QuoteIndia's self-confidence is at an all time high: PM Modi in Lok Sabha
QuoteIt is this Lok Sabha that has passed stringent laws against corruption and black money: PM
QuoteIt is this Lok Sabha that passed the GST: PM Modi

अध्यक्ष महोदयाजी, लोकसभेच्या सभापती म्हणून या सोळाव्या लोकसभेच्या पूर्ण कार्यकाळात तुम्ही ज्या धैर्याने, ज्या संतुलनाने आणि प्रत्येक क्षणी हसतमुख राहून या सभागृहाचे काम चालवलं,  त्याबद्दल मी सर्व सदस्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने तुमचे खूप खूप अभिनंदन करतो.

अहिल्यादेवींचे जीवन, त्यांचे शिक्षण याचा तुमच्या मनावर खूप मोठा प्रभाव आहे आणि त्यातून मिळालेल्या शिक्षणाचा, त्यातून मिळालेल्या आदर्शांचा इथे वापर करण्याचा तुम्ही नेहमीच प्रयत्न केला आहे. आणि याच आदर्शांनुसार चालताना कधी उजव्या बाजूच्या लोकांना तर कधी डाव्या बाजूच्या लोकांना तुम्ही त्याच तराजूत तोलून तुम्ही काही कठोर निर्णय देखील घेतले आहेत. मात्र ते या मूल्यांच्या आधारे घेतलेले आहेत, आदर्शांच्या आधारे घेतलेले आहेत आणि लोकसभेच्या कामकाजाचा उत्तम नमुना तयार करण्यासाठी ते नेहमीच उपयुक्त ठरतील असा मला विश्वास आहे.

तुम्ही ज्या स्त्री संघटनेची सुरुवात केली आहे, मला वाटतं नवीन सदस्यांसाठी अतिशय उपयुक्त काम तुम्ही केले आहे. त्यामध्ये वादविवाद, त्यातील आशय,  माहिती आणखी समृद्ध करण्यात तुम्ही फार मोठी भूमिका पार पाडली आहे.

अध्यक्ष महोदय,  2014 मध्ये मी देखील त्या खासदारांपैकी  एक होतो जे पहिल्यांदाच या सभागृहात आले होते. मला इथला भूगोल देखील माहित नव्हता, इथून कुठल्या गल्लीतून कुठे जायचं ते देखील माहीत नव्हतं, एकदम नवीन होतो. प्रत्येक गोष्टीकडे अतिशय कुतूहलाने पाहत होतो, हे काय आहे, इथे  काय आहे असं सगळं पाहत होतो. मात्र जेव्हा मी इथे बसलो तेव्हा मी असंच पाहत होतो , हे बटण कशाचे आहे, काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा मला इथे एक पाटी दिसली , त्या पाटीवर मला केवळ तीनच पंतप्रधानांची नावे आढळली. माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आधी तेरा पंतप्रधानांनी हे पद भूषवलं होतं आणि आपली जबाबदारी पार पाडली होती.  असं काय झालं असेल, काय असेल यामागे,  जे मुक्त विचाराचे अतिशय विद्वान लोक रोज उपदेश देत असतात,  त्यांनी जरूर यावर विचार करावा आणि कधीकधी आम्हाला मार्गदर्शन करावे.

प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी  नवीन होती, कुतूहल होते आणि त्या वेळेपासून मी पाहतोय, सुमारे तीन दशकांनंतर एक पूर्ण बहुमतवाले  सरकार बनले आहे आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच काँग्रेसचा त्यात सहभाग नाही.  असं बहुमताचे पहिले सरकार अटलजींच्या नेतृत्वाखाली बनले होते. या 16 व्या लोकसभेत 17 अधिवेशने झाली, आठ अधिवेशने अशी होती, ज्यामध्ये 100% हून अधिक काम झालं. आपण जर  सरासरी पाहिली तर सुमारे 85 टक्के फलदायी कामासह आज आम्ही निरोप घेत आहोत.

संसदीय मंत्र्यांची स्वतःची एक जबाबदारी असते, जी आता तोमरजी सांभाळत आहेत. सुरुवातीला व्यंकय्याजी पाहत होते. अतिशय कौशल्याने त्यांनी ते पार पाडले  होते.  आता उपराष्ट्रपती म्हणून आणि आपल्या वरिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष म्हणून देखील ते महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत. अनंत कुमार यांची उणीव आपल्याला नक्कीच भासत आहे, एक हसतमुख व्यक्तिमत्त्व होते, मात्र या सर्वांनी जे काम केले त्यांचे देखील मी अभिनंदन करतो.

या सोळाव्या लोकसभेचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटेल. कारण देशात एवढ्या निवडणुका झाल्या, त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला खासदार असलेला आमचा पहिलाच कालखंड होता. यातही 44 महिला खासदार पहिल्यांदाच निवडून आल्या होत्या. महिला खासदारांचे प्रतिनिधित्व, त्यांचा सहभाग त्यांची चर्चेची पातळी अतिशय उच्च दर्जाची होती. सर्व महिला खासदार अभिनंदनाला पात्र आहेत. देशात मंत्रिमंडळात प्रथमच सर्वाधिक महिला मंत्री आहेत आणि देशात प्रथमच सुरक्षेशी संबंधित समितीमध्ये देखील दोन महिला प्रतिनिधित्व करत आहेत, एक संरक्षण मंत्री आणि दुसऱ्या परराष्ट्रमंत्री. आनंदाची गोष्ट म्हणजे प्रथमच एक महिला सभापती आहेत,  त्याचबरोबर आपल्या रजिस्ट्रार जनरल देखील,  सरचिटणीस देखील महिला आहेत. लोकसभेच्या सरचिटणीस आणि त्यांची संपूर्ण टीम आणि संपूर्ण परिसर सांभाळणाऱ्या सर्व जणांचे मी अभिनंदन करतो. या सदनात कुणी असा अर्थ काढू नका की मी सरकारची कामगिरी सांगण्यासाठी उभा आहे. गेल्या पाच वर्षांत या सभागृहात जे काम झालं आहे ते जर पाहिलं,  आपण सगळे त्याचा एक हिस्सा आहोत. विरोधी पक्षात राहूनही त्याला बळ देण्याचे काम केलं आहे आणि पक्षात राहूनही मदत केली आहे. आणि म्हणूनच सभागृहातल्या सर्व सहकार्‍यांचे यात गौरवपूर्ण योगदान आहे. गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात आपणा सर्वांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आज आपला देश जगातली सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे आणि या गौरवास्पद कामगिरीचे आपण सर्व भागीदार आहोत. धोरण आखणी इथूनच झाली आहे. पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं आपण सज्ज झालो आहोत.  यातही या सभागृहाच्या घडामोडींची खूप मोठी भूमिका आहे.

आज भारताचा आत्मविश्वास खूप वाढलेला आहे आणि पुढे जाण्यासाठी खूप मोठी ताकद असते ती म्हणजे आत्मविश्वास. जिंकण्याची ताकद असते तो आत्मविश्वास. संकटांचा सामना करण्याचे सामर्थ्य असते तो आत्मविश्वास. आज देश आत्मविश्वासाने भरलेला आहे. या सभागृहांने ज्या सामुहिकतेने, ज्या गतीने निर्णायक प्रक्रियांना वेग दिला आहे, हा विश्वास निर्माण करण्यात खूप मोठी भूमिका पार पाडली आहे. जगभरातल्या सर्व प्रतिष्ठित संस्था,  जगमान्य संस्था भारताच्या उज्ज्वल भविष्यबाबत नि:संकोच पणे एका सुरात उज्वल भविष्याबाबत आपल्या शक्यता सांगत आहेत. याच कार्यकालात भारतानं डिजिटल जगात आपलं स्थान निर्माण केलं आहे, मोठे यश मिळवले आहे. जगभरात  जागतिक तापमान वाढीची चर्चा होत असताना ऊर्जाक्षेत्रात, ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात भारताने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे नेतृत्व केले आहे आणि ज्या प्रकारे आज जगात पेट्रोलियम उत्पादनवाल्या देशांच्या आघाडीची ताकद निर्माण झाली आहे तो दिवस दूर नाही जेव्हा भारताच्या या निर्णयाचा परिणाम येणाऱ्या दशकात नक्कीच जाणवेल. त्याच सामर्थ्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही  जागतिक तापमान वाढी विरोधात लढतांना, पर्यावरण सुरक्षेची चिंता , जगाला पर्यायी जीवन देण्याची व्यवस्था करतांना या कार्यकाळाने एक मोठी भूमिका पार पाडली आहे.

अंतराळ विश्वात भरताने आपले स्वतःचे स्थान निर्माण केले आहे जास्तीत जास्त उपग्रह देखील याच काळात प्रक्षेपित झाले आहेत. लाँचिंग पॅड म्हणून आज जगासाठी भारत एक केंद्र बनला आहे. आर्थिक घडामोडींचे देखील एक केंद्र बनत चालला आहे मेक इन इंडियाच्या दिशेने, उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्णतेसह पुढे जाण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलत आहेत. जागतिक संदर्भात आज भारताचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले जात आहे आणि मी कधी कधी म्हणतो देखील लोक संभ्रमात पडतात  की मोदीजी बोलत आहे की सुषमाजी बोलत आहेत. याच कार्यकाळात जगात आपली प्रतिष्ठा खूप वाढली आहे जगभरात आपली वाहवा होत आहे. लोक काही म्हणत असले तरी वास्तव  हेच आहे.  या वास्तवामागचं कारण आहे पूर्ण बहुमत असलेले सरकार. जगात पूर्ण बहुमत असलेल्या सरकारचा आदर केला जातो.

मधल्या तीस वर्षांच्या कार्यकाळात भारताचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तीस वर्षानंतर 2014 मध्ये जेव्हा पूर्ण बहुमत असलेल्या देशाचा नेता जगातल्या दुसऱ्या नेत्यांना भेटतो तेव्हा त्यांना माहित असतं त्याच्याकडे पूर्ण बहुमत आहे आणि त्याची स्वतःची एक ताकद आहे. यावेळी पाचही वर्षात मला असा अनुभव आला की जगात देशाचे एक स्थान निर्माण झाले आहे. त्याचे पूर्ण श्रेय मोदींना नाही, सुषमाजींना नाही, सव्वाशे कोटी  देशवासीयांच्या 2014च्या निर्णयाला आहे. त्याचबरोबर याच कालखंडात परदेशातल्या अनेक संस्थांमध्ये भारताला स्थान मिळालं. भारताचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. बांगलादेशचे उदाहरण घेऊया, याच सभागृहात सर्वसहमतीने जमीन विवादावर तोडगा काढण्यात आला हे खूप मोठं काम झालं आहे.

मला वाटतं आपले हेच एक वैशिष्ट्य आहे की आपण सर्वसहमतीने हे काम केले आणि जगाला सर्वसहमतीचा संदेश, खूप मोठी ताकद देण्याचा संदेश दिला आहे. यासाठी मी सभागृहाचे विशेष आभार मानतो, सर्व पक्षांचे आभार मानतो. त्याच प्रकारे आपल्या परराष्ट्र धोरणाचा एक नवा पैलू समोर आला आहे जगात मानवी हक्क,  मानवी मूल्य हा जगातल्या एखाद्या भागाचा अधिकार राहिला आहे, अन्य लोकांना याच्याशी काहीही देणेघेणे नाही, आणि आपण तर जणू मानवता विरोधी अशीच आपली प्रतिमा तयार झाली आहे. मात्र मानवता आणि वसुधैव कुटुम्बकम म्हणणारा हाच देश, मात्र याची अशी प्रतिमा का बनली माहित नाही. आता गेल्या पाच वर्षांत जर आपण पाहिलं- नेपाळमध्ये भूकंप असेल, मालदीवमधली पाण्याची आपत्ती असेल, फिजी मधील चक्रीवादळ असेल,  श्रीलंकेत अचानक आलेले  चक्रीवादळ असेल,  बांगलादेश मध्ये म्यानमार लोकांमुळे आलेलं संकट असेल,  आपले लोक परदेशात येमेनमध्ये अडकले होते त्यांना हजारोंच्या संख्येने परत आणण्याचे काम असेल, नेपाळमध्ये ८० लोकांना सुखरूप मायदेशी पाठवणे असेल,  मानवतेच्या कार्यात भारताने खूप मोठी भूमिका पार पाडली आहे. योग संपूर्ण जगात एक गौरवाचा विषय बनला आहे. जगात संयुक्त राष्ट्रांमध्ये आत्तापर्यंत जितके प्रस्ताव पारित झाले आहेत त्यात सर्वात वेगाने आणि सर्वात जास्त समर्थन मिळणारा जर कुठला प्रस्ताव असेल तर तो  योग संदर्भातला प्रस्ताव आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती , महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जात आहे. जगातल्या सर्व देशांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची सव्वाशेवी जयंती,  महात्मा गांधींची जयंती साजरी करण्यात आली आणि गांधीजींची जयंती कुणी कल्पना करू शकतो का ‘वैष्णव जन तो तेने कहिये’ जे आपल्या नसानसात आहे,  आज गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने जगभरातील १५० देशांच्या प्रसिद्ध गायकानीं वैष्णव जन हे गाणं गाऊन महात्मा गांधीना खूप मोठी आदरांजली वाहिली आहे. जगात एक मृदू शक्ती कशी आणता येईल याचे उदाहरण आज आपण अनुभवत आहोत.

26 जानेवारीला आपण पाहिले असेल,महात्मा गांधीना केंद्रस्थानी ठेवून 26 जानेवारीला सादर करण्यात आलेले प्रसंग,  सर्व राज्यांनी कशाप्रकारे गांधीजींचे जीवन सादर केले. आपण या सभागृहात या कार्यकाळात संविधान दिवस साजरा केला,  आपण या सदनाच्या कार्यकाळात बाबासाहेबांच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्तानं विशेष चर्चा केली , आपण या सदनात या कार्यकाळात संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी वेळ दिला आणि सर्वांनी मिळून शाश्वत विकास उद्दिष्ट  बाबत चर्चा केली.  हा वस्तुपाठ याच कार्यकाळात या सभागृहात तुमच्या नेतृत्वाखाली शक्य झाला आहे आणि म्हणूनच सदनाचे सर्व सदस्य तुमच्या नेतृत्वाचे अभिनंदन करत आहेत, तुमचे आभार मानत आहेत.

अंदाजे दोनशे एकोणीस विधेयके मांडण्यात आली आणि 203 विधेयक मंजूर झाली आणि या सदनात आज जे खासदार आहेत सोळाव्या लोकसभेतले,  ते आपल्या आयुष्याबद्दल जेव्हा कोणाला सांगतील,  निवडणुकीच्या रिंगणात उतरतील तेव्हा सांगतील आणि निवडणुकांनंतरही जेव्हा संधी मिळेल , काही लिहिण्याची सवय असेल तर नक्की लिहा,  त्या कार्यकाळात ते सदस्य होते, त्या कार्यकाळात त्यांनी काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर कायदा बनवण्याचं काम केलं होते, या देशात असे कायदे पूर्वी कधीही होऊ शकले नव्हते ते या सभागृहाने बनवले होते आणि  परदेशात जमा काळा पैसा विरोधात कठोर कायदा बनवण्याचं काम इथेच झाले.

दिवाळखोर कंपनीशी संबंधित  आयबीसी कायदा या सभागृहाने बनवला,  बेनामी मालमत्ता संबंधातला कायदा देखील याच सभागृहाने बनवला,  आर्थिक फरार गुन्हेगारांविरुद्ध कायदा देखील याच सभागृहाने बनवला. मला वाटतं या पाच वर्षात या सभागृहाच्या कार्यकाळात काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात  लढाई लढण्यासाठी जी कायदेशीर व्यवस्था हवी, जे कायदेशीर अधिकार हवेत,  आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कायद्याची एक ताकद असायला हवी यासाठी जे काही करायला हवं होतं ते या सभागृहाने पारित करून देशाच्या आगामी शतकाची सेवा केली आहे आणि म्हणूनच या सभागृहाला तुमच्या नेतृत्वाचे खूप खूप अभिनंदन केवळ या क्षणीच नव्हे तर येणाऱ्या कित्येक पिढ्या देखील करतील असा मला विश्वास आहे. हेच सभागृह ज्याने जीएसटी विधेयक पारित केले आणि रात्री बारा वाजता संयुक्त अधिवेशन बोलावले आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न न करता माजी वित्तमंत्री आणि तत्कालीन राष्ट्रपती यांच्या हस्ते जीएसटीचा शुभारंभ केला, जेणेकरून सर्वाना याचा अधिकार मिळेल,  सबका साथ सबका विकास यातही असेल याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला गेला. हे तेच सभागृह आहे ज्याने आधार विधेयकाला खूप मोठी कायदेशीर ताकद मिळवून दिली. आधार जगासाठी एक आश्चर्य आहे.  जगाने हे पाहिले आहे, या देशाने एवढे मोठे काम केले आहे. जग हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. याच कार्यकाळात सभागृहांने हे काम करून जगात खूप मोठे काम केले आहे.

देश स्वतंत्र झाला,  मात्र अशी कोणती मानसिकता होती की आपण शत्रू संपत्तीबाबत निर्णय घेऊ शकलो नव्हतो. खूप कठोरतेने शत्रू संपत्ती विधेयक पारित करून भारताच्या 1947 मधल्या जखमांविरोधात जे काही सुरु होते, त्यावर काम करण्यात आले.

या सभागृहात सामाजिक न्‍यायाच्या दिशेने  देखील दीर्घकाळ समजावर प्रभाव निर्माण करेल- उच्‍च वर्णीय लोकांसाठी म्हणजेच गरीब लोकांसाठी कटुतेशिवाय आरक्षण व्‍यवस्‍था ही याची सर्वात मोठी ताकद आहे,कुठल्याही संभ्रमाशिवाय समजतील दुर्बल घटकांना, त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन आणि त्यांना विश्वासात घेऊन कायदा पारित करण्यात आला. दोन्ही सभागृहांमधील सर्व पक्षांचे नेते यासाठी अभिनंदनास पात्र आहेत. 10 टक्के आरक्षणाचे खूप मोठे काम झाले आहे.

त्याचप्रमाणे ओबीसीसाठी आयोग स्थापन करणे असेल किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या गैरसमजानंतर अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती कायद्यातील दुरुस्ती असेल,  मातृत्व रजा असेल, जगभरातील समृद्ध देशांना देखील हे ऐकून आश्चर्य वाटते की भारतात प्रसूती रजा 12 आठवड्यांवरून वाढवून 26 आठवडे करण्यात आली आहे. यामुळे जग भारताकडे पुरोगामी विचारांचा देश म्हणून पाहत आहे. हे काम या सभागृहाने केले आहे.

सभागृह कायदे बनवतो. मात्र या गोष्टीसाठी देखील हा कार्यकाळ देश आणि जग लक्षात ठेवतील की कायदे तयार करणाऱ्या या वर्गाने कायदे रद्द करण्याचे देखील काम केले आहे. चौदाशेपेक्षा अधिक कायदे या सभागृहाच्या सदस्यांनी रद्द करून कायद्यांच्या जंजाळातून मार्ग काढण्याच्या दिशेने शुभारंभ केला आहे. अजूनही करत आहे, बरेच बाकी आहे आणि त्यासाठी मुलायम सिंहजी यांनी आशिर्वाद दिला आहेच.

एक खूप मोठे काम आणि मला वाटते की देशाने हे व्यवस्थितपणे पोहचवायला हवे होते मात्र पोहचवू शकला नाही. आपल्या खासदारांवर नेहमी एक कलंक लागायचा कि आपणच आपले वेतन ठरवतो, आपणच आपल्या मर्जीनुसार वेतन वाढवतो, आपण देशाची पर्वा करत नाही आणि ज्या दिवढी वेतन वाढायचे तेव्हा जगभरातून आपल्यावर टीका व्हायची आणि गेली 50 वर्ष हे सुरु होते.

यावेळी प्रथमच सर्व खासदारांनी मिळून या टीकेपासून मुक्तीचा मार्ग शोधला आणि एक अशी संवैधानिक व्‍यवस्‍था तयार केली ज्याअंतर्गत इतरांचे जे होईल ते त्यांचेही होईल.आता खासदार या कामासाठी एकटे नसतील. मात्र या उत्तम निर्णयाची जशी वाहवा व्हायला हवी होती तशी झाली नाही. गेली 50 वर्षे खासदारांना, वरिष्ठ नेत्यांना अनुचित बोलणी ऐकायला लागायची त्यापासून मुक्ती देण्याचे काम केले आहे. आपल्या जितेंद्रजीनी चांगले जेवायला तर घातले ,मात्र बाहेर आपण टीका ऐकतो की केंटीनमध्ये पैसे खूप कमी आहेत आणि बाहेर महाग आहे, हे खासदार असे का करतात.

मला आनंद आहे की, जितेंद्रजी यांच्या समितीने माझ्या भावनांचा आदर केला, सभापती महोदयांनीही ते स्वीकारले आणि अतिशय स्वस्तात जे इथे दिले जायचे , आता तुम्हाला खिशातून थोडे जास्त द्यावे लागतात. मात्र त्यापसुनदेखील मुक्ती मिळवण्याच्या दिशेने आम्ही पावले उचलली आहेत आणि ते लवकरच पूर्णत्त्वाला नेऊ असा मला विश्वास आहे.

अशाच प्रकारे या सभागृहाला आणखी बऱ्याच गोष्टींचा नक्की आनंद मिळेल. आपण ऐकायचो कि भूकंप येणार आहे. मात्र पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आला आहे , मात्र भूकंप झालेला नाही. कधी विमाने उडली आणि मोठं-मोठ्या लोकांनी विमाने उडवली, मात्र लोकतंत्र आणि लोकशाहीची मर्यादा एवढी उंच आहे की भूकंप देखील पचवला आणि कोणतेही विमान त्या उंचीवर जाऊ शकले नाही. ही लोकशाहीची ताकद आहे सभागृहाची ताकद आहे.  अनेकदा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील झाले, काही असे शब्दप्रयोग झाले जे व्हायला नको होते.  या सभागृहातील कुठल्याही सदस्याबरोबर, तो कुठलाही असेल इकडचा किंवा तिकडचा, या सभागृहाचा नेता म्हणून मी  मिक्षामी दुखम: म्हणेन, क्षमा प्रार्थनेसाठी जयहिंद, पर्यावरण पर्व मध्ये मिक्षामी दुखम: एक खूप मोठा  संदेश देणारा शब्‍द आहे, ती भावना मी प्रकट करतो.

मल्लिकार्जुन यांच्याबरोबरही नोकझोक व्हायची. आज त्यांचा आवाज चांगला असता तर आजही ऐकायला मिळाले असते. मात्र कधी-कधी मी त्यांचे भाषण ऐकू शकलो नाही तर नंतर सविस्तर पाहायचो. आणि ते आवश्यक देखील होते. मात्र त्याचबरोबर माझ्या वैचारिक जाणिवा जागवण्यासाठी त्यांचे भाषण उपयोगी पडायचे.यासाठी मी खर्गे साहेबांचा खूप आभारी आहे.  सभागृहात पूर्णवेळ बसणे, कधीकाळी आपण अडवाणींना देखील पूर्णवेळ सभागृहात बसलेले पाहिले आहे. खर्गे देखील पूर्णवेळ बसतात, आपल्यासारख्या खासदारांसाठी हा शिकण्याचा विषय आहे. त्यांच्या लोकप्रतिनिधित्वाला सुमारे ५० वर्षे होत आली आहेत. मात्र तरीही लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी ज्या पद्धतीने ही जबाबदारी पार पाडली आहे त्यासाठी मी आदरपूर्वक त्यांचे अभिनंदन करतो.

मी पहिल्यांदा जेव्हा इथे आलो तेव्हा मला अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या , त्यातील काहींचा अर्थ मला माहित नव्हता. पहिल्यांदा मला कळले की गळाभेट आणि गळ्यात पडणे यात काय फरक आहे. हे प्रथमच कळले. नजरेतून थट्टामस्करीचा खेळ देखील याच सभागृहात पाहायला मिळाला. आणि परदेशातील माध्यमांनीही त्याचा खूप आनंद घेतला. संसदेची प्रतिष्ठा जपणे हे प्रत्येक खासदाराचे कर्तव्य असते. आणि आपण सर्वानी त्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत.

यावेळी आपल्या खासदारांच्या प्रतिभेचाही अनुभव आला. अलिकडेच मी भाषण करत असताना या सभागृहात.राष्ट्रपतींवर विडम्बन मला ऐकायला मिळाले होते.  मनोरंजन क्षेत्रातील जे लोक आहेत त्यांना अशा प्रकारच्या विडंबनाची गरज आहे. यासाठी त्याना युट्यूबवर हे पहायची परवानगी दिली जावी. चांगले-चांगले कलाकार देखील असे करू शकणार नाहीत जे इथे ऐकायला मिळाले.

त्याचप्रमाणे वेशभूषा देखील टीडीपीचे खासदार नारामलि शिवप्रसाद हे काय अदभूत वेशभूषा करून येतात. त्यांना पाहून सर्व ताण दूर व्हायचा. अशा प्रकारच्या खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यकाळ पार पडला आहे.

माझ्यासारख्या एका नवीन खासदाराला तुम्हा सर्वांकडून खूप काही शिकायला मिळाले आहे. तुम्हा सर्वांच्या मदतीने नवीन असूनही मला कधी कसली उणीव जाणवली नाही. सर्वानी आणि तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या मार्गदर्शनात पहिल्या डाव सुरु करताना मला जी मदत केली आहे त्याबद्दल मी तुमचा खूप-खूप आभारी आहे. मी आदरणीय मुलायम सिंहजी यांचे  विशेष आभार मानतो, त्यांचे प्रेम आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो.

या सभागृहाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचे, ज्यांनी सर्व खासदारांची देखभाल केली , त्यांचे देखील हार्दिक अभिनंदन करतो. कामकाजासाठी जी काही आवश्यक व्यवस्था करायची होती ती केली, आणि  एका सुदृढ लोकशाही परंपरेसाठी जेव्हा आपण जनतेसमोर जाऊ तेव्हा आपण सुदृढ परंपरा कशी पुढे न्यायची, निकोप स्पर्धा कशी करायची , लोकशाही बळकट करण्यासाठी आपण आपली भूमिका कशी पार पाडायची यासाठी मी सर्व खासदारांना शुभेच्छा देतो.

याच शुभेच्छांसह याच भावनेसह मी माझे भाषण संपवतो. मी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन सभागृहाच्या सर्व खासदारांचे मनापासून आभार मानतो.

धन्‍यवाद.

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
India’s Economic Momentum Holds Amid Global Headwinds: CareEdge

Media Coverage

India’s Economic Momentum Holds Amid Global Headwinds: CareEdge
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 18 मे 2025
May 18, 2025

Aatmanirbhar Bharat – Citizens Appreciate PM Modi’s Effort Towards Viksit Bharat