पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रप्रदेशातल्या गुंटूरला भेट दिली आणि तीन महत्वाच्या प्रकल्पांचे आज उद्घाटन केले.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणचे राज्यपाल ई एस एल नरसिंहन, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यावेळी उपस्थित होते.
देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने भारतीय धोरणात्मक पेट्रोलियम रिझर्व लिमिटेडची 1.33 एमएमटी विशाखापट्टणम् धोरणात्मक पेट्रोलियम राखीव सुविधा, पंतप्रधानांनी देशाला समर्पित केली. हा प्रकल्प 1125 कोटी रुपये खर्चाचा आहे. देशातली भूमीगत साठ्याची ही सर्वात मोठी सुविधा आहे.
कृष्णापट्टणम् येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कोस्टल इन्स्टॉलेशन प्रकल्पाचे भूमीपूजन त्यांनी केले. सुमारे 100 एकरवरच्या या प्रकल्पासाठी 580 कोटी रुपयांचा नियोजित खर्च असून वर्ष 2020 पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होईल. संपूर्णत: स्वयंचलित आणि अत्याधुनिक प्रकल्पामुळे आंध्रप्रदेशच्या ऊर्जा सुरक्षिततेची खातरजमा होणार आहे.
वायुवर आधारित अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांनी आंध्रप्रदेशातल्या कृष्णा-गोदावरी खोऱ्यातल्या ओएनजीसीचा एस वन वसिष्ठ विकास प्रकल्प देशाला समर्पित केला. या प्रकल्पाची किंमत 5700 कोटी रुपये आहे. 2020 पर्यंत देशाची तेल आयात 10 टक्के कमी करणाऱ्या पंतप्रधानांच्या उद्दिष्टाला या प्रकल्पामुळे हातभार लागणार आहे.