आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘अमली पदार्थमुक्त भारत अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओद्वारे संबोधित केले. हिसार इथल्या गुरु जांबेश्वर विद्यापीठात आज हा संदेश दाखवण्यात आला.
अमली पदार्थांच्या व्यसनाला पायबंद घालण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन आणि श्री श्री रविशंकर करत असलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात कौतुक केले.
अमली पदार्थ समाजाला मोठा धोका असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगभरातले 3 कोटी लोक अमली पदार्थांच्या व्यसनात अडकले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
अनेक तरुण अमली पदार्थांच्या आहारी जात आहेत, ही धोक्याची घंटा आहे, असे त्यांनी सांगितले. ‘अमली पदार्थांचे व्यसन भूषणावह असल्याचा ‘स्टाइल’ असल्याचा मोठा गैरसमज आहे’, असे पंतप्रधानांनी सांगितले.
अमली पदार्थांच्या व्यसनामुळे आरोग्याच्या समस्या, कुटुंब उद्धवस्त होणे याबरोबरच अमली पदार्थांची तस्करी हा देशाच्या सुरक्षेला मोठा धोका असल्याचे, पंतप्रधान म्हणाले. अमली पदार्थांच्या व्यापारातून मिळणारे पैसे दहशतवादी आणि देशविरोधी घटकांसाठी उत्पन्नाचा मोठा स्रोत असते. या पैशाचा वापर देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी केला जातो, असे त्यांनी सांगितले.
आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवनासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी अमली पदार्थांना नाही म्हणा, असे आवाहन पंतप्रधानांनी युवा पिढीला केले. आत्मविश्वास असणाऱ्या व्यक्ती सहजासहजी अमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडत नाहीत. या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी झुंजत असलेल्यांना साहाय्य करण्याचे आवाहन त्यांनी युवा पिढीला केले. संवाद, समुपदेशन, प्रेम आणि पाठिंबा याद्वारेच व्यसनाधीन व्यक्तीचे पुनर्वसन होऊ शकते, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.
अमली पदार्थांच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांबाबत पंतप्रधानांनी सांगितले. या संदर्भात वर्ष 2018 मध्ये सुरु करण्यात आलेल्या अमली पदार्थ मागणी घट राष्ट्रीय कृती आराखड्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. वर्ष 2023 पर्यंत अमली पदार्थांचे व्यसन कमी व्हावे, यासाठी जागरुकता, क्षमता बांधणी, पुनर्वसन आणि प्रभावित क्षेत्रात विशिष्ट हस्तक्षेप यावर या आराखड्यात भर देण्यात आला आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधानांनी दिलेला संदेश देशभरातल्या महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांनी ऐकला.