तत्पर प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणी यासाठीच्या ‘प्रगती’ या बहुआयामी मंचाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधला.
25 व्या ‘प्रगती’च्या बैठकीत एकूण 10 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक असणाऱ्या 227 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. विविध क्षेत्रासंबंधी जनतेच्या तक्रारींच्या निवारणाबाबतही या बैठकीत आढावा घेतला गेला.
प्रगतीच्या माध्यमातून 25 संवाद पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले. ‘प्रगती’ या यंत्रणेमुळे केंद्र आणि राज्य यांच्यातले सहकार्य वृद्धींगत झाले आहे. आपल्या संघीय रचनेसाठी प्रगती हा उपक्रम म्हणजे सकारात्मक मोठी ऊर्जा आहे. रखडलेल्या प्रकल्पांबरोबरच सामाजिक क्षेत्रातल्या अनेक योजनांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी प्रगती हा मंच उपयुक्त ठरल्याचे पंतप्रधान म्हणाले.
माजी सैनिक कल्याण या विषयाशी संबंधित, तक्रारींच्या निवारणाचा आढावा पंतप्रधानांनी आजच्या बैठकीत घेतला. या तक्रारींचं कमीत कमी वेळात निवारण करावे असे सांगून तक्रारींच्या जलदगतीने निवारणावर पंतप्रधानांनी भर दिला.
रेल्वे, रस्ते, पेट्रोलियम, ऊर्जा, कोळसा, नागरी विकास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या क्षेत्रातल्या 10 पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, ओदिशा, आंध्रप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू आणि झारखंड या राज्यातले हे प्रकल्प आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंमलबजावणीबाबत तसंच अनुसूचित जमातीसाठी उच्च शिक्षणाकरिता असलेल्या राष्ट्रीय फेलोशिप आणि स्कॉलरशिप कार्यक्रमाचा आढावाही पंतप्रधानांनी घेतला.