मित्र राष्ट्र बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना जी, सन्माननीय अतिथीगण, मुख्यमंत्री जी, राज्यापालसाहेब, बंधू आणि भगिनींनो,
‘बांगलादेश भवन’ हे भारत आणि बांगलादेशाच्या सांस्कृतिक बंधुत्वाचे प्रतीक आहे. हे भवन दोन्ही देशांच्या कोट्यवधी लोकांमध्ये कला, भाषा, संस्कृती, शिक्षण, कौटुंबिक नातेसंबंध आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये केलेल्या संयुक्तिक संघर्षांतून बळकट झालेल्या ऋणानुबंधाचेही प्रतीक आहे. या भवनाचे निर्माण कार्य केल्याबद्दल मी शेख हसीना जी आणि बांगलादेशच्या जनतेला खूप खूप धन्यवाद देतो.
भारत आणि बांगलादेश अशा दोन्ही देशांच्या राष्ट्रीय गीताचे रचनाकार गुरूदेव टागोर यांच्या कर्मभूमीवर रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये या भवनाचे उद्घाटन होत असल्याने ही एक आनंदाची गोष्ट आहे.
बंधू आणि भगिनींनो, हे महाविद्यालय आणि या पवित्र भूमीचा इतिहास बांगलादेशाचे स्वातंत्र्य, भारताचे स्वातंत्र्य आणि उपनिवेशकाळमध्ये बंगालच्या विभाजनापेक्षाही प्राचीन आहे. हे महाविद्यालय म्हणजे आपल्या संयुक्त वारशाचे प्रतीक आहे. त्याचे हिस्से इंग्रज करू शकले नाहीत. विभाजनाचे राजकारणही यास्थानी कुचकामी ठरले. गंगासागरच्या अगणित लाटा दोन्ही देशांच्या किनारी प्रदेशांना समानरूपाने स्पर्श करणारा हा संयुक्त वारसा आहे. आमच्यातील समानता, आमच्या संबंधांचे मजबूत सूत्र आहे.
वंगबंधू शेख मुजीबुर्रहमान यांना जितका मान-सन्मान, आदर बांगलादेशामध्ये मिळतो तितकाच हिंदुस्तानच्या भूमीमध्येही मिळतो. स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्याविषयी जी भावना भारतामध्ये आहे, अगदी तशीच भावना बांगलादेशामध्येही पाहण्यास मिळते.
विश्वकवी टागोर यांच्या कविता आणि गाणी बांगलादेशातल्या गावा-गावांमधून ऐकायला येतात. तर काज़ी नज़रूल इस्लाम जी यांच्या रचना पश्चिम बंगालच्या गल्ली-बोळांमध्येही ऐकायला मिळतात.
बांगलादेशाच्या अनेक मान्यवर लोकांचे नाव या विद्यापीठाशी जोडले गेले आहे. यामध्ये रिजवाना चैधरी बन्न्या, अदिती मोहसिन, लिली इस्लाम, लीना तपोशी, शर्मिली बॅनर्जी आणि निस्सार हुसैन यांच्यासारख्या महनीय व्यक्तींचा समावेश आहे.
गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या दूरदृष्टीमुळे ही संस्था आमच्या राजकीय मर्यादा आणि बंधनांतून मुक्त राहली आहे. गुरूदेव स्वतःच एक स्वतंत्र विचाराचे व्यक्ती होते. त्यांना कोणत्याच सीमांच्या बंधनामध्ये अडकून राहता आलं नाही, ठेवता आलं नाही. ते जितके भारताचे होते, तितकेच ते बांगलादेशाचेही होते. गगन हरकारा आणि लालन फ़क़ीर यांच्या बंगाली लोकसंगीतामधून त्यांचा परिचय बांगलादेशाच्या भूमीला झाला होता. ‘अमार शोनार बांगला’ ची धून देताना त्यांना गगन हरकाराकडून प्रेरणा मिळाली होती. बाऊल संगीताचा प्रभाव रवींद्र संगीतामध्ये स्पष्टपणे जाणवतो.
स्वतः वंगबंधूही गुरूदेवांचे विचार आणि त्यांची कला यांचे प्रशंसक होते. टागोर यांच्या वैश्विक मानवतेच्या विचारांमुळे वंगबंधू शेख मुजीबुर्रहमान हे प्रभावित झाले होते. गुरूदेवांचे ‘शोनार बांगला’ वंगबंधूंच्या मंत्रमुग्ध करणा-या भाषणांचा एक महत्वपूर्ण भाग होता. टागोरांचा वैश्विक मानवतेचा विचारच आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे. आम्हीही त्या शब्दांप्रमाणेच ‘सबका साथ, सबका विकास’ हा मूलमंत्र निश्चित केला असून त्यानुसार वाटचाल सुरू केली आहे.
बंधू आणि भगिनींनो, आगामी पिढीला मग ती पिढी बांगलादेशाची असो अथवा भारताची, त्यांना या समृद्ध परंपरा, या महान व्यक्तींविषयी, त्यांच्या कार्याविषयी माहिती मिळाली पाहिजे, त्यांचे व्यक्तित्व जाणून, समजून घेता आले पाहिजे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करीत राहिले पाहिजे. यासाठी आमच्या सरकारमधील सर्व संबंधित विभाग, खाती, ज्याप्रमाणे भारताचे उच्चायोग, तसेच इतर संस्था आणि व्यक्ती, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यासाठी कार्यरत आहेत.
आज ज्याप्रमाणे या इथे ‘बांगलादेश भवन’ लोकार्पित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशातल्या कुश्तिया जिल्हयामधल्या गुरूदेव टागोर यांचे निवास ‘‘कुठीबाडी’’ चे नूतनीकरण करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे.
मित्रांनो, हा संयुक्त वारसा आणि रवींद्र संगीत यांची मधुरता यांनी आमच्या संबंधावर जणू अमृताचे सिंचन केले आहे आणि आम्हाला सुख-दुःखाच्या एकाच धाग्यामध्ये गुंफून ठेवले आहे. याच कारणामुळे बांगलादेश मुक्तीसाठी संघर्ष भले सीमेच्या पलिकडून झाला असला तरी प्रेरणेचे बीज मात्र या धरतीवर पडले आहे. अत्याचारी सत्तेने स्वार्थासाठी घाव भलेही बांगलादेशातल्या लोकांवर केले, मात्र त्याची वेदना आमच्या या भागाला जाणवली. केवळ याच कारणामुळे ज्यावेळी बंगबंधूंनी मुक्तीचे बिगुल वाजवल्यानंतर कोट्यवधी भारतीयांच्या भावना त्या मोहिमेशी आपोआप जोडल्या गेल्या. अत्याचार आणि दहशतवादाच्या विरोधात आमचे संयुक्त संकल्प आणि त्याचा इतिहास या भवनाच्या माध्यमातून भावी पिढींना प्रेरणा देत राहणार आहे.
मित्रांनो, गेल्यावर्षीची एक घटना मला आजही चांगलीच आठवतेय. ज्यावेळी दिल्लीमध्ये भारतीय सैनिकांना बांगलादेशाने सन्मानित केले होते, त्यावेळी वातावरण किती भावूक बनले होते, त्याचे स्मरण मला आज होत आहे. हा 1961बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले होते, त्यांचाच केवळ सन्मान नव्हता. तर बांगलादेशाच्या मुक्तीसाठी ज्या योद्धयांनी पराक्रम केला त्या प्रत्येकाशी जोडलेल्या भावनेचा सन्मान होता. शेजारी राष्ट्राच्या सैनिकांचा बहुमान, सन्मान केला जाणे, अशी घटना फार दुर्मिळ असते.
मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधांचा एक सोनेरी अध्याय लिहिला जात आहे. भूमी सीमा आणि समुद्री सीमा यासारखा जटिल व्दिपक्षीय विषय सोडवणे, त्यावर उभय देशांचे एकमत होणे जवळपास अशक्य मानले जात होते. परंतु आता हे प्रश्न आता सुटले आहेत. मग रस्तेमार्ग असेल अथवा लोहमार्ग किंवा आंतरदेशीय जलमार्ग असले किंवा समुद्री जहाजाचा, आम्ही संपर्क यंत्रणा अगदी मजबूत करण्यासाठी या मार्गांच्या क्षेत्रामध्ये खूप वेगाने पुढे जात आहोत. 1965 मध्ये बंद झालेली संपर्क यंत्रणा आता पुन्हा एकदा सुरू होत आहे. आणि संपर्क व्यवस्थेचे नवनवे मार्ग विकसित होत आहेत.
गेल्याच वर्षी कोलकाता ते खुलना यांच्या दरम्यान वातानुकुलित रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे आम्ही ‘बंधन’ असे नामकरण केले आहे. हे बंधन मैत्रीचे आहे. आणि याच बंधनाच्या, मैत्रीच्या मार्गावरून आम्ही आमचे ऋणानुबंध अधिक मजबूत करून संबंध पुढे नेत आहोत.
बांगलादेशाची विजेची गरज भागवण्याचे काम भारताकडून सातत्याने केले जात आहे. सध्या 6000 मेगावॅट विद्युत पुरवठा केला जातो. यावर्षी विद्युत पुरवठ्यामध्ये वाढ करून तो 1100 मेगावॅटपर्यंत करण्याचे उद्दिष्ट आहे.
भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये इंटरनेटचे एक कनेक्शन बांगलादेशातूनही येत आहे. बांगलादेशाच्या विकासासाठी पंतप्रधान शेख हसीना यांनी ज्या गोष्टींना प्राधान्य दिले आहे, त्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. त्यासाठी 8 अब्ज डॉलर्सची तरतूद भारताने ‘लाईन्स ऑफ क्रेडिट‘ म्हणून केली आहे. या मदतीच्या कार्यवाहीमध्ये चांगली प्रगती होत आहे. कोणते प्रकल्प या मदतीमधून निर्माण करायचे, याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी क्रेडिटही देण्यात आले आहे.
बांगलादेश अंतराळ तंत्रज्ञानामध्ये पुढे जात आहे. अलिकडेच बांगलादेशाने आपला पहिला उपग्रह-बंगबंधू प्रक्षेपित केला आहे. त्यासाठी पंतप्रधान जी आणि बांगलादेशच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन. आज भारतामध्ये आम्ही अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करून गरीबांच्या राहणीमानामध्ये कशा पद्धतीने उंचावता येईल त्याचा विचार करतोय. तसेच कार्यप्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यात येत आहे. अंतराळ तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये भविष्यात सहकार्याचे नवीन दालन उघडेल, असा माझा विश्वास आहे.
पंतप्रधान शेख हसीना जी आणि आमच्यामध्ये सातत्याने संपर्क होत असल्यामुळे उभय देशांना एकमेकांचे सहकार्य आणि ऊर्जा मिळत आहे, याचा मला आनंद होतो आहे. गेल्यावर्षीही त्या भारतामध्ये आल्या होत्या. आणि आज या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहिल्यामुळे या कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली आहे.
मित्रांनो, आपल्या आशा आणि आकांक्षा जितक्या समान आहेत, अगदी त्याचप्रमाणे, तितकीच आपल्यापुढे असलेली आव्हानेही सारखीच आहेत. हवामान परिवर्तनाचे संकट आमच्यासमोर आहे. त्याचबरोबर तप्त होत चाललेला सूर्य आता आमच्यासाठी आव्हाने घेवून येणार आहे. मात्र त्या सूर्याच्या उष्णतेमधून नवीन संधीही निर्माण होणार आहेत. पंतप्रधान शेख हसीनाजी यांनी 2021 पर्यंत बांगलादेशातील प्रत्येकापर्यंत वीज पुरवण्याचे ध्येय निश्चित केले आहे. आणि या इथे भारतामध्ये आम्ही पुढच्या वर्षीपर्यंत देशातल्या प्रत्येक घरापर्यंत वीज पुरवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. देशातल्या प्रत्येक गावामध्ये वीज नेण्याचे लक्ष्य तर याआधीच पूर्ण केले आहे. आमचे संकल्प समान आहेत आणि ते संकल्प सिद्धीस नेण्यासाठी जो मार्ग निवडला आहे, तोही एकसारखाच आहे.
मित्रांनो, भारताने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसाठी पुढाकार घेतला आहे. दुनियेतील अनेक देश या आघाडीमध्ये सहभागी झाले आहेत. या आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये सौरऊर्जेचा जास्तीत जास्त कशाप्रकारे वापर करता येईल, याचा विचार करून कार्य करण्यात येणार आहे. यासाठी वेगवेगळया देशांना कशा पद्धतीने वित्त पुरवठा करता येवू शकतो, याचे एक तंत्र विकसित करण्याचे काम ही आघाडी करणार आहे. बांगलादेशही सौरऊर्जा आघाडीचा एक हिस्सा आहे, याचा मला अतिशय आनंद होतो आहे. यावर्षी मार्चमध्ये दिल्लीमध्ये ‘आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची शिखर परिषद झाली. या परिषदेमध्ये बांगलादेशाचे राष्ट्रपती सहभागी झाले, त्याबद्दल आम्हाला आनंद झाला. यावरून एक लक्षात येते की, सीमेच्या दोन्ही बाजूच्या देशांमध्ये कोणत्याही आव्हानांचे रूपांतर संधीमध्ये करण्यासाठी सहकार्य करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे.
गेल्या महिन्यामध्ये मी बांगलादेशाच्या 100 सदस्यांच्या युवा प्रतिनिधी मंडळाला भेटलो होतो. या युवकांच्या असलेल्या आकांक्षा, त्यांची स्वप्ने अगदी भारतातल्या युवकांच्या आकांक्षा आणि स्वप्नांप्रमाणेच आहेत, असे माझ्या लक्षात आले. दोन्ही देशांच्या विकासासाठी आणि आमच्या युवकांची स्वप्ने साकार करण्यासाठी आम्ही एकत्रित मिळून काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
आज बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या नवीन मार्गावरून वाटचाल करीत आहे. आज ज्यावेळी बांगलादेशाने विकसनशिल अर्थव्यवस्थेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी सर्व मापदंड पूर्ण केले आहेत. याबद्दल जितका गर्व बांगलादेशाला वाटतो, तितकाच गर्व संपूर्ण भारतालाही वाटत आहे.
बांगलादेशाने आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यापद्धतीने प्रगती केली आहे, गरीबांचे जीवन सोपे, सुलभ, सुकर बनवण्याचे काम केले आहे. ते काम पाहिल्यानंतर मला वाटते की, हे काम भारताच्या लोकांना प्रेरणा देणारे ठरू शकते. इतकं विलक्षण कार्य बांगलादेशाने केले आहे.
मित्रांनो, आज भारत आणि बांगलादेश यांच्या विकास यात्रेचे सूत्र, एका सुंदर पुष्पहाराप्रमाणे एकमेकांमध्ये गुंफले जात आहेत. जगातल्या काही भागामध्ये ज्याप्रमाणे अनिश्चिततेचे वातावरण आहे, संपूर्ण विश्वाचा विचार केला तर काही गोष्टी अतिशय वेगाने बदलत आहेत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये एक सत्य आपल्यासमोर आले आहे. आणि ते सत्य म्हणजे, प्रगती आणि समृद्धी यांच्यासाठी, शांती आणि स्थिरता यांच्यासाठी, सुख आणि सद्भाव यांच्यासाठी, भारत आणि बांगलादेश यांची मैत्री आणि आपले एकमेकांशी असलेले सहकार्याचे संबंध खूप महत्वाचे आहेत. हे सहकार्यपूर्ण संबंध केवळ व्दिपक्षीय स्तरावरीलच नाहीत. ‘बिमस्टेक’सारख्या व्यासपीठाच्या माध्यमातून आमचे सहकार्य क्षेत्रीय प्रगती आणि संपर्क व्यवस्था वाढवण्याला प्रोत्साहन देत आहे.
मित्रांनो, या महत्वाच्या क्षेत्रामध्ये होत असलेल्या प्रगतीमुळे प्रत्येक देशाची प्रगती होणार, हे निश्चित आहे. सध्याच्या काळामध्ये आपल्या सर्वांसाठी एक संधी उपलब्ध झाली आहे. आज भारत आणि बांगलादेश, ज्या पद्धतीने एकत्रितपणे पुढे जात आहेत, एकमेकांच्या विकासामध्ये सहकार्य करीत आहेत, ती गोष्ट इतरांनाही एक पाठ शिकवणारी आहे. एक आदर्श नमूना ठरणारी आहे. हा एक अभ्यासाचाही विषय आहे.
मित्रांनो, पंतप्रधान शेख हसीना जी यांनी बांगलादेशाला 2041 पर्यंत विकसित देश बनवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. ही त्यांची दूरदृष्टी आणि बंगबंधू, आणि परंपरा यांचे प्रतीक आहे की, प्रत्येक बांगलादेशीच्या हितासाठी त्या सातत्याने चिंता करीत असतात. त्यांचे हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी भारताचे बांगलादेशाला संपूर्ण सहकार्य असणार आहे.
शेख हसीनाजी या इथं आल्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सगळयांना बांगलादेश भवनाच्या उद्घाटनाबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद!