सनदी अधिकाऱ्यांनी बदलांचा स्वीकार न करण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडत, प्रशासकीय व्यवस्था नव्या भारताच्या ऊर्जेसह निर्माण करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
नवी दिल्लीत आज सहाय्यक सचिवांच्या उद्घाटन सत्रात, 2015 च्या युवा सनदी अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. भारतानंतर स्वातंत्र्य मिळालेल्या आणि भारतापेक्षा कमी स्रोत उपलब्ध असलेल्या देशांनी विकासाची नवी उंची गाठली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. बदल घडवून आणण्यासाठी धाडसी वृत्ती आवश्यक असते, असे सांगत, विघटीत प्रशासकीय व्यवस्थेत अधिकाऱ्यांची एकत्रित क्षमताही पुरेसे यश देण्यात अपयशी ठरते, असे पंतप्रधान म्हणाले. व्यवस्था आमूलाग्र बदलण्यासाठी गतिमान बदल होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सहाय्यक सचिवांचा हा तीन महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम गेल्या तीन वर्षांपासून राबवला जात असून, त्याचा मोठा परिणाम जाणवतो आहे. या प्रशिक्षक काळात, केंद्र सरकारमधल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी युवा अधिकाऱ्यांनी नि:संकोच संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले. ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा प्रशासकीय अनुभव आणि युवा अधिकाऱ्यांच्या नवनवीन कल्पना व ऊर्जेच्या संगमातून उत्तम काम होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उर्त्तीण होण्यापर्यंतचे दिवस, त्या काळातली आव्हाने या सगळ्याचा विचार करावा आणि मिळालेल्या संधीतून देशात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काम करावे, असा सल्ला त्यांनी युवा अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी कर्मचारी, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि इतर अधिकारी उपस्थित होते.