्य सरकार खरेदी करू शकतात. अशा रीतीने त्याचा खर्च कमी होऊ शकतो आणि बचत साध्य होऊ शकते.
आज आम्ही बांबू विषयी निर्णय घेतला.तुमचा दोष नाही. 90 वर्षांपासून कायदा बनवला आहे की बांबू हा वृक्ष वर्गात आहे आणि बांबू कापता येऊ शकत नाही.संपूर्ण जगात बांबूची गणना गवत या वर्गात केली जाते. हे आपण केले असते तर त्याचे श्रेय आपल्याला गेले असते. आम्ही विचार केला,आणि पाऊले उचलली आणि बांबूची गणना गवत या वर्गात केली. आज शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर बांबूची शेती करू शकतो. बांबूच्या शेतीने त्याच्या पिकाचे कोणतेही नुकसान होत नाही. आज हिंदुस्तानातून हजारो करोडो रुपयांचा बांबू निर्यात करतो. आपण पतंगासाठी बांबू बाहेरून आणत होतो, अगरबत्तीसाठी बांबू बाहेरून आणत होतो. एक छोटासा निर्णय शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीची ताकद देऊन गेला.
मला आश्चर्य वाटते,मधमाशा पालन क्षेत्रात किती करता येऊ शकले असते, मात्र झाले नाही. मला आश्चर्य वाटते की का झाले नाही? आम्ही चार वर्षात 11 एकात्मिक मध माशा विकास केंद्रे उभी केली आणि मध उत्पादनात 38 टक्के वाढ झाली.हा मध आता जगभरातल्या बाजारात जाऊ लागला आहे.सर्वात मोठ्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायची गरज आहे,ती म्हणजे आज जग समग्र आरोग्य सुविधेच्या दिशेने वाटचाल करत आहे. पर्यावरण स्नेही जीवन शैली अंगीकारत आहे.त्यामुळे रासायनिक मेणाच्या ऐवजी आता मधमाशानी तयार केलेल्या मेणाची मागणी वाढत आहे.आमचे मधमाशा पालनाचे काम मोठ्या प्रमाणावर मधमाशा मेणासाठी उपयुक्त ठरू शकते ज्यामुळे आगामी काळात आपण मोठी जागतिक बाजारपेठ व्यापू शकतो. आपला शेतकरी एकाच छत्राखाली पशु पालन, मत्स्यपालन,कुकुटपालन यासारखे जोड धंदे शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचवू. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यात कोणती अडचण येईल असे मला वाटत नाही.शेतकऱ्यांना बळ मिळू शकते.प्रयत्न आपणा सर्वांना करायचे आहेत आणि आम्ही सर्व हे प्रयत्न नक्की करू.त्याला फळ नक्कीच मिळेल.त्या दिशेने आपले प्रयत्न राहिले पाहिजेत.
आज आपल्या देशात स्वच्छः भारत अभियानाची थट्टा उडवली जाते, मेक इन इंडिया अभियांनाची, जन धन योजना, आंतरराष्ट्रीय योग दिन,काळ्या पैशा विरोधात होणाऱ्या कारवाईची थट्टा केली जात आहे, सर्जिकल स्ट्राईक बाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तुम्ही मला सांगा इतर मागास वर्गीय आयोगाला संविधानाचा दर्जा मिळाला याचा कोण विरोध करू इच्छितो,कोणी याचे कारण सांगा, इतक्या वर्षाची मागणी होती.तुमची काही कारणे असतील, त्यामुळे नाही झाले.या समितीत घाला, त्या समितीत घाला,काम रेंगाळत पडले होते.आम्ही हे काम करू शकत नाही का ?
जेव्हा समोर विरोध करण्याची हिम्मत होत नाही, जनता जनार्दनाला तोंड देण्याची ताकद नसते, तेव्हा बहाणे सुचतात. आज इतर मागास वर्गीय समाजात ज्या आशा- आकांक्षा जागृत झाल्या आहेत, हा समाज जागृक झाला आहे, आपल्या हक्कासाठी मैदानात उतरला आहे.आपल्या राजनीतीत खुलेपणाने बोलण्याची हिम्मत नाही म्हणून बहाणा करत आहात. या देशाचा इतर मागास वर्ग हा देशाला देणाऱ्या पैकी आहे, आणि हा समाज आपला हक्क मागत असेल तर राजकारण बाजूला ठेवून नव्या- नव्या गोष्टी जोडण्याच्या नावाखाली त्यात अडथळा आणण्या ऐवजी ते संमत करा.
तिहेरी तलाक.. तिहेरी तलाक या विषयावर आपण ज्या प्रकारचा कायदा आणू इच्छित होतात, तर तुम्हाला कोणी अडवले होते, 30 वर्षापूर्वी हा विषय आपल्या हातात होता.आपल्याला जसा पाहिजे तसा कायदा करू शकत होतात. मात्र आपले राजकारण,आपल्याच मंत्र्याचे भाषण होते, तिहेरी तलाक पद्धती का नष्ट व्हायला हवी. मात्र चहूबाजूनी आवाज उठला,राजकारण धोक्यात आले, व्होट बँक धोक्यात आली आणि अचानक त्या मंत्र्यालाही जावे लागले आणि हे अभियानही थांबले.आता जी कारणे दिली जात आहेत. हिंदुस्तानमधल्या प्रत्येक गुन्हेगाराला जिथे कायद्या अंतर्गत सजा आहे तिथे जे तर्कशास्त्र देत आहेत ते लागू होऊ शकते.एखाद्याने कोणाची हत्या केली, घरातला एकच मुलगा आहे,30 वर्षाचे वय आहे,त्याला तुरुंगात टाकण्याचा कायदा का केला,म्हातारे आई-वडील काय खातील. हिंदूने दोन लग्ने केली तर तो तुरुंगात जाईल त्याला सजा व्हावी.त्या वेळी हा विचार नाही आला की त्याच्या कुटुंबातले लोक काय खातील. आहे सजा? कोणीही याचा अभ्यास करेल तर त्याच्या लक्षात येईल आपण कशा गोष्टी करत आहोत.
नरेशजी खूप काही सांगत होते, भय, तुरुंगवास,15 वर्षे काय झेलले आहे,आम्हाला माहित असे म्हणत होते.मात्र कायद्याने आपले काम करायला हवे की नको?आपण इथे सांगत आहात की एखाद्या मुलाला सतावले जात आहे त्याला अडकवले जात आहे.अशा गोष्टी करून आपण कायद्याचा अपमान करत आहात की नाही. काय होईल ते कायदा निश्चित करेल.त्याचे उत्तर देऊन मला मदत करा.
कवी दुष्यंत कुमार यांची कविता आहे-
उनकी अपील है कि उन्हें हम मदद करें,
उनकी अपील है कि उन्हें हम मदद करें,
चाकू की पसलियों से गुंजारिश तो देखिए
महिलांवरचे अत्याचार हा कॉग्रेस, भाजपा किंवा एखाद्या पक्षाचा विषय आहे असे मी मानत नाही. असे असूच शकत नाही आणि आपण जी चिंता उपस्थित केलीत ती स्वाभाविक आहे.जी आझाद साहेब यांनी उपस्थित केली.म्हणूनच मी लाल किल्ल्यावरून सांगण्याची हिम्मत केली की मुलींना खूप काही बोलले जाते पण मुलगा संध्याकाळी घरी उशिरा का येतो असे कोणीतरी विचारा. कोणीतरी विचारा की मुलगा संध्याकाळी कुठे जातो,कोणाला भेटतो, मुलांवरही संस्कार करण्याची कोणीतरी चिंता करा. आपण सर्व जण एकमुखाने त्या मात्या-पित्यांना, शिक्षकांना, विचारू शकत नाही का, एखाद्या मुलीवर अत्याचार करणारा अखेर कोणाचा ना कोणाचा मुलगा आहे.या संबंधात आपण सर्व जण मिळून काम करू आणि माझी इच्छा आहे की या साऱ्या बाबी आम्ही उज्वला योजना, यातून महिला सशक्तीकरणाचे मोठे काम करण्याचा सदनाच्या माध्यमातून मी देशाच्या स्टार्ट अप वाल्यांना विशेष आग्रह करेन.
धूर विरहीत स्वच्छ स्वयंपाक हे आम्ही अभियान म्हणून राबवू इच्छितो. शक्य असेल तर सौर उर्जेवर आधारित नव्या अशा चुली असव्यात अशी कल्पकता असावी की गरिबाला अन्न शिजवण्यासाठी एक पैसाही खर्च करायला लागता कामा नये. ग्यास वाहतुकीचा खर्चही वाचेल. आपल्याच घरात सौर व्यवस्था असेल. आधुनिक शोधांनी अशा चुली तयार होऊ शकतात. स्वच्छ, धूर विरहीत वातावरणात स्वयंपाक हा आपल्या पर्यावरणासाठी, देशातल्या महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.हा काही राजकीय कार्यक्रम नाही. हे देश हिताचे कार्य आहे.आपण सर्वांनी मिळून हे अभियान पुढे न्यायचे आहे.
आता चर्चा झाली की स्वच्छ भारत अभियानांच्या जाहिरातीवर किती खर्च झाला.कोणाला वाईट वाटावे असा माझा उद्देश नाही मात्र आपण सरकारमध्ये राहिलेले आहात.सार्वजनिक जीवनात वावरलेले आहात.शौचालय हा विषय पायाभूत सुविधेशी जितका निगडीत आहे तेवढाच वर्तणुकीशी सबंधित विषय आहे.सवयीचा विषय आहे. जगभरात हा विषय अभ्यासणाऱ्या प्रत्येकाने हेच सांगितले आहे.आपण सरकारमध्ये होतात तेव्हा यावरच लक्ष केंद्रित केले होते की जोपर्यंत वर्तनात्मक बदल घडत नाही तोपर्यंत त्यात यश मिळणार नाही. या ज्या जाहिराती आहेत त्या सरकारी कार्यक्रमाचा झगमगाट नाही. वर्तणुकीशी सबंधित छोट्या छोट्या गोष्टी घेऊन लोकांना शिक्षित करण्याचे काम सुरु आहे. याच बरोबर याचा विसर पडू देऊ नका की, या गरीब माणसाच्या खिशातून आलेल्या पैशातून काही लोकांच्या जन्मदिनी वर्तमान पत्रात एक पानभर जाहिराती छापल्या जात असत. देशाचे किती पैसे हिशोब करा.एकाच परीवारातल्या लोकांच्या जन्मदिनी जाहिरातीवर किती रुपये खर्च केला असेल आपण आश्चर्य चकित व्हाल.आपलीही जिथे जिथे राज्य सरकारे आहेत त्यांना सांगा की वर्तणुकीत बदल घडवण्यासाठी निधीची तरतूद करा.लोकांना प्रशिक्षित करा.
आझाद साहेब यांनी बोफोर्स मुद्दा मोठ्या विस्ताराने सगुण श्रेय घ्यायचा प्रयत्न केला.मी एक विधान वाचू इच्छितो.काँग्रेसचे जेष्ठ मंत्री आणि त्यानंतर राष्ट्रपती आर वेंकटरमणजी यांच्या आत्मचरीत्र्याचा हा भाग आहे. आत्म चरित्रात त्यांनी म्हटले आहे,मी जेव्हा राष्ट्रपती होतो, आर वेंकट रमण यांनी लिहिले आहे,जे आर डी टाटा यांच्याशी त्यांची बातचीत झाली त्याचा सारांश त्यांनी पुस्तकात लिहिला आहे,त्यांनी लिहिले आहे,टाटा यांनी म्हटले की तोफा आणि संरक्षण व्यवहारात राजीव गांधी किंवा त्यांच्या कुटुंबाचा लाभ झाला असेल किवा नसेल मात्र काँग्रेस पक्षाला कमिशन मिळाले नाही हे नाकारणे कठीण आहे.1980 नंतर उद्योगपतीकडून देणग्या मागितल्या गेल्या नाहीत आणि पक्षाचा खर्च अशा व्यवहारातल्या कमिशनवर चालत आला असे त्यांना वाटते.
हे वेंकटरमण होते.आपले वरिष्ठ नेता आणि देशाचे राष्ट्रपती होते.इथे परीवारवादाची बाब आली की वाईट वाटते,रागही येणे स्वाभाविक आहे,स्वाभाविक आहे आपल्या राजकारणाला धक्का बसावा असे मलाही वाटत नाही.मात्र आपल्याच एका महाशयांनी सांगितले की सुलतानी गेली मात्र आम्ही अजूनही सुलताना सारखे वागत आहोत. जयरामजी यांच्या मोकळे पणाबद्दल त्यांचे अभिनंदन.
निम्न मध्यमवर्ग, मध्यमवर्ग घ्या, महागाईचा सर्वात मोठा प्रभाव मध्यम वर्गावर पडतो.या आधी महागाई कुठे पोहोचली होती आपण सर्व जण जाणताच.महागाई 2 ते 6 टक्के यामध्ये नियंत्रणात राखण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. महागाई वाढत राहिली तर निम्न मध्यम वर्ग,मध्यम वर्गाचे जीवन कसे कठीण होईल याची कल्पना आपण करू शकता.महागाईच्या या पावलांपासून मध्यम वर्गाला वाचवण्याचे काम आम्ही केले आहे.गरीब आणि मध्यम वर्ग कुटुंबीय आपले घर बांधू इच्छितात तर बँक व्याज दारात कपात करून अनुदान पुरवून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम या सरकारने केले आहे.
प्रधान मंत्री आवास योजना शहरी यामध्ये आम्ही नवी श्रेणी निर्माण केली आहे. घर तयार करण्यासाठी 9 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जात 4 टक्के सूट देण्यात आली आहे, मध्यमवर्गाचे स्वतःचे घर असावे ही आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे काम आहे. 12 लाख रुपयांपर्यंत घर असेल तर व्याजात 3 टक्के सवलत देण्याचे काम करण्यात आले आहे. अशाच प्रकारे गावात जुने घर आहे, कुटुंब वाढले आहे,तर घर वाढवायचे आहे,एक खोली, दोन खोल्या वाढवायच्या आहेत तर 2 लाख रुपयांपर्यंत कर्जात आम्ही 3 टक्के सवलत दिली आहे. या साऱ्या बाबी निम्न मध्यम वर्ग, मध्यम वर्ग त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी उपयोगात येणार आहेत.
अशाच प्रकारे रिअल इस्टेट रेग्युलेशन कायदा रेरा या कायद्याने मध्यम वर्गाला घर घेताना जी चिंता असायची ती दूर करून सुरक्षितता प्रदान केली आहे.आम्ही काही नियम केले आहेत त्याचा लाभ, ग्राहक संरक्षण कायदा आणि ग्राहक सबलीकरणाद्वारे सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला आहे.
लोकांना स्वस्त औषधे मिळावीत, यासाठी भारतीय जन औषधे आणि 800 पेक्षा जास्त औषधे अधिक स्वस्त दरात पुरवली जातात. लोक अनुभव घेत आहेत की त्यांचा खर्च 60-70 टक्क्यांनी कमी झाला आहे.गुडघा प्रतीरोपण शस्त्रक्रिया करायचा खर्च कमी केला,डायलिसीस ,आपल्या देशात किडनीची समस्या सामोरी येत आहे,मात्र डायलिसीस साठी जिल्हा मुख्यालय नाहीतर मोठ्या शहरात जावे लागत असे.आम्ही एक अभियान म्हणून काम केले. सुमारे 500 पेक्षा जास्त जिल्ह्यात माफक दरात डायलिसीस केले जाते.सुमारे 22 लाखाहून अधिक डायलिसीस सत्रे झाली आहेत अशी माहिती मला मिळाली आहे.मानवतेच्या दृष्टीकोनातून हे कार्य सुरु आहे.यामुळे आम्हाला बळ मिळाले आहे.
एल ई डी बल्ब मुळे काय लाभ झाला आहे हे आपण जाणता. मध्यम वर्गाचे हजारो करोड रुपये वाचत आहेत.सुमारे 15-15 हजार कोटी रुपये बचत झाली आहे.
राष्ट्र्पतीजींनी आपल्या भाषणात एक विषय सांगितला आहे आणि माझे मत आहे की कोणत्या सरकारचे काम नाही आणि न कोणत्या पक्षाचे काम आहे. ज्यांना देशाची चिंता आहे अशा सर्व लोकांचे काम आहे. या सदनात बसलेल्या प्रत्येकाचे काम आहे.सर्वांचे समान काम आहे.विषय राष्ट्र्पतीजीनी स्पष्ट केला आहे. प्रणवदा जेव्हा राष्ट्रपती होते तेव्हा त्यांनीही उल्लेख केला होता. आधीही काही जणांनी या विषयावर आपले विचार मांडले होते आणि हा विषय आहे लोक सभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा. लोक सभा आणि राज्य सभा दोन्ही निवडणुका करून आले आहेत त्यांना माहित आहे.काही लोक पराभूत झाल्यावर राज्य सभेत पोहोचतात त्यानाही अनुभव असेल की किती कठीण असते. मात्र विचार करायला हवा की एक निकोप परंपरा कारण भारताची लोकशाही प्रगल्भ झाली आहे.आपण सर्व हिमतीने निकोप परंपरेच्या दिशेने जाऊ शकतो का ? मी जे इच्छितो ते 1967 पर्यंत चालत आले होते.त्याला एक दोन अपवाद असतील.लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी झाल्या हे साधारणतः 1967 पर्यंत चालले.त्या वेळी कोणतीही समस्या आली नाही. मात्र त्यानंतर कोणत्या ना कोणत्या राजकीय कारणाने असंतुलन निर्माण झाले आणि आता आपण पाहतो की एक निवडणूक झाली तो पर्यंत दुसऱ्या निवडणुकीची तयारी केली जाते दुसऱ्या नंतर तिसऱ्या. केंद्र आणि राज्य सरकारवर त्याचा दबाव असतो.संघीय वातावरणाचा एक सुखद अनुभव असायला हवा. निवडणुकानंतर चार सहा महिने तू-तू मी-मी चालेल मात्र चार साडेचार वर्षे तर मिळून देशासाठी काम करू शकू.या दिशेने आपल्याला काम करायला हवे. या दिशेने व्यापक चर्चा व्हावी अशी माझी इच्छा आहे.आपली संपूर्ण शक्ती कामासाठी लावू. आपण पाहाल आता लोकसभा निवडणुका होतील तेव्हा चार राज्ये त्या बरोबर आहेत.आंध्र, तेलंगणा, अरुणाचल आणि ओडिशा.समस्या काय आहेत हे आपल्याला माहित आहे. 2009 मध्ये साधारणतः 1 हजार कोटी रुपये खर्च झाले होते, लोकसभा निवडणुकीसाठी.2014 मध्ये हा खर्च सुमारे 4 हजार कोटीवर पोहोचला.एक हजारावरून चार हजार.एवढेच नव्हे तर 2014 नंतर ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यासाठी जवळ पास 3 हजार कोटी रुपये खर्च झाला आहे.
आपण आता कल्पना करू शकतो की भारतासारख्या देशात जिथे गरीबांपर्यंत बरेच काही पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे.निवडणुकी दरम्यान 1 कोटी पेक्षा जास्त लोकांची 9 लाख 30 हजार पोलीस ठाण्यांवर ड्युटी लागते.निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करावी लागते, सुरक्षेची नवी-नवी आव्हाने समोर येत असतात.आणि आपली दले त्या कामात वाहून घेऊन काम करत असतात.हा पक्ष हित बाजूला ठेवून विचार करण्याचा विषय आहे.यामध्ये मतभेद असू शकतात,मात्र तर्कशुद्ध चर्चेची सुरवात तू-तू मी-मी अशी होऊ नये.प्रामाणिक पवित्रता बाळगून आपण चर्चा करूया.एकत्र येऊन मार्ग शोधू या.मला वाटते यात आपण यशस्वी ठरू. आपण असे अनेक निर्णय घेतले आहेत जे जगाला आश्चर्यकारक वाटले आहेत.इतके पक्ष आणि असा निर्णय होऊ शकतो.याच सदनात बसलेल्या लोकांनी भूतकाळात निर्णय घेतले आहेत. सर्व श्रेष्ठ निर्णय घेतले आहेत. भावी पिढ्यांच्या हितासाठी निर्णय घेतले आहेत.दोन्ही सदनात बसलेल्या मान्यवरांना पुन्हा एकदा असा निर्णय घेण्याचे भाग्य प्राप्त झाले आहे असे मला वाटते.
माननिय सभापतीजी, अनेक विषयांवर सर्व मान्यवरांनी मत व्यक्त केले आहे. राष्ट्रपतींचे अभिभाषण एक परिपूर्ण भाषण आहे.दिशा कोणती आहे, गती काय आहे, उद्दिष्ट काय आहे,सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी त्या दिशेने आम्ही कशी आगेकूच करत आहोत,त्याचा वेळेची मर्यादा पाळून शक्य तो सर्व लेखा- जोखा मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.आपण सर्वांनी सर्व संमतीने आदरणीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला मंजुरी द्यावी आणि आभारदर्शक ठराव संमत करावा, ही अपेक्षा बाळगून माझी संमती व्यक्त करतानाच आता इथे थांबतो.
खूप-खूप धन्यवाद.