पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 फेब्रुवारीला तामिळनाडू आणि केरळचा दौरा करणार आहेत. यावेळी 14 तारखेला सकाळी 11 च्या सुमाराला चेन्नईत पंतप्रधानांच्या हस्ते महत्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण होईल आणि अनेक प्रकल्पांचा कोनशिला समारंभही होईल. तसेच अर्जुन मेन बॅटल टँक लष्कराला सुपूर्द करण्याचा समारंभही त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमाराला पंतप्रधान कोच्ची येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करतील. या प्रकल्पांमुळे दोन्ही राज्यांच्या विकासाला महत्वाची गती मिळेल आणि या राज्यांची विकासक्षमता पूर्णपणे वापरण्याचा वेग वाढेल.
पंतप्रधानांचे तामिळनाडूमधील कार्यक्रम
पंतप्रधानांच्या हस्ते चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-2, विस्तारचे उद्घाटन होईल. 3770 कोटी रुपयांच्या खर्चाने बांधण्यात आलेल्या या मेट्रोमुळे वॉशरमेट ते विम्को नगर या मार्गावर मेट्रो सुविधा उपलब्ध होईल. 9.05 किमी लांबीच्या या विस्तारामुळे उत्तर चेन्नईला विमानतळ आणि मध्यवर्ती रेल्वे स्थानकाशी जोडले जाईल.
तसेच चेन्नई बीच ते अट्टीपट्टू दरम्यानच्या चौथ्या रेल्वे मार्गाचेही उद्घाटन पंतप्रधान करतील, हा 22.1 किमीचा पट्टा 293.40 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला असून तो चेन्नई आणि तीरुवल्लूवर या जिल्ह्यांतून जातो. या मार्गामुळे चेन्नई पोर्टकडून येणारी वाहतुककोंडी सुटण्यास मदत होईल. या पट्टा चेन्नई पोर्ट आणि एन्नोर पोर्ट ला जोडणार असून महत्वाच्या यार्डातून जाणार आहे. यामुळे गाड्यांची वाहतूकही सुरळीत होईल.
पंतप्रधानांच्या हस्ते विल्लूपूरम-कुड्दालोर-मयीलाडूथुराई-तंजावर आणि मयीलाडूथुराई तीरुवरूवर या रेल्वेमार्गांच्या विद्युतीकरण प्रकल्पाचेही उद्घाटन होईल. 423 कोटी रुपयांच्या 228 किमी लांबीच्या एकल मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले असून त्यामुळे चेन्नई एग्मोर आणि कन्याकुमारी या मार्गावर ट्रॅक्शन न बदलताही निर्वेध प्रवास होऊ शकेल, ज्यामुळे दररोज 14.61 लाख रुपयांच्या इंधनाची बचत होईल.
या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान अत्याधुनिक अशा अर्जुन मेन बॅटल टँक (MK-1A) भारतीय लष्कराला हस्तांतरित करतील. या बॅटल टँकचे डिजाईन, विकास आणि उत्पादन संपूर्णपणे स्वदेशी असून डीआरडीओच्या CVRDE संस्थेसह 15 शैक्षणिक संस्था, 8 प्रयोगशाळा आणि कित्येक एमएसएमई कंपन्यांच्या मदतीने हा टँक तयार करण्यात आला आहे.
त्याशिवाय ग्रान्ड अनिकुट कालवा योजनेचा विस्तार, नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठीच्या प्रकल्पाचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. या भागातल्या नदीगाळ असलेल्या जिल्ह्यांमध्ये सिंचनासाठी हा कालवा विशेष महत्वाचा ठरणार आहे. या कालव्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी 2,640 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून, त्यामुळे या कालव्याची जलक्षमता वाढणार आहे.
त्याशिवाय, आयआयटी मद्रासच्या डिस्कव्हरी कॅम्पसचे भूमिपूजन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होईल. चेन्नई जवळच्या थैय्योर इथे हा सुमारे 2 लाख चौरस मीटर भूमीवर हा परिसर विकसित केला जाणार असून त्याच्या पहिल्या टप्प्यासाठी 1000 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या कार्यक्रमाला तामिळनाडूचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपस्थित राहतील.
पंतप्रधानांचे केरळमधील कार्यक्रम
पंतप्रधानांच्या हस्ते केरळमध्ये बीपीसीएलच्या प्रोपेलीन डेरीव्हेटीव्ह पेट्रोकेमिकल प्रकल्प (PDPP)चे उद्घाटन होईल. या संकुलात, ॲक्रेलेट्स, ॲक्रेलिक ॲसिड आणि ऑक्सोअल्कोहोलचे उत्पादन केले जाईल, जी सध्या अत्यंत महत्वाची उत्पादने आहेत.यामुळे आपल्याला दरवर्षी 3700 ते 4000 कोटींच्या परदेशी चलनाची बचत करता येईल. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी 6000 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात आली असून, कच्चा माल पुरवठा, वस्तूंचा आणि इतर सुविधांचा सामाईक वापर करता यावा यासाठी PDPP संकुल तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जवळ विकसित केले जाणार आहे.
यामुळे, डाऊनस्ट्रीम क्षेत्राला लाभ होणार असून कच्च्या मालाची उपलब्धता आणि पुरवठा साखळीचा अधिकाधिक वापर करुन मोठी बचत करणे शक्य होईल. कोच्ची तेलशुद्धीकरण प्रकल्प विशिष्ट प्रकारच्या पेट्रोकेमिकल्सचे उत्पादन करणारा भारतातला पहिला प्रकल्प ठरला आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी कोचीनच्या वेलिंगडन बेटांवरील रोरो सेवा जहाजांचेही लोकार्पण होईल. आंतरराष्ट्रीय भारतीय जलमार्ग प्राधिकरण दोन नवी रोल-ऑन/रोल-ऑफ जहाजे, एमव्ही आदी शंकरा आणि एमव्ही सीव्ही रामन येथे देतील, या जहाजांमधून बोलगट्टी ते वेलिंगडन दरम्यान एकावेळी सहा 20 फूट ट्रक्स, तीन 20 फूट ट्रेलर्स, तीन 40 फूट ट्रेलर्स आणि 30 प्रवासी यांची वाहतूक करता येईल. या सेवेचा इथल्या व्यापाराला लाभ होऊन मालाच्या वाहतुकीचा खर्च कमी होईल, तसेच कोच्चीच्या रस्त्यांवर ट्रक्समुळे होणारी वाहतूककोंडीही टळू शकेल.
पंतप्रधानांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल ‘सागरिका’ चे ही कोचीन बंदरांवर उद्घाटन होईल. वेलिंगडन बेटांजवळच्या एर्नाकुलम येथे असलेले हे क्रुझ टर्मिनल भारतातील सर्वात मोठे अद्ययावत आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल असेल. या अत्याधुनिक टर्मिनलवर सर्व सुविधा असतील, यासाठी .25.72 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या टर्मिनलमुळे पर्यटनालाही चालना मिळेल आणि विकासाची गती वाढेल तसेच रोजगारनिर्मिती आणि राज्याच्या महसुलात तसेच परदेशी गंगाजळीत वाढ होईल.
पंतप्रधानांच्या हस्ते सागरी अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्था, विज्ञान सागर, कोचीन शिपयार्ड लिमिटेडचेही उद्घाटन होईल. हे एक प्रमुख सागरी प्रशिक्षण केंद्र असून, शिपयार्डमध्ये कार्यरत असलेले हे भारतातील एकमेव केंद्र असेल. या शिपयार्ड मध्ये बांधकाम सुरु असलेल्या किंवा दुरुस्तीसाठी आलेल्या अनेक जहाजांवर विद्यार्थ्यांना थेट प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल. या संस्थेची 27.5 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात आली असून एकावेळी 114 विद्यार्थ्यांना इथे प्रशिक्षण घेता येईल. या संस्थेमधून भारत आणि परदेशातील मागणीनुसार, गुणवान आणि कुशल सागरी अभियंते आणि कर्मचारी तयार होतील.
कोचीन बंदरावरच्या दक्षिण कोळसा धक्क्याच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचा कोनशिला समारंभही पंतप्रधानांच्या हस्ते होईल सागरमाला योजनेअंतर्गत, 19.19 कोटी रुपयांच्या खर्चाने हा धक्का बांधला जाणार आहे.
हा धक्का पूर्ण झाल्यानंतर तो कोचीन बंदरावरून रसायनांची वाहतूक करण्यासाठी उपयुक्त ठरेल. यामुळे मालवाहतूक जलद, सुलभ आणि कमी खर्चात होऊ शकेल.
केरळचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यासह केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.