पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 आणि 23 सप्टेंबर 2017 रोजी त्यांच्या वाराणसी मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पायाभूत विकास, रेल्वे, वस्त्रोद्योग, वित्तीय समावेशन, पर्यावरण आणि स्वच्छता, पशुपालन, सांस्कृतिक आणि धार्मिक अशा वैविध्यपूर्ण बाबींचा समावेश असेल.
पंतप्रधान बडा लालपूर येथील दीनदयाल हस्तकला संकुल हे व्यापार केंद्र राष्ट्राला अर्पण करणार आहेत. संकुलातील सुविधांची ते पाहणी करतील. व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून ते महायना एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. ही गाडी वाराणसीला गुजरातच्या सुरत आणि वडोदराशी जोडणार आहे.
याच ठिकाणी पंतप्रधान शहरातील विविध विकास कामांचे भूमीपूजन करतील किंवा राष्ट्राला समर्पण करतील. उत्कर्ष बँकेच्या बँकिंग सेवांचे उद्घाटन पंतप्रधान करतील तसेच बँकेच्या मुख्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजनही करतील. सूक्ष्म-वित्तपुरवठा हे उत्कर्ष बँकेचे वैशिष्ट्य आहे.
पंतप्रधान व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून जल रुग्णवाहिका सेवा आणि जल शव वहन सेवा वाराणसीच्या जनतेला समर्पित करतील.
22 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पंतप्रधान वाराणसीतील ऐतिहासिक तुलसी मानस मंदिराला भेट देतील. रामायण वरील टपाल तिकिटाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ते दुर्गामाता मंदिराला भेट देतील.
23 सप्टेंबर रोजी पंतप्रधान शहनशहापूर गावात स्वच्छतेशी संबंधित उपक्रमात सहभागी होतील. त्यानंतर ते पशुधन आरोग्य मेळ्याला भेट देतील. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण आणि शहरी लाभार्थ्यांना पंतप्रधान प्रमाणपत्रे वितरित करतील आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतील.